बाप रे.! शेंडी-भंडारदर्‍यात पर्यटकांचा स्थानिकांवर चाकु हल्ला.! चौघे गंभीर जखमी, आरोपी ताब्यात, यथेच्छ धुलाई.!


सार्वभौम (अकोले) :-

                    अकोले तालुक्याला निसर्गाची फार मोठी देणगी लाभली आहे. मात्र, हे देणं जीवघेणं ठरत चाललं आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण, येथे जे पर्यटक म्हणून येतात ते कधी पोलिसांवर हात उचलतात तर कधी स्थानिक महिलांच्या आब्रुवर हात घालतात. आता पुन्हा तीन मद्यपी पर्यटकांनी चक्क शेंडी येथे चार जणांवर धारधार चाकुने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 5 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमरास घडली. यात गणेश परसय्या, गोविंद मधे, सुनिल मधे व नवसु मधे या चौघांना बेदम मारहाण करुन त्याच्यावर शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. यात पोलिसांनी अक्षत जाधव (रा. धमनगाव रोड, अकोले) यास ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, आमृतेश्वर मंदीर, रंधा फॉल असे अनेक नयनरम्य पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे, हा तालुका निसर्ग सौंदर्यासाठी चांगलाच ख्यातनाम आहे. गेली आठ महिने येथील आदिवासी लोकांना फारसा रोजगार नसतो. मात्र, पावसाळ्यात पोटापुरती कमाई ते करीत असतात. यात विशेष म्हणजे भल्याभल्या शहरांमध्ये 7 रुपयांना बाजारात मिळणारी पाण्याची बाटली. ही ते 40 ते 50 रुपयांना विकतात. मात्र, हे आदिवासी बांधव कोणाला एक नव्या पैशाला देखील लुबाडत नाहीत. त्यामुळे, दुर्दैव असे की, येथे येणारे मद्यधुंद पर्यटक त्यांची टिंगल उडवितात. त्यांनाच लुटण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यांच्या आया बहिनींकडे वाकड्या नजरेने पाहता. परिणामी त्यांनी एक शब्द उलटुन जाब विचारला तर त्यांची या पर्यटकांकडून यथेच्छ धुलाई होते. सुर्दैव चांगले आहे. की, राजूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासारखे अधिकारी बसले आहेत. म्हणूनतर गोरगरिब आदिवासी बांधवांवर हात उचलणार्‍यांवर ते कायद्याने हात उचलुन गुन्हेगारांना हात जोडायला लावतात.

आता आज अगदी शुल्लक कारणाहुन स्थानिक व्यक्ती आणि या तीन पर्यटाकांमध्ये वाद झाले होते. त्यांना मधे आणि परसय्या यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भरमसाठ ढोसल्यामुळे त्यांना आपण काय करतो आणि समोरचे काय सांग आहेत. याचे देखील भान राहिले नव्हते. जेव्हा या तरुणांनी त्यांचा अतिरेख सुरू केला तेव्हा त्यांना काही व्यक्तींनी जसाशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांनी कोणास ठाऊन कोठून धारधार चाकु काढला आणि थेट दिसेल त्याच्यावर वार करीत सुटले. हा प्रकार काही क्षणात गावभर पसरला आणि बघता बघता गाव जमा झाले. यावेळी या तरुणांना उपस्थित व्यक्तींनी चांगलाच चोप दिला. मात्र, या झडपीत त्यांनी जे पळ काढला ते गावकर्‍यांच्या हाती लागले नाही.

दरम्यान, या घटनेत गणेश परसय्या, गोविंद मधे, सुनिल मधे व नवसु मधे ही चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे, त्या दोघांना तत्काळ नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली असता त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. यात तुर्तात अक्षत जाधव या अकोल्याच्या तरुणास त्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याला आणखी दोघांबाबत विचारणा केली असता त्याने त्यांनी काही माहिती देखील दिली आहे. त्यामुळे, यात नेमके कोणकोण दोषी आहेत. हे लवकरच पोलीस तपासात निष्पन्न होईल. मात्र, तुर्तास तरी पोलीस पसार झालेल्या अन्य दोघांचा शोध घेत आहेत. तर जे गंभीर जखमी झाले त्यांचे देखील जबाब आता नोंदविण्यात आले आहेत.

खरंतर, पर्यटकांचे स्थानिकांवर होणारे हल्ले थांबवावेत यासाठी काही संघटनांनी प्रशासनाला निवेदन देखील दिले होते. मात्र, त्याचा काही एक परिणाम झाल्याचे दिसत नाही. गेल्या काही दिवसांपुर्वी म्हणजे शुक्रवार दि 23 जुलै 2021 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एक महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. आम्हाला अंडाभुर्जी भेटेल का? असे म्हणत त्यांनी विचारणा केली आणि तू फार चांगली दिसते असे म्हणत त्याने तिचा हात धरून जोरात मोठी मारली. तर स्टॉलमधील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढाई मधील तेल, दुधाचा कॅन, गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉल मधील सामानाची नासधूस केली होती. याप्रकरणी आरोपी श्रीराम केशव जंगले (वय 26 रा. पुर्णवाद नगर वार्ड क्रमांक 07 श्रीरामपुर) अक्षय प्रभाकर गाडेकर (वय 28 रा. श्रीरामपूर) उमेश अशोक धनवटे (वय 31, रा. श्रीरामपुर), सुमित दत्तात्रय वेताळ (वय 27, रा. श्रीरामपूर) वैभव किशोर हिरे (वय 24, रा श्रीरामपूर), विशाल रामकृष्ण वेताळ (वय 24 रा. श्रीरामपूर) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले होते. 

तर शुक्रवार दि. 9 जुलै 2021 रोजी दुपारी भंडारदरा परिसरात सागर थोरात आणि त्याचे काही मित्र भंडारदरा फिरण्यासाठी आले होते. तेव्हा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, त्यात स्पिल्वे परिसरात जाण्यासाठी पोलीस विरोध करीत होते. याच वेळी काही अन्य पर्यटक तेथे आले व आम्हाला पाण्याकडे जाऊद्या असे म्हणत त्यांनी पोलिसांशी अंगलट केली होती तर स्थानिक नागरिकांना देखील मारहाण करण्यात आली होती. यात देखील अजित बाळासाहेब शिंदे, (रा. ठाणगाव, ता. सिन्नर), किरण कोंडाजी उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), विनोद संतोष औटी (रा. वाघापूर, ता. अकोले), ज्ञानेश्वर विश्वास कदम (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले), आकाश सतिष उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), ज्ञानेश्वर गणपत लांडगे (रा. वडगाव लांगडा, ता. संगमनेर) अशा सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पर्यटकांनो.! सहकार्य करा

पोलीस व स्थानिक नागरिक हे आपल्या संरक्षणासाठी आहेत. त्यामुळे, त्यांच्याशी अशा पद्धतीने वागू नका. मद्यपी करून अशा पद्धतीने धोक्याच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, स्वत:च्या जीवाला इजा होईल असे कृत्य कोणी करू नये, तालुक्याला इतका सुंदर नैसर्गिक ठेवा लाभला आहे. त्याचे प्रत्येकाने जनत केले पाहिजे. कोणी आपल्याला समजून सांंगण्यापेक्षा आपण स्वत: काही गोष्टी समजून घ्याव्यात. या भागातील लोक चांगले व प्रामाणिक असून त्यांच्याशी कोणी गैरव्यवहार करणे अयोग्य आहे. त्यामुळे, पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

- नरेंद्र साबळे (सहा.पो.नी)