गेल्या ४० वर्षात पिचड काय झोपले होते का? आता त्यांना अदिवासींचा पुळका आलाय.! हे राघोजी भांगरेंविषयी प्रेम नव्हे, राजकीय सौदेबाजी.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                    राज्याचे आदिवासी विकास खात्याचे अनेक वर्ष मंत्रीपद भूषविलेले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अमृतवाहीनी नदीवरील भंडारदरा धरणास "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण" असा नामकरणाचा कार्यक्रम सोमवारी (९ ऑगस्ट) आयोजित केला असल्याबद्दल आम्हांस मनापासून आनंद होतोय. त्यास आमचा सक्रीय जाहीर पाठिंबा आहे. कारण अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करित आहोत. जेव्हा मधुकरराव पिचड हे राज्यात सत्तेवर मंत्री होते तेव्हापासून आजतागायत आमच्या या मागणीकडे लक्ष दिलं नाही. आम्हालाच काय परंतू संपूर्ण आदिवासी समाजाला ही खंत लागून होती. कारण आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे आमचा बाप आहे. ते आमचे भांगरे घराण्याचेच नव्हे तर संपूर्ण आदिवासींचे आदर्श, प्रेरणास्रोत व दैवत आहे. पण हे  नामकरण करण्याचा प्रयत्न म्हणजेच पिचड पितापुत्रांचे आदिवासींबद्दल उफाळून आलेले पुतना मावशीचे प्रेम आहे, अशी टिका विधानसभा विजयाचे शिल्पकार अशोकराव भांगरे यांनी पिचड पितापुत्रांवर केली.

              धरण नामकरण संदर्भात अशोकराव भांगरे हे शनिवारी भंडारदऱ्यात पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना बोलत होते. ते म्हणाले, उशीरा का होईना पण भंडारदरा धरणास आमचे बापजादे व आदिवासींचे दैवत आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात येत असल्याबद्दल आम्हास निश्चितच आनंद आहे. मात्र पिचड पितापुत्रांना याची खूप उशीरा उपरती झाली. कारण आश्चर्य याचे वाटतेय की गेल्या ४० वर्षांत हेच मधुकरराव पिचड राज्यात आदिवासी विकास व इतर अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्री असताना त्यांना हे नामकरण करणे शक्य असूनदेखील त्यांनी ते का केले नाही. शिवाय हे पिचड पितापुत्र अकोले तालुक्यात सलग ४० वर्ष आमदार असतानादेखील का केले नाही. नेमके यांची आमदारकी गेल्यावरच यांना हे शहाणपण का सुचले ? आमचे श्रद्धास्थान व आदिवासींचे दैवत आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव भंडारदरा धरणास देेण्याची सुबुद्धी यापूर्वी कोठे गायब झाली होती. तेव्हा हे मंत्रीमंडळात असतानाच सरकारी गॅझेट्स मधून अधिकृत नामकरण करण्यास कोणाचा विरोध होता. तेव्हा कसली अडचण होती काय ? असे महत्त्वपूर्ण सवाल आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्या धरण नामकरणावर पिचड पितापुत्रांसमोर आदिवासींचे नेते अशोकराव भांगरे यांनी उपस्थित केले.

          ते म्हणाले, भंडारदरा धरणास "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण" असे नाव देण्यास यापूर्वी मीच पुढाकार घेतलेला आहे. पण मधुकरराव पिचड अनेकदा सरकारमधे मंत्री राहून व हेच पितापुत्र अनेक संस्थावर सत्तारूढ राहूनदेखील मस्तीत राहील्याने आदिवासी जनतेपासून दूर गेले आहेत. याचा दृश्य परिणाम म्हणून राष्ट्रवादीकडूनच आमदार डॉ. किरण लहामटे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले. खरेतर आपल्या हातून आमदारकी गेल्यापासून दोघेही सैरभैर झाले आहेत. म्हणूनच दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार वैभव पिचड यांनी जाहीरपणे अकोल्यातील जीर्ण इमारत झालेल्या बसस्थानकास छत्रपती शिवरायांचे नाव देण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांनी तालुक्यातील उत्तर विभागातील म्हैसवळण घाटाला आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांंचे नाव देण्याची मागणी केली. कारण काय सांगतले तर तालुक्यात राघोजी भांगरे यांंचे येणेजाणे या घाटातून होत असे. नंतर ही मागणी बेदखल करीत, विषय बाजूला ठेवून आमच्या जुन्या मागणीलाच पुढे रेटत भंडारदरा धरणास "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण" नाव देण्याची भावनिक खेळी खेळत आहेत. म्हणूनच ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम धरला आहे. खरेतर शासनाकडून गॅझेट्स तयार झाल्याशिवाय नावात बदल होऊ शकत नाही, हे पिचड पितापुत्रांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना माहीती अवगत असूनदेखील केवळ आदिवासी समाज व तरुणांवर आपला राजकीय प्रभाव पाडण्याची ही केविलवाणी धडपड सुरू आहे. यांना भंडारदरा धरणास राघोजी भांगरे यांचे नाव देण्याचे निश्चित धोरण नव्हतेच, कारण तसे असते तर माजी आमदार वैभव पिचड यांनी राघोजी भांगरे यांचे नाव देण्यााचे प्रथम प्राधान्य अकोले बसस्थानकास व नंतर म्हैसवळण घाटास दिले नसते. पण त्यांना भंडारदऱ्याचे नामकरण हे उशीरा सूचलेले शहाणपण आहे. मात्र असे असले तरी देखील भंडारदरा धरणास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण असे नाव देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबाच आहे. उलट आमचीच ही आग्रही मागणी आहे, असेही अशोकराव भांगरे यांनी स्पष्ट केले

   ते म्हणाले की, ज्या भंडारदरा धरणाच्या साठवण तलावात व पाणलोटक्षेत्रात आमचे आदिवासी विस्थापित झाले, त्यांच्या जमीन व घराची कोणतीच नुकसान भरपाई ब्रिटिश काळात मिळालेली नाही. या धरणाच्या पाण्यावर अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागांतून लोक बागायतदार व सधन झाले. शेती सुजलाम सुफलाम झाली. औद्योगिकीकरणास चालना मिळून उद्योग व्यवसाय वाढले. सहकार फुलला. साखर कारखानदारी वाढली. अनेक सकारात्मक बदल घडले, पण धरणात येथील जमीन व घरे गेलेला आमचा आदिवासी अजूनपर्यंत हलाखीतच जगतो आहे. आजसुद्धा तो लंगोटीतच दिसतोय. मग आदिवासींवर शासनाकडून खर्च झालेले कोट्यावधी रुपये गेले कोठे ? शहापूर येथील आदिवासींच्या जमिन बोगस आदिवासींना खरेदी करून महामार्गातील करोडो रूपयांचे नुकसान कोणी केले ? आपल्या ४० वर्षांच्या कार्यकालात लाखांहून अधिक खोट्या आदिवासींची घुसखोरी करून खऱ्या आदिवासींच्या शासकीय नोकऱ्या इतरांच्या घशात घालण्याचे काम केले. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे अशा प्रवृत्तीवर तुटून पडले असते. मग तुम्हीला हा नैतिक अधिकार पोहोचतोय काय ? आदिवासींबद्दल खरोखर प्रेम आहे काय हाच खरा प्रश्न उपस्थित होतोय. कारण पिचड पितापुत्रांना ना खंत वाटतेय ना खेद. उलटपक्षी भंडारदरा धरणाला खेटून असलेली आदिवासी परिसरातील जिरायत, नापीक जमीन बागायती करण्याबाबत गेल्या ४० वर्षीत मंत्रीपद भोगलेल्या व सत्तेवर मस्तवाल झालेल्यांना स्वप्न सुद्धा पडले नाहीत. आणि आज आमदारकी गेल्याने यांची झोप उडालीय. झोप लागत नसल्यानेच आदिवासींची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा भावनिक गोष्टीचे आवाहन करण्याचे काम होत आहे. आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचा अकोल्यातील जन्मगावी देवगाव येथे स्मृतिप्रीत्यर्थ उंचावर आम्ही अर्धाकृती पुतळा उभारून भव्य स्मारक बनवून भावी तरूण पिढीसमोर काही स्वप्न साकारण्याचे प्रयत्न केले. मात्र पिचड पितापुत्रांनी आमदार असताना देवगावात शासकीय निधीतून जे दुसरे स्मारक तयार केले आहे, तेथे आमदारकी गेल्यावर पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्याचेच विसरून गेले. हीच काय यांची आद्यक्रांतीवीर राघोजी भांंगरे यांच्याप्रती प्रेम व सद्भवना आहे काय ? असा प्रश्न अशोकराव भांगरे यांनी उपस्थित करून भंडारदरा धरणास आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे धरण नामकरणास आमचा मनापासून पाठींबा असल्याचे स्पष्ट केले.

       

ते पुढे म्हणाले, आमचे आद्यक्रांतीकारक राघोजी भांंगरे  याच्याप्रती सच्चे प्रेम व आदरभाव आहेत, पण तुमचे काय ? तुम्ही तर देवगावात त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याचेच विसरून गेलात. यांना राजकारणात सर्व काही दिले त्या पवार साहेबांचीच साथ यांनी सोडली. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राष्ट्रवादीला मुठमाती देऊन भाजपात प्रवेश केल्यावर आदिवासींसह इतर सर्वाधिक मतदारांनी यांच्याकडे पाठ फिरवली. यामुळेच आदिवासींबद्दल पुळका दाखवून आता हे नामकरणाचा घाट घालत आहेत, असा उपरोधिक टोला अशोक भांंगरे यांनी लागावला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांंगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे, विठ्ठल खाडे, आनंदराव खाडे, धीरेंद्र सगभोर, शरद कोंडार उपस्थित होते.