अकोले-संगमनेरच्या मद्यधुंद पर्यटकांकडून पोलिसाचे कपडे फाडून दगडाने मारहाण.! चौघे जखमी, सहा जणांवर गुन्हा दाखल.!


- आकाश देशमुख

सार्वभौम (अकोले) :- 

            भंडारदर्‍याच्या पाण्यात एकजण बुडाल्यामुळे तेथे अन्य पर्यटकांना तेथे जाण्यास पोलीस व स्थानिक कर्मचारी यांनी बंदी घातली होती. मात्र, अकोले व संगमनेर तालुक्यातील मद्यधुंद पर्यटकांनी भंडारदर्‍याच्या स्पिल्वे जवळच राडा घातला. हा प्रकार येथेच थांबला नाही तर, पर्यटकांनी पोलिसांना शिवीगाळ दमदाटी करुन त्यांची वर्दी फाडली, तसेच त्यांना समजावून सांगणार्‍या स्थानिक व्यक्तींना देखील बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार दि. 9 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रविंद्र रंगनाथ गोंधे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लॉकडाऊन नंतर पर्यटन खुले केल्यामुळे भंडारदरा परिसरात मोठी गर्दी दाटली आहे. त्याचे सुयोग्य नियोजन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले असून येथे अद्याप एकही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना निरोप आला की, स्पिल्वे जवळ कोणीतरी व्यक्ती पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे, तेथे उपस्थित असणारे संजय शिंदे, प्रकाश खाडे, विठ्ठल अंबवणे, निवृत्ती खाडे, विष्णु वैराट यांनी त्यास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळाला नाही. त्यामुळे तेथे पोलीस उपनिरीक्षक खैरनार हे आले असता त्यांनी शेंडी गावात जाऊन पोहण्यात निष्णात असणारे लोक आणले. तरी देखील त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. मात्र, तेथे त्याचे बुट आणि सॉक्स असे अन्य साहित्य मिळून आले ते पोलिसांनी हस्तगत केले.

दरम्यान, असा प्रकार परत घडू नये, यासाठी साबळे साहेब यांनी पोलिस कर्मचार्‍यांना तसेच स्थानिक व्यक्तींना सुचना केल्या की, आता असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी तुम्ही या स्पिल्वे जवळ कोणाला जाऊ देऊ नका. त्यामुळे. हे सर्वजण तेथेच उभे राहिले. यावेळी तेथे अकोले व संगमनेर तालुक्यात काही पर्यटक आले व त्यांनी सांगितले की, आम्हाला तुम्ही आडवू नका. जेव्हा हा व्यक्ती पोलिसांशी बोलत होता तेव्हा त्याच्या तोंडाचा वास येत होता. त्यामुळे तो पिलेला आहे हे लक्षात आले. त्यामुळे, स्थानिक व्यक्तीनी या तरुणांना तेथे जाण्यास रोखले. मात्र, झिंगाट झालेले हे कार्यकर्ते ऐकतील ते बहाद्दर कसले? त्यांनी स्थानिक व्यक्तीच्या थेट एक चढविली. त्यानंतर दुसरा पुढे झाला त्याने एक दगड स्थानिक व्यक्तीच्या तोंडावर फेकून मारला. आम्ही पोलिसांचे ऐकत नाही तर तुम्ही कोण? असे म्हणत दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली. यात प्रकाश खाडे व संजय शिंदे हे जखमी झाले.

दरम्यान, हा प्रकार सोडविण्यासाठी पोलिस मध्ये पडले असता या मद्यपींनी रविंद्र गोंधे यांची कॉलर पकडून ती ओढली, तर त्यांच्या शर्टाची नेमप्लेट आढून फेकूण दिली. तसेच त्यांना जोराने ढकलुन दिले. त्याच वेळी परते यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केलेे. तसेच शिवीगाळ दमदाटी करीत त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर घडला प्रकार साबळे यांना सांगितला असता त्यांनी या पर्यटकांच्या दोन्ही गाड्या राजूर पोलीस ठाण्यात आणल्या. तेथे आणल्यानंतर जर पोलिसांच्या डोक्यात कोणी दगड मारत असेल आणि खाक्या वर्दीची कॉलर कोणी पकडत असेल तर त्यांचे काय हाल झाले असतील हे आता काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांना आठ पंधरा दिवस बसता येते की नाही.? हेच पहाणे उत्सुकतेचे ठरेल.

हा सर्व लावाजमा पोलीस ठाण्यात आला असता त्यांना त्यांच्या नावाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा काही वेळापुर्वी शुद्ध हरपलेले हे पर्यटक आता पोलिसांनी पुर्णत: शुद्धीवर आणले होते. त्यात अजित बाळासाहेब शिंदे, (रा. ठाणगाव, ता. सिन्नर), किरण कोंडाजी उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), विनोद संतोष औटी (रा. वाघापूर, ता. अकोले), ज्ञानेश्वर विश्वास कदम (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले), आकाश सतिष उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), ज्ञानेश्वर गणपत लांडगे (रा. वडगाव लांगडा, ता. संगमनेर) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे. यांच्यावर राजूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सहकार्य करा काळजी घ्या.!

पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी आहेत. तेथे एक व्यक्ती बुडाला म्हणून पुढे काही अनर्थ होऊ नये हाच आमचा हेतू होता. मात्र, दुर्दैवाने पोलीस म्हणजे दुष्मण वाटणे हे फार वेदनादायी आहे. मद्यपी करून अशा पद्धतीने धोक्याच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, स्वत:च्या जीवाला इजा होईल असे कृत्य कोणी करू नये, तालुक्याला इतका सुंदर नैसर्गिक ठेवा लाभला आहे. त्याचे प्रत्येकाने जनत केले पाहिजे. कोणी आपल्याला समजून सांंगण्यापेक्षा आपण स्वत: काही गोष्टी समजून घ्याव्यात. या भागातील लोक चांगले व प्रामाणिक असून त्यांच्याशी कोणी गैरव्यवहार करणे अयोग्य आहे. त्यामुळे, पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

- नरेंद्र साबळे (सहा.पो.नी)