कॉलेजचा प्राचार्य व महिला लिपिक दिड लाख मागताना रंगेहाथ.! लाचलुचपतचा छापा, दोघांना अटक.!
सार्वभौम (श्रीरामपूर) :-
डॉक्टरकी व इंन्टरशिप पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य व त्यांचे लिपीक या दोघांनी मिळून एका विद्यार्थीनिकडे 1 लाख 47 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार होमिओपॅथी मेडिकल कॉलेज वडाळा महादेव ता. श्रीरामपूर येथे 12 ऑगस्ट 2021 रोजी घडला. यात नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने भ्रष्टाचारी प्राचार्यासह त्याच्या पित्तुस ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाचेतला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. याप्रकरणी कॉलेजचा प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (रा. मानुर, ता. राहुरी) व भारती बापुसाहेब इथापे (रा. निपाणी वडगाव, श्रीरामपूर) यांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूूर तालुक्यात वडाळा महादेव येथे एक होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे. तेथे औरंगाबाद जिल्ह्यातील झोडेगाव येथील एका मुलीने बी.एच.एम.एस साठी प्रवेश घेतला होता. तिचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने कॉलेजकडे त्याचे बी.एच.एम.एस पुर्ण झाल्याचे व इंन्टरशिप पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र मागितले होते. मात्र, होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे लाचखोर प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे याने संबंधित विद्यार्थिनीकडे 1 लाख 47 हजार 500 रुपयांची मागणी केली. हा प्रकार संबंधित मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. त्यामुळे, त्यांचे डोके अक्षरश: संतापून गेले. एकीकडे कोरोनाचा काळ सुरू आहे. सामान्य शेतकरी माणूस हवालदिल झाला आहे. अशात हे कॉलेज लुटारुपणाचा भूमिका घेत असल्याने पालकाना मनस्ताप झाला.
दरम्यान, झोडेगाव येथील पालकांनी दि. 10 ऑगस्ट रोजी थेट नगर गाठले आणि त्यांनी लाचलुचपतचे पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार खेडकर यांच्या पथकाने आज दुपारी नियोजनपुर्वक सापळा रचला आणि लाचखारांना लाच घेताना रंगेहात पकडले. यावेळी, जेव्हा तक्रारदार कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडे बी.एच.एम.एस पुर्ण झाल्याचे व इंन्टरशिप काळात हजेरीची अॅडजस्टमेंट करुन प्रमाणपत्र देण्यासाठी 1 लाख 47 हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली. तेव्हा संबंधित रक्कम रोख देताना आरोपी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे व भारती बापुसाहेब इथापे (रा. निपाणी वडगाव, श्रीरामपूर) यांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
दरम्यान, याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या नावे काही कॉलेज आणि फॅकल्टीज काढण्यात आल्या आहेत. येथे यापुर्वी काही अनुचित प्रकार झाले होते. तर काहींची वाच्चता देखील झाली नाही. पवार साहेब, दादा, ताई यांच्या नावाने श्रीरामपुरात कॉलेज चालविले जाते आणि तेथे अशा प्रकारची लाचखोरी सुरू आहे अशा प्रकारची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. प्राचार्य जर दिड लाखाच्या आसपास रक्कम विद्यार्थ्याकडून उकळतो आणि त्याची चुनूक सर्वेसर्वा यांना लागत नाही. ही आश्चर्याची बाब आहे. आज लाचलुचपत विभागाच्या कारवाईने नगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपाधिक्षक सतिश भामरे, पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक कारंडे, संतोष शिंदे, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, हारुण शेख, राहुल डोळसे यांनी केली. जेव्हापासून सुनिल कडासणे यांनी लाचलुचपत विभागाचा पदभार स्विकारला आहे. तेव्हापासून पाच जिल्ह्यांमध्ये वर्ग एकच्या अधिकार्यांपासून ते अगदी शिपाई आणि खाजगी हस्तक अशा व्यक्तींना बेड्या ठोकण्याचे काम त्यांच्या पथकाने केले आहे. तर नगर जिल्ह्यात खेडकर यांचे काम देखील निर्भिड आणि उल्लेखनिय तसेच विश्वासहार्य असल्याचे बोल जनतेतून उमटत आहे. जर कोणी लाच मागत असेल तर 1064 तसेच 0241-2423677 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहान करण्यात आले आहे.