आनंदाची बातमी.! महिन्याच्या प्रतिक्षेनंतर भंडारदारा धरण भरले.! 44 वर्षात भंडारदारा धरण 11 वेळा भरले नाही.! 83 गावे सावधान.!
- सागर शिंदे
सार्वभौम (भंडारदरा) :-
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशी (15 ऑगस्ट) अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे पुर्णत: भरलेले असतात. मात्र, गेल्या महिन्यापासून या परिसरातील पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने तब्बल एक महिना भंडारदरा भरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसात रतनवाडी व घाटघर, साम्रद, उडदावणे, पांजरे या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे भंडारदरा पुर्णपण क्षमतेने भरुन येथे 621 दसलक्ष घनफुटने अजुनही पाण्याची आवाक सुरू आहे. आज सकाळी ६ वाजता 10 हजार 974 साठा होता तर 9 वाजता 11 टिएमसी धरण भरले होते. एकंदर 10 हजार 500 दलघफुट ला भंडारदरा तांत्रीक दृष्ट्या भरलेला असतो असे प्रशासन घोषित करत असते. त्यामुळे आजची आवक पाहता 3 ते 4 हजार क्युसेक्स ने पाणी निळवंडे धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे एकंदर निळवंडे पानलोट क्षेत्रातील आवक आणि भंडारदऱ्यातून येणारे पाणी पाहता आज दोन्ही धरणांची तहान भागली असे जवळपास निच्छित झाले आहे. तर निळवंडे धरणातून प्रवरेत पाणी कधी सोडायचे हे निच्छित नाही. तरी देखील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. यावर्षी पावसाने अक्षरश: वाट पहायला लावली आहे. तर आता या पावसामुळे शेत हिरवाईने नटले असून डोंगर दर्यांमधून पांढरेशुभ्र धबधबे वाहताना दिसत आहे. तसेच सह्याद्रीने हिरवागार शालू नेसल्याचे दिसते आहे. अकोले, संगमनेर व मराठवाड्यासह एक कोटी लोकांची तहान भूक भागविणारे भंडारदरा धरण आज (दि.12) तुडूंब भरले आहे. त्यामुळे वर्षभर लाखो शेतकर्यांची चिंता स्थिरावली आहे. यापुर्वी 1967 ते 2021 या 44 वर्षाच्या काळात भंडारदरा धरण कधी भरले व कधी भरले नाही, याचा स्पेशल रिपोर्ट सार्वभौमच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
आज भंडारदरा धरण पुर्णत: भरल्याची माहिती अभियंते अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. अजुनही पाण्याची आवक बर्यापैकी सुरू आहे. जसे रतनवाडी, घाटघर, साम्रद, जायनेवाडी, बिताका, मुतखेल, बारी, वाकी अशा पर्जन्यछायेच्या भागातून येणार्या पावसाच्या पाण्याची आवक लक्षात घेता जावक निच्छित केली जाते. तसे 15 ते 31 ऑगस्टपर्यंत 11.39 टिएमसी भडारदरा धरण फुल करण्याचे धोरण शासनाचे आहे. एरव्ही भंडारदरा धरण 15 ऑगस्ट रोजी भरते असे अंदाजे निर्धारीत झाले आहे. मात्र, यावर्षी हा इतिहास थोडा बदलला असून 12 सप्टेंबर अखेर धरणात पाण्याची निर्धारीत पातळी पुर्ण झाली. जर ऑगस्ट महिन्यात धरणाच्या भिंतीहून पाणी वाहीले नाही. तर शेतकर्यांच्या चिंता शिगेला पोहचलेल्या असतात. जर धरण भरण्याचा इतिहास पाहिला तर आजवर 44 वर्षाच्या काळात भंडारदरा एकून 11 वेळा भरलेला नाही. दि. 2 ऑगस्ट 1969 ते 70 पर्यंत धरण याच महिन्यात फुल भरले. मात्र, सलग तीन वर्षे म्हणजे 1972 पर्यंत पावसाने बळीराजाकडे दुर्लक्ष केले. परिणामी उभ्या महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यावेळी फक्त 75 टक्के सरासरी धरण भरले होते. 1973 ला धरण भरले परंतु 74 ला पुन्हा दुष्काळमय परिस्थिती अकोलेकरांनी अनुभविली. त्यानंतर मात्र सलग 10 वर्षे म्हणजे 1984 पर्यंत धरण क्षेत्रात पाणलोट परिसर पहायला मिळाला. तर नंतर सलग तीन वर्षे म्हणजे 1985 ते 87 व 89 ला धरण पुर्णत: भरले नाही. परंतु त्यानंतर दरम्यान पाच वर्षाचा काळ शेतकर्यांच्या सुखाचा गेला. पाण्याचा तुटवडा फारसा जाणवला नाही. मात्र 1995 साली धरणाची भूक अपुर्ण राहिली. कारण त्यावेळी 9 हजार 498 दलघफुट पाणी धरणात साठले होते. तीच परिस्थिती 2000 दशकाच्या मुहूर्तावर झाली. तेव्हा धरण अवघे 8 हजार 851 टिएमसी भरले होते. त्यानंतर सलग 15 वर्षे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धरणाची आवक कायम राहिली. ती गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2019 पर्यंत. अशा पद्धतीने 43 वर्षात धरण प्लस- मायनसमध्ये होत राहिले. तर 44 वर्षानंतर आज धरण 12 सप्टेंबर 2021 रोजी 11 वा. तांत्रीकदृष्ट्या भरले आहे. खरंतर 2009 मध्ये फक्त आक्टोबर महिन्यात धरण उशिराने भरले आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या आधी एकदाही धरण भरल्याची इतिहासात नोंद नाही.
आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचे भविष्य आजवर कोणी वर्तवू शकले नाही. ना आपत्तीची कोणाला खबर असते. त्यामुळे, जर भंडारदर्याच्या पानलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाला तर कोणत्याही क्षणाला पाणी प्रवरेत सोडावे लागेल. त्यामुळे, जोवर पावसाळा आहे. तोवर प्रशासनाने जे नियम सांगितले आहे, ज्या सुचना दिल्या आहेत त्यांचे पालन करावे. भंडारदरा ते नेवासा या प्रवरेच्या प्रवाहात जे नदिकाठची गावे आहेत. त्यांनी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे, प्रशासनाने जी गावे निच्छित केली आहे. त्यांनी नदीपात्रात जाऊ नये, लहान मुलांना नदीवर पाठवू नये, धुणे धुण्यासाठी महिलांना नदीवर येणे टाळावे, शेतकर्यांनी त्यांची शेती अवजारे व संसाधने नदीकाठी ठेऊ नये. फार नदीकाठी शेत असेल तर त्यात पिक घेणे टाळले पाहिजे अशी काही खबरदारी अपेक्षित आहे. तर नदीकाठी कोणकोणती गावे आहेत. ती यादी देखील प्रशासनाकडे आहे.
नदिकाठची गावे.!
भंडारदरा, रंधा खुर्द व बुद्रुक, शेलविहीर, माळेगाव, दिगंबर, चितळवेढे, निब्रळ, निळव़डे, विठे, म्हळदेवी, सावंतवाडी, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, उंचखडक बु व खुर्द, अकोले, टाकळी, सुगाव खुर्द व बुद्रुक, कळस, तर संगमनेर तालुक्यात दोन्ही धांदरफळ, वाडापूर, रायते, संगमनेर बु व खुर्द, जोर्वे, कणुली, दाढ, कोकणेवाडी, आश्वी, वाघापूर, शेडगाव, खराडी, मंगळापूूर, कसारा दुमाला, आश्वी बु, तसेच राहाता तालुक्यात, दाढ, हाणुमंतगाव, पाथरे, दुर्गापूर, कोल्हार भगवती तर श्रीरामपूर तालुक्यात कडीत खुर्द व बुद्रुक मांडवे, कुराणपूर, लाडगाव, भेर्डापूर, मालुंजे, खिर्डी, वागी खुर्द व बुद्रुक, वळदगाव, उंबरगाव, तसेच नेवाशात पाचेगाव, चिंचबन, गोनेगाव, नेवासा खुर्द व बुद्रुक व बहिरवाडी राहुरी तालुक्यात देखील धानोरे, सोनगाव, सात्रळ, माळे डुक्रेवाडी, कोल्हार खु, चिंचोली, दावनगाव आंबी, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, करंजगाव, मालंजे, दरडगाव, महालगाव, लाख, सांक्रापूर, गंगापूर, पिंपळगाव फुगणी, माहेगाव अशी गावे नदीकाठी आहे.
निर्धारीत आवक पुर्ण...
यावर्षी भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्चन्यमानामुळे धरणाचा पाणीसाठा आज दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ६:०० वाजता ९९% झालेला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता धरण साधारणत: ११ वा. पर्यंत पूर्ण क्षमतेने भरल्याने ११ ते ११:३० दरम्यान भंडारदरा धरणातून ३००० ते ४००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहीवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. धरणात पाण्याची आवक बरीचशी प्लस-मायनस झाली. त्यामुळे, निर्धारीत वेळेपेक्षा धरणाने तब्बल महिनाभरानंतर पातळी पुर्ण केली आहे. आता पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक लक्षात घेऊन पाणी पावर हाऊसमधून खाली सोडले जाईल. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे भडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी करू नये. तसेच जे येतात त्यांनी नियमांचे पालन करावे. सध्या धरणात 11.26 टिएमसी पाणी असून आवक पाहून पाण्याचा विसर्ग ठरविला जाईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण उशिरा भरले आहे. नदीकाठी जी गावे आहेत, त्यांना धोका नसला तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे.
- अभिजित देशमुख (अभियंता)