गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणणार्‍या आमदारांच्या शेजारीच 12 ठिकाणी घरफोड्या.! अर्धा किलो सोन्यासह 20 लाखांचा मुद्देमाल पोलीस निरीक्षकांच्या बंगल्यातही चोरी.!


सार्वभौम (अकोले) :-

                  अकोले तालुक्यातील प्रवरा तटावर वसलेल्या सहा गावांमध्ये एकाच रात्री 12 ठिकाणी घरफोड्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चितळवेढे, इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी, शेरणखेल, विठे अशा अनेक ठिकाणी चोरट्यांनी हात साफ करुन तब्बल अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यांसह 20 ते 30 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. हा प्रकार बुधवार दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी पहाटेच्या सुमारास घडला. यात राजूर व अकोले पोलिसांनी दोन फिर्यादी दाखल केल्या असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. यात एक विशेष बाब म्हणजे विठा येथे खुद्द पोलीस निरीक्षकाच्या घरावर चोरट्यांनी डाका टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सगळ्या गडबडीत एक वाक्य मात्र सोशल मीडियावर फिरत होते. ते म्हणजे, मी गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहे असे म्हणार्‍या आमदारांना आता काय म्हटले पाहिजे? म्हणजे, तालुक्यात अवैध धंदे, वाळु उपसा, जुगार, मटका आणि रेशन तस्करी देखील अंगवळणी पडली होती. आता मात्र, चोरटे आणि दरोडेखोर इतके सोकावले आहेत की, एकाच रात्रीत 12 ते 13 ठिकाणी डाका टाकण्याची धाडस त्यांची होऊ लागली आहे. असा प्रकार तर मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये देखील होत नसेल. अशी टिका आता तालुक्यात होऊ लागली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चोरट्यांनी अकोले तालुक्यातील डोंगराच्या कुशीत बसलेल्या शेरणखेल येथून आपल्या चोरीचे उद्घाटन सुरू केले. तेथे राजू पंढरीनाथ कासार यांच्या हॉटेलच्या गल्ल्यातील पाच ते सहा हजार रुपये तसेच भाऊसाहेब कासार यांच्या तेथे देखील चोरांनी चोरी केली. त्यानंतर शुल्लक रकमेत त्यांचे फावले नाही. त्यामुळे, ते खाली आले. त्यांनी मेहेंदुरीत आल्यानंतर येथील गोरख आरोटे यांचे हॉटेल फोडले तर माजी सरपंच रुपाली संगारे यांच्या घरात चोरी केली. तेथे त्यांना मुद्देमाल मिळाला. मात्र, त्यातून त्यांचे भागले नाही. त्यामुळे, ते पुन्हा खाली आले. इंदोरी येथे गणपत रुकारी व पांडुरंग आरोटे यांच्या घरी त्यांनी हात साफ केला. मात्र, तरी देखील त्यांचे मन भरले नाही. त्यानंतर चलो.! आज कुछ तुफानी करते हैं! या म्हणी प्रमाणे थेट विठे गाठले आणि यांनी विठे गावचे सुपुत्र तथा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आवारी यांच्या घरी देखील चोरी करुन पोलिसांना मोठे आव्हान दिले. खेदाची बाब अशी की, गेल्या काही महिन्यांपुर्वी अकोले शहराच्या नजिक माळेझाप येथे एकाच घरात दोन पोलीस. तरी देखील घरात चोरी झाली आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. झाले काय? तर साधा धागा सुद्धा पोलिसांच्या हाती लागला नाही.

आता या सगळ्या चोर्‍यांमध्ये विठ्या नंतर चितळवेढे येथील चोरीने मात्र अनेकांच्या मनाला धडकी बसली. कारण, येथे चोरांनी 13 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. यात इंदुबाई किसन आरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे तीन मेडिकल दुकाने आहेत. त्यामुळे, मुले ही दुकाने संभाळतात. तर मंगळवार दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी मी जेवण करुन गेटचा मुख्य दरवाजा लावून झोपले होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मला घराचा गेट खोलल्याचे आवाज आला. तेव्हा मला वाटले की, मुलगा आला असेल. म्हणून मी आवाज दिला. मात्र, मला प्रतिउत्तर आले नाही. त्यामुळे, मी उठून मुख्य दरावाजाकडे गेले तर ते उघडे दिसले. घरात लाईट व फॅन देखील चालु होता. त्यावेळी मी पाहिले की, बाहेर एका पल्सर गाडीवर एक लायनिंगचे टि-शर्ट, काळी पॅन्ट असा पोषाख असणारे दोन तरुण उभे होते. त्यांना मी पाहिले असता ते तत्काळ तेथून पळुन गेले.

दरम्यान, मी घरात येऊन पाहिले तर घरातील कपाट आणि अन्य साहित्यांची पुर्णत: उचकापाचक केलेली होती. तेव्हा कपाटात पाहिले तर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम देखील दिसली नाही. त्यानंतर मी लगेच माझ्या मुलास फोन केला. तो आल्यानंतर त्याने पाहिले की, 5 लाख रोख रक्कम, 2 लाख 80 हजार रुपयांचे 7-7 तोळ्याचे 2 गंठण, 2 लाख 40 हजार रुपयांचे 12 तोळ्याच्या सहा बांगड्या, 40 हजार रुपयांच्या तीन अंगड्या, 1 लाख 20 हजार रुपयांच्या 3 चैन, 20 हजार रुपयांचे 1 मिनी गंठण, 60 हजार रुपयांचे 60 मणी असलेले मंगळसुत्र, 60 हजार रुपयांचे कानातले 4 जोड डुल, कर्णफुले, 10 हजार रुपयांचे गणपती पँडेल, 10 हजार रुपयांची सोन्याची पट्टी, 5 हजार रुपयांची एक कानातली बाळी, 5 हजार रुपयांची गणपतीची चांदीची मुर्ती, 5 हजार रुपयांचे चांदीचे ब्रॅसलेट असा 13 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. अर्थात ही एक सरकारी अंदाजे किंमत आहे. मात्र, यापेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल गेल्याचे लक्षात येते.

आता यातून एक गोष्ट लक्षात येते की, पहिल्यांदा या चोरांनी म्हाळदेवीच्या देवाची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उंचखडक बु येथील श्री. सदगुरू यशवंत बाबा महाराज यांच्या देवळात असलेली दानपेटी फोडली, त्या पाठोपाठ गुरवझाप येथील पिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी हेच प्रकार झाले. मात्र, दुर्दैवाने पोलीस प्रशासनाला या टोळीला जेरबंद करण्यात अपयश आले. त्यामुळे, त्यांची मजल आता इतकी वाढली. की, त्यांनी मंदिरे सोडून थेट पोलीस अधिकारी आणि घरा बंगल्यांवर दरोडे टाकण्याचे काम सुरू केले आहे. आता प्रवरा पट्ट्यात चोरट्यांची प्रचंड मोठी दहशत निर्माण झाली आहे. काही काळापुर्वी लोक बिबट्याला घाबरत होते. आता मात्र, लोक चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे, गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणार्‍या आमदारांनी त्यांच्या शब्दाप्रमाणे वागून आपण कर्दनकाळ आहोत की सुकाळ हे दाखवून दिले पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. विशेष म्हणजे, अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे दोन्ही तरुण व कार्यक्षम अधिकारी आहेत. ते चोरट्यांना नक्की बेड्या ठोकतील अशी जनतेने आशा व्यक्त केली आहे. 

खरंतर, अकोले पोलीस ठाण्यात फक्त १३ कर्मचारी कामासाठी उपलब्ध आहेत. तर त्यांच्या अंतर्गत ९४ गावे आहेत. तसेच राजूर पोलीस ठाण्यात देखील अवघे ५ ते ६ कर्मचारी कार्यक्षम आहेत. त्यामुळे, तालुक्यात जे दोन पोलीस अधिकारी नरेंद्र साबळे व मिथुन घुगे आहेत. त्यांची पोलीस ठाणे चालविताना फार मोठी कसरत होते. आता नवे म्हणजे तरुण अधिकारी असल्यामुळे ते सर्वाधिक वेळ पोलीस ठाण्याला देतात. पण, ते देखील मानसे आहेत. त्यांनाही कुटुंब आहेत, त्यांचेही शरिराला मर्यादा आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे शारिरीक स्वास्थ्य बिघडू लागले आहेत. त्यामुळे, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अकोले व राजूर पोलीस ठाण्यात कर्मचारी व दुय्यम दर्जाचे अधिकारी देणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे संगमनेर प्रमाणे येथे कडक अधिकारी नाहीत, वेळोवेळी हे कागदाची भाषा करत नाही. त्यामुळे, येथे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आता डॉ. किरण लहामटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी चर्चा करुन तालुक्यासाठी आगाऊ किंवा जो काही  कोठा असेल तितके कर्मचारी दिले तरी तालुक्यावर उपकार होतील. जर असे झाले तर पोलिसांना गावोगावी नाईट पेट्रोलिंग करता येईल, गुन्ह्यांची निर्गती करता येईल. गुन्ह्यांच्या तपासाला पथके पाठविता येतील. अन्यथा आज आशी परिस्थिती आहे की, सकाळी काम करणारा कर्मचारी पुन्हा नाईट करतोय, तपास करतोय, बंदोबस्त करतोय, कागदी घोडे नाचवतोय. त्यामुळे, आता आहे त्या यंत्रणेवर जोर काढण्यापेक्षा आगाऊ कर्मचारी कसे येतील. याकडे लोकप्रतिनिधिनी लक्ष दिले पाहिजे. असे जनतेचे मत आहे.