टोल नाक्याला शिवसेनेचा आहेर.! अधिकाऱ्यास जाब विचारुन काढला कार्यालयाच्या बाहेर.! फास्टॅग नव्हे ही पठाणी वसूल बंद करा!

 

 

 - सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) : - 

          विकास जनतेसाठी असतो की, सामन्य जनतेला त्रासदायक ठरवण्यासाठी हेच कोडे आतापर्यंत सुज्ञ समाजाला उलगडले नाही. कारण, सरकारने पुणे-नाशिक हायवेचा विकास केला खरा. पण, आता त्याचे दुष्परिणाम संगमनेरमधील नागरिकांना सोसावे लागत आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर मध्यवर्ती असणाऱ्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांकडुन फास्टॅगच्या नावाखाली रोज पठाणी वसुली करत असल्याचे पाहायला मिळत आहे. टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य केले. परंतु यामध्ये हजारो रुपयांची लुट तेथील व्यवस्थापनाकडून स्थानिक नागरिकांची होत आहे. गाडीच्या नंबरसह संपूर्ण डाटा घेऊन टॅग आयडी बँक पोर्टलवर अपडेट करून पैसे कट करतात अशी तक्रार देखील दिलेली आहे. परंतु , रोजच स्थानिकांकडून हजारो रुपयांची लुट होत आसल्याने शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर हे जाब विचारण्यासाठी गेले असता आहेर यांचेसह अन्य दोन शिवसैनिकांवर टोलनाका व्यवस्थापनाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

                दरम्यान, हिवरगाव पावसा येथील टोलनाका हा वारंवार वादग्रस्त राहिला आहे. टोलनाक्यावर रोजच वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये शिवीगाळ बाचाबाची होत असल्याचे पहायला मिळते आहे. हे लोक स्थानिक नागरिकांकडून देखील टोलवसुल करीत असल्याने टोलनाक्यावर नेहमी  वादसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते असे आहेर यांनी म्हटले आहे. अनेक वेळेस स्थानिक नागरिकांचे शहरात व लगत असलेल्या गावांमध्ये या टोलनाक्यावरून येणे जाणे असते. त्यांना टोलनाक्यावर हटकवले जाते अडवणूक केली जाती व त्यांच्याकडून धिटाईने टोल वसुल केला जातो. यामुळे काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या टोलनाक्यावर आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांनी टोलनाका देखील फोडला होता. त्यामुळे, तात्पुरता स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु, आता पुन्हा फास्टॅगच्या नावाखाली स्थानिक नागरिकांची टोलनाका व्यवस्थापन लुटमार करत असल्याचे आहेर यांचे म्हणणे आहे

                बहुचर्चित पुणे नाशिक या महामार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर टोल वसुल करून संबंधित कंपनीने आपला परतावा वसुल करण्यास प्रारंभ केला. मात्र, या रस्त्यावरील अपुर्ण काम सामन्य नागरिकांच्या मुळावर उठले आहे. कारण, रस्त्याच्या लगत असणाऱ्या गटारी अपुर्ण आहे. त्यामुळे, रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सर्व पाणी जाते. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. येवढेच काय.! या नालीं मध्ये मृतदेह देखील आढळुन आले आहे. या अपूर्ण कामामुळे गेल्या 6 ते 7 वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. निष्पाप नागरिकांचा बळी गेला. वाहतुक कोंडीमुळे हजारो कोटी रुपयांचे बहुमूल्य इंधन वाया गेले आणि लक्षावधी नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले आहेत. येथेच हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडवला हे सर्व माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड देखील केले आहे. मात्र, याची खंत ना कंत्राटदाराला ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला. निर्लज्ज पणाचा कळस असा की, दरवर्षी इमानेइतबारे कंत्राटदाराला टोलचे दरवाढण्यास मदत होते. पण येथे प्रशासनाकडून कारवाई मात्र शुन्य. त्यामुळे, या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत, सर्व्हिसरोड अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही आणि जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनिय आहे. हा टोलरोड असल्याने या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे. ज्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, आज या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. वाहनचालकांकडुन टोलची वसुली केली जाते मात्र, त्यांना त्या प्रमाणात सुविधा नाही. त्यामुळे, गेली 6 ते 7 वर्षे हाल अपेष्टा सहन करणाऱ्या लाखो वाहन चालकांवर हा टोलनाका ''जखमेवर मीठ चोळण्यासारखा" करीत आहे अशी संतप्त टीका वाहनचालकांकडून होत आहे.

            दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे देखील टोलनाका उभारण्यात आला होता. तेथे टोलवसुल करत होते. मात्र, स्थानिकांना विचारात न घेतल्यामुळे व अपूर्ण कामकाजामुळे त्या टोलनाक्यावर वारंवार स्थानिक नागरिकांनी व लोकप्रतिनिधीनी  आंदोलन केले. आजतागायत तो टोलनाका बंद आहे. तीच परिस्थिती संगमनेर मधील टोलनाक्यावर देखील दिसत आहे. कारण, टोलनाक्यापासुन काही अंतरावर असणाऱ्या रायतवाडी फाटा येथे शेकडो ऍक्सिडंट झाले आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तेथील स्पीडब्रेकर संपुर्ण सपाट झाले आहे. त्यामुळे, संगमनेर शहरात जाणाऱ्या गाड्या व नाशिक हायवेला हायस्पीडने जाणाऱ्या गाड्या यांमध्ये ऍक्सिडंट होताना पाहायला मिळत आहे.

फास्टॅगच्या नावाखाली स्थानिक नागरिकांकडून टोलप्रशासन भरमसाठ लुट करत आहे. गाडीला फास्टॅगचा टॅग नसला तरी गाडी नंबर संपूर्ण डाटा घेऊन व आधारकार्ड बँक पोर्टलवर अपेडत करून पैसे खात्यातून कट करतात. पण, हे पैसे  दोन-तीन दिवसांनंतर कट करत असल्याने सामान्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. पण आता यापुढे हे खपवुन घेतले जाणार नाही. जर निवेदन देऊन सांगुन देखील संगमनेरकरांना टोलमाफ होत नसेल तर शिवसेना पुन्हा एकदा शिवसेना स्टाईल उत्तर देईल.

- जनार्दन आहेर (शिवसेना तालुका प्रमुख)

स्थानिक नागरिकांची टोल वसुली करण्यासाठी टोलनाकाप्रशासन स्थानिक नागरिकांसोबत वारंवार हुज्जत घालते. यामुळे टोलनाकाप्रशासना विरुद्ध स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. स्थानिक नागरिकांची दिशाभूल करून जर टोल वसुल करत असेल तर युवासेना शांत बसणार नाही.

   - गुलाबराजे भोसले (युवासेना तालुका प्रमुख)

तर, जनार्दन आहेर यांनी जनतेसाठी जो काही प्रश्न हाती घेतला आहे. त्याला संगमनेरकरांनी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे. कारण, हा राजकीय प्रश्न नव्हे तर सामाजिक आणि जनतेच्या लुटीचा प्रश्न आहे. रोज ये-जा करायची आणि दिवसभर कमाई नाही तितकी टोकनाक्याच्या घशात घलायची. शेतकरी, नातेवाईक, स्थानिक लोक, पाहुणे, नोकरदार यांना या टोलनाक्याचा धसका पडला आहे. त्यामुळे, बाहेरच्यांकडून टोल घेऊ नये असे आमचे मत नाही. मात्र, स्थानिक लोकांना तरी यांनी लुटू नये असे आमचे मत आहे. आहेर यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याचा आम्ही निषेध करतो. कारण, त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्या उद्रखाला टोल प्रशासनच जबाबदार आहे. खरंतर, उलट त्या वाद घालणाऱ्या व्यक्तींना कामाहून काढून टाकले पाहिजे. कारण, पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर गेल्या आठवड्यात वाद झाले होते. त्यात महिला डॉक्टरांशी टोलनाका कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली होती. तेव्हा त्या व्यक्तींना थेट कामाहून काढून टाकण्याचे आदेश टोलनाक्याचे राज्याचे नोयडा येथील अधिकारी यादव साहेब यांनी दिले होते. त्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले. तशी तक्रार पुढे करुन यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारण, चोर तर चोर आणि वरुन शिरजोर अशी एक म्हण आहे. तशी धिटाई टोल वाल्यांकडून सुरु आहे.

         - संदिप घोलप (सा. कार्यकर्ता)