तो जाता-जाता म्हणाला, नळपट्टी मागितली तर तुम्हा सगळ्यांचा खात्मा करीन, ग्रामसेवकाला धक्काबुक्की व धमकी, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (अकोले) :-
एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे काही नागरिकच ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या बोकांडी बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक प्रकार केवळ नळपट्टी भर असे म्हटल्याच्या कारणाहुन अकोले तालुक्यातील कोळी ओतूर येथे घडला. मी नळपट्टी भरणार नाही काय करायचे ते कर, तू आमचा नोकर आहेस, फक्त माझे नळ कनेक्शन तोडून दाखव तुमच्या एक-एकाचा खात्मा करुन टाकीन अशा प्रकाची धमकी देत सरकारी टेबलावरील साहित्य एका व्यक्तीने लोटून दिले. याप्रकरणी ग्रामसेवक रविंद्र ताजणे (रा. अकोले, ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अरुण गोपिनाथ वालपडे (रा. केळी ओतूर, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 7 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रविंद्र सहादु ताजणे हे ग्रामसेवक त्यांच्या केळी ओतूर या कार्यालयात गेले होते. गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावली होती. त्यावेळी तेथे शिपाई तुकाराम वायाळ, संगणक ऑपरेटर विकास शेंगाळ, पाणी पुरवठा करणारा कर्मचारी सागर लोहकरे, पोलीस पाटील राजेंद्र वायाळ, सरपंच गणेश वायाळ हे उपस्थित होते. या दरम्यान तेथे वसुलीचा विषय निघाला असता ग्रामसेवक यांनी तीन वर्षे नळपट्टी न भरलेल्या अरुण वालपडे याला पाणीपट्टी भरण्यास निरोप दिला. त्यावेळी हे महाशय ग्रामपंचायतमध्ये आला असता त्यांना नळपट्टी संदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी वालपडे याने थेट आगरा-उगरीची भाषा करीत उपस्थित सगळ्यांवर तोंडसुख घेतले.
मी पाणीपट्टी भरणार नाही. तुला काय करायचे ते करुन घे. तू आमचा नोकरी आहेस, जास्त शहाणपणा करुन नकोस असे म्हणत मोठमोठ्याने शिवीगाळ केली. यावेळी ग्रामसेवक ताजणे यांनी त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐकेल तो समझदार कसला? त्याने रागाच्या भरात ग्रामसेवक यांना धक्काबुक्की व शिवीगाळ दमदाटी करीत टेबलावर असणारे सर्व साहित्य अस्तव्यस्त केले. त्यावेळी सरपंच आणि पोलीस पाटील यांनी आरोपी वालपडे यास ग्रामपंचायतीतून बाहेर काढून दिले. तर जाता-जाता तो म्हणाला की, मी पाणीपट्टी भरणार नाही, तुम्ही जर माझे नळ कनेक्शन तोडले तर मी एकएकाचा खात्मा करीन असे म्हणत तो चालता झाला. भर गावात झालेला हा नंगानाच ग्रामसेवक यांनी बीडीओ यांना कथन केल्यानंतर ताजणे यांनी कायदेशी मार्गाने वालपडे याच्यावर सरकारी कामात आडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आता गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांनी आरोपी अटक केलेला नाही. कलम 353 हा सेशन कमीट गुन्हा असून एका सरकारी अधिकार्यांवर हात टाकण्याचे धाड या व्यक्तीने केले आहे. तरी देखील आरोपी सकाळपासून गावात होता मात्र, तो पळाल्यानंतर पोलिसांनी गावाला भेट दिली. म्हणजे, आमदाराला शब्दभर विचारले की, साहेब तुम्ही कोणत्या पक्षेचे? तर त्या नवनाथ काळे यांनी अवघ्या तीन तासात अटक करुन त्याला रात्रभर जेलमध्ये ठेवले. दुसरीकडे लिंगदेव येथे अगदी शुल्लक प्रकार झाला तर पोलीस गुन्हा दाखल होण्यापुर्वी घरी पोहचले आणि ग्रामसेवक आणि अन्य अधिकारी व पदाधिकारी यांना खात्मा करण्याची धमकी देऊन देखील आरोपी मोकाट फिरतो. म्हणजे, किती मोठी ही तत्परता? एकीकडे एका आरोपीला आणण्यासाठी पोलीस फिर्यादी आणि आरोपी अशा दोघांकडून प्रत्येकी 10 हजार म्हणजे एकच गाडी आणि दोन भाडे असे पैसे उकळतात, त्याची चौकशी आता सुरू झाली आहे. मात्र, असे असताना यांनी ग्रामसेवकाकडून आरोपी पकडून आणण्यास यांनी गाडी मागितली तर तत्काळ आरोपी अटक होऊ शकतो. अशा प्रकारची मिश्कीन टिका पोलिसांवर होऊ लागली आहे.
खरंतर केळी ओतूर हे एक आदर्शवत गाव आहे. येथे कोरोनाच्या काळात अधिकार्यांनी आपल्या जिवाची परवा न करता नागरिकांचे रक्षण केले आहे. त्याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. याच गावात या अधिकार्यांनी 112 घरकुले मंजूर करुन दिली आहेत, 134 शौचालये, 407 वृक्षांची लागवड व त्याचे संगोपण, दलित वस्तीत 15 लाखांची कामे, अदिवासी उन्नतीसाठी 30 लाखांची कामे, रोजागार हमी, रस्ते, पाणी, शाळा सुधारणा आणि सुशाोभिकरण अशा अनेक योजना राबविल्या आहेत. विशेष म्हणजे कोविडच्या काळात देखील हे गाव सुरक्षित होते. तरी देखील अशा प्रकारे अधिकार्यांवर हात उचलणे किंवा अश्लिल शब्दप्रयोग करणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे, गावात नको ती दहशत माजविणार्या व्यक्तींना धडा शिकविला पाहिजे. अशा प्रकारची मागणी गावकार्यांकडून होत आहे.