अकोल्यात लोकप्रतिनिधीकडून महिला कर्मचार्‍याच्या जिवातास धोका.! तीने स्वत:चे मंगळसुत्र मोडून सरकारी योजना राबविली.!

 


सार्वभौम (राजूर) :-      

                     नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात तहसिलदार ज्योती देवरे यांनी सुसाईड नोट करुन ठेवली आहे. तेथील आमदार निलेश लंके यांच्या त्रासाला आपण कंटाळलो असल्याचे त्यांनी मांडले आहे. त्या पाठोपाठ आता अकोले तालुक्यातील राजूर परिसरात पिंपळदरा वाडी येथे देखील अंगणवाडी सेविकेला एक ग्रामपंचायत सदस्य मानसिक त्रास देऊन मारहाण करतो. इतकेच काय.! त्याची बहिन सरपंच असताना हाच तिच्या नावे सह्या करतो. यांनी गरोदर माता, सत्नदा माता, अमृत आहार या योजनेचे पैसे दिले नाही. शेवटी तक्रारदार चहाबाई भांगरे यांनी स्वत:चे मंगळसुत्र गहाण ठेऊन 20 हजार रुपये घेऊन ही योजना चालु ठेवली आहे. त्यामुळे, संबंधित महिलेने ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भगवंत भांगरे यांच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहाबाई पांडुरंग भांगरे (पिंपळदरावाडी) ही महिला आंगणवाडी सेविका आहे. तर याच ग्रामपंचायतीत साहेबराव भगवंता भांगरे हा तेथे सदस्य आहे. जेव्हा साहेबराव याने चहाबाई यांच्याकडे शेरे बुक मागितले तेव्हा त्या म्हणाल्या की, मी मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरते आहे. त्यामुळे, जरावेळ थांबा. तेव्हा साहेबराव हा स्वत: उठला आणि त्याने कपाट उचकण्यास सुरूवात केली. त्यावेळी चहाबाई म्हणाल्या की, थांबा.! तुम्ही कपाट उचकू नका. असे म्हणताच साहेबराव भांगरे याला राग आला आणि त्याने चहाबाई भांगरे यांना अश्लिल शिवागाळ दमदाटी करीत त्यांच्या तोंडात चापट मारली. तुला येथे नोकरी करु देणार नाही असे म्हणत त्याने महिलेस दम दिला असे फिर्यादीत म्हटले आहे.

तर, स्थानिक काही व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव याची ग्रामपंचायतमध्ये चांगलीच दमबाजी चालते. त्याची बहिन येथे सरपंच असून त्या टाकेद येथे राहतात. जर चहाबाई यांनी चेकवर सह्या घ्यायच्या असतील तर त्यांना एकतर टाकेद येथे जावे लागते तर कधी हे बहाद्दर थेट स्वत:च सह्या हाणतात. विशेष म्हणजे साहेबराव याने ते चेकबुक स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, गेल्या आठ महिन्यांपासून सगळा भोंगळा आणि मनमानी कारभार येथे सुरू आहे. यात उल्लेखनिय बाब अशी की, चहाबाई यांनी स्वत:च्या गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेऊन 20 हजार रुपये त्यापोटी घेतले आणि गरोदर माता, सत्नदा माता, अमृत आहार या योजना त्यांनी स्व-खर्चातून चालविल्या आहेत. म्हणजे 25 फेब्रुवारी 1927 रोजी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेऊन होस्टेलच्या मुलांना जेऊ घातले होते. त्यांचा आदर्श घेत चहाबाई यांनी सरकारच्या तीन योजना स्वत:चे मंगळसुत्र मोडून चालविल्या. तरी देखील त्यांच्या वाट्याला असा प्रकार यावा. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.

आता, अकोले तालुक्याचे बीडीओ यांनी या गोष्टीची चौकशी केली पाहिजे. जर कोणी बिन पगारी आणि फुल अधिकारी असा बर्ताव करीत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. चेक आणि त्यावर होणार्‍या सह्या यांची शाहनिशा केली पाहिजे. जर यात कोणी दोषी आढळले तर त्यांची सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव स्वत: तयार करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. तर ज्या आंगणवाडी सेविकेने स्वत:चे मंगळसुत्र गहाण ठेऊन योजना चालविली. ते जर खरे असेल तर त्यांचा सत्कार करण्याची औदार्य दाखविले पाहिजे. आता अंगणवाडी सेविकेंसाठी डॉ. अजित नवले हे न्यायासाठी पुढाकार घेतात. ते या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पहाणे महत्वाचे आहे. काही झालं तरी, या माऊलीच्या पाठीशी तालुक्याने उभे राहून लोकप्रतिनिधी म्हणून दादागिरी करणार्‍या व्यक्तींना धडा शिकविला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. तर, अंगणवाडी सेविकेवर हात उचलला म्हणून यात सहकारी कामात अडथळा हा गुन्हा का दाखल झाला नाही? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.