आण्णा म्हणजे लाखोंचा पोशींदा आणि मानसातला परीस माणूस.! काळजावर घाव घालणारा तो प्रसंग आणि मी.!



- श्याम वाकचौरे

सावभौम विशेष :- 

                 लाख मेले तरी चालतील, परंतु लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. अशा प्रकारची म्हण इतिहासात सुवर्णक्षरांनी रेखाटली आहे. त्याचीच प्रचिती मला गेल्या काही दिवसांपुर्वी आली होती. कारण, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक पालक म्हणा किंवा देव माणसाच्या रुपात गायकर साहेबांसारखा नेता लाभला. कारण, हे औपचारिक कौतूक नव्हे.! तर वास्त:वता माझ्या पडत्या काळात अण्णा माझ्या पाठीशी अगदी दिपस्तभासारखे ठाम उभे होते. त्यामुळे, आज माझ्यावर आलेल्या संकटाचा काळ जरी सरला असला तरी त्यांच्या प्रेमाचे दोन शब्द आणि पाठीवर ठेवलेला हात, हाच मला जिवदान देऊन गेला. असे म्हटले तरी काही वावघे ठरणार नाही.! असाच माझ्या काळजावर अधिराज्य गाजविणार्‍या अण्णांबाबतचा एक प्रसंग मी आपल्या समोर मांडतो आहे. 

दि.15 मार्च 2021 रोजी मला जरा अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र, माझ्यामागे थोडी कौटुंबिक धावपळ असल्यामुळे जरा कणकण आली असावी असा विचार करुन मी कामात व्यस्त राहिलो. मात्र, दोन-तीन दिवस व्हायरल इन्फेक्शनच्या नावाखाली अंगावर काढून होईल निट असे म्हणत मी दुर्लक्ष केले. याच दरम्यान मला अचाकन मुंबईला जावे लागले. त्यामुळे, माझ्यासाठी तो दुष्काळात तेरावा महीना होता. तरी देखील आयुष्यात जबाबदारी झटकायची सवय नसल्याने मी चालता झालो. प्रवासाची दगदग आणि बदलते वातावरण यामुळे, मला अधिकच कणकण जाणवत होती. या दरम्यान, मी बाहेर नसल्याने अचानक अण्णांचा फोन आला. त्यांना कोठून आणि कसे समजले कोणास ठाऊक.! त्यांनी मला तब्बेतीबाबत विचारणा केली. मात्र, मी वरवर बोलुन सर्व ऑल इज वेल दाखविले. तरी देखील साहेबांनी मला सांगितले. कोविड आहे का? ते चेक करुन घे. टाळाटाळ करु नको.! 

त्या दिवशी अण्णांचा फोन आल्यानंतर निम्मे बरे वाटले होते. त्यांनी जी विचारणा केली. त्यात मला प्रचंड आपुलेपणाची जाणीव भासल्याने मी चेकअप करेल असे मला वाटले नव्हते. त्यामुळे, सकाळी मी निवांत उठलो होतो. जरा वेळ होतो कोठे नाहीतर लगेच अण्णांचा मला पुन्हा फोन आला. श्याम कशी आहे तब्बेत? बरं वाटतं का? कोठे तपासणी केली का? त्यांच्या सर्व प्रश्नांना मी अनुत्तरीत होतो. कारण, अण्णांसारखा माणूस आज पुन्हा फोन करून विचारणा करतो.! हे माझ्यासाठी फार म्हणजे फार सुखद बाब होती. मी शांत बसल्यामुळे, त्यांनी ओळखून घेतले. चल आपण संगमनेर येथे अ‍ॅडमिट होऊ, तेथे तपासण्या करुन घेऊ, बाकी कसला विचार करु नको.! मी आहे तुझ्या सोबत. अण्णांचे हे शब्द माझ्या आजारपणात मला अगदी राजश्रयाप्रमाणे वाटले होते. माझे मन अगदी भारावून गेले होते. ऐकीकडे मला बिलगलेला जीवघेणा आजार आणि दुसरीकडे माझ्यावर व्यतीत होणारे प्रेम. याने माझे ह्रदय भरुन आले होते. कारण, अगदी आई वडिलांप्रमाणे अण्णा माझी काळजी घेत असल्याच्या भावना मला अगदी अंत:करणातून उचंबळून आल्या होत्या.

दि. 22 मार्च 2021 रोजी मी संगमनेर येथे एका हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होऊन घेतलं. एकीकडे मनात भिती आणि दुसरीकडे साहेबांचा आधार. त्यामुळे, मी काही झालं तरी स्वत:ला सावरले होते. अण्णानी कोविडची परिस्थिती अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. एव्हाना अनुभवली होती. त्यात भले-भले आणि अगदी जवळचे लोक देवाला प्रिय झाले होते. त्यामुळे, अण्णांचे शब्द हेच पाठबळ मनात शिल्लक राहिले होते. खरोखर व्यक्त होताना देखील उर भरुन येतो की, मला देखील अपेक्षा नव्हती. मात्र, मी अ‍ॅडमिट झाल्यानंतर अगदी दुसर्‍याच दिवशी म्हणजे 23 मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अण्णा व निलेश भाऊ हे मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांना बघताच क्षणी मला फार आनंद झाला. तर भेदरलेल्या मनाचे फार मोठे सांत्वन झाले होते. अगदी 15 20 मिनिटे कोवीड सेंटरमध्ये उभे राहून अण्णा माझ्या सोबत बोलत होते. मला आधार देत होते. माझ्या पाठीशी हात ठेऊन लढ म्हणत होते. मी आहे काळजी करू नको असे वारंवार म्हणत मला उभारी देत होते. त्यांचे हे पालकत्व आणि मातृत्वाचे शब्द ऐकुण नकळत माझ्या अश्रूंना बांध फुटला. 

आज सहा महिने होत आले. माझ्या कानाभोवती अण्णांचे ते शब्द आजही गुंजत आहे. काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. त्यांच्या देवरुपाने माझ्यासाठी तेच शब्द होते की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या वेळी अगदी लोक किड्या मुंगीसारखे मरत होते. अशात अण्णा मला आधार देत म्हणायचे. तु घाबरु नको.! तुला बरं वाटलं नाही तर आपण पुण्याला जाऊ.! त्यामुळे, मला अधिक भरुन येत होते. कारण, या स्वार्थी जगात आजकाल कोण कोणासाठी इतकं करत नाही.! खरंतर डोळ्यांभोवती तेव्हा आश्रु दाटतात जेव्हा मला ते दिवस आठवतात. कारण, दोन-तीन दिवस काळजी करून देखील हा देव माणूस स्वतःची आई दवाखान्यात शेवटचा श्वास घेत असताना देखील मला भेटायला आला होता. म्हणजे, खरोखर किती उदार अंत:करण म्हणावे लागेल. खरंतर मीच काय.! अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यावर देखील साहेबांनी तितकेच प्रेम केल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या असल्या वागण्याने त्यांनी माझ्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जे कोणी त्यांच्यावर टिका करतात, त्यांच्या सानिध्यात नाही, त्यांनी एकदा या परिसाच्या सानिध्यात येऊन पाहिले पाहिजे. त्यांच्या देखील आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. मी मात्र उभ्या आयुष्यात माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत ह्या देव माणसाला कधी विसरणार नाही. अर्थात लाख मेले तरी लाखोंचा पोशींदा जगला पाहिजे. असे का म्हणतात याचे प्रमाण मला त्या दिवशी मिळाले. अशा थोर व्यक्तीमत्वाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.