ग्रामपंचायतीत २५ लाखांचा घोटाळा करणारा सरपंच पोलिसाच्या जाळ्यात, ग्रामसेवक अद्याप दडूनच.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरात एकीकडे बडे-बडे अधिकारी छोट्या- मोठ्या रकमेच्या लाचखोरीत पकडत आहे. तर दुसरीकडे सरपंच व ग्रामसेवक लाखो रुपयांचे घोटाळे करत असल्याचे उघड होत आहे. असाच एक प्रकार सरोळे पठार येथे समोर आला होता. तेथील माजी सरपंच व ग्रामसेवकाने विविध योजनांमध्ये गैरव्यवहार करून संगनमताने ग्रामपंचायतीचा 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा निधी स्वतःच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण कायद्यावर येताच सरपंच व ग्रामसेवक फरार झाले होते. यामध्ये माजी सरपंच प्रशांत गवराम फटांगरे याला घारगाव पोलिसांनी रविवार दि.11 जुलै रोजी बेड्या ठोकल्या असुन न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, दुसरा आरोपी ग्रामसेवक सुनील शंकर शेळके अद्यापही फरार आहे. पाच महिने उलटूनही ग्रामसेवकाचा शोध घेण्यास पोलीस अपयशी राहिले आहे. त्यामुळे, अजुन किती दिवस आरोपी फरार राहणार.? की, यामध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप होत आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, आरोपी प्रशांत फटांगरे यांना अटक होऊ नये म्हणुन अनेक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचे बोलले जाते. मात्र, ते सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. त्यामुळे, ग्रामसेवकाना देखील सुटका नाही. अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र, माजी सरपंच प्रशांत फटांगरे याला अटक झाल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2012 -13 साली सारोळेपठार येथे आरोपी प्रशांत गवराम फटांगरे याची सरपंच म्हणुन निवड करण्यात आली होती. त्यावेळी तेथे भ्रष्टाचारी ग्रामसेवक सुनिल शेळके हा कार्यरत होता. या दोघांनी मिळून कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता आपला मनमानी कारभार सुरू ठेवला होता. सन 2014-15 ते 2017-18 या कालावधीमध्ये गावात येणाऱ्या वेगवेगळ्या कामांमध्ये रग्गड पैसा कसा कमवता येईल या उद्देशाने मिळेल त्या कामात पैसे कमावण्याची संधी यांनी सोडली नाही असे त्यांच्यावर आरोप होते. त्यामुळे, हे लाखो रुपये लुटुन काम असणार तरी कसे? या सर्व निकृष्ट कामांमधील त्रुटी गावातीलच एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आल्या. त्याने या भ्रष्ट व्यक्तींच्या विरोधात बंड पुकारून सरपंच व ग्रामसेवकाच्या विरोधात दि. 25 जानेवारी 2020 रोजी गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावर सखोल चौकशी करण्यासाठी बीडीओ सुरेश शिंदे यांनी व्हि.एस. जोंधळे, आर. एस. कासार, बी. बी. वाघमोडे या तीन विस्तार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने अगदी पारदर्शी व निर्भीड तपास करून दि.31 जुलै 2020 रोजी चौकशी अंती अहवाल दाखल केला होता. त्यात भ्रष्ट ग्रामसेवक सुनील शंकर शेळके व सरपंच प्रशांत फटांगरे हे दोघे ही दोषी आढळुन आले होते.
दरम्यान, कायदेशीर या दोघांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यांच्याकडुन वेळीच त्यास उत्तर मिळाले नाही. सरपंच यांनी धास्ती घेत उत्तर दिले नसले तरी ग्रामसेवक यांना नोकरी कारणाने उत्तर देणे अनिवार्य होते. त्यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी आपले लेखी म्हणणे सादर केले. शासनाने ज्या पद्धतीने निधी दिला होता. त्याचा योग्य ठिकाणी वापर होणे गरजेचे होते. तेथे तो झाला नाही. त्यात अंदाजपत्रक घेणे , मुल्यांकन करून घेणे, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मंजुरी घेणे असे कायदेशीर कुठलेच पालन न करता. या दोघांनी मनमानी कारभार करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होता. यात प्रशांत फटांगरे याने 16 लाख 13 हजार 720 रुपये स्वतःच्या नावे काढले. तर भ्रष्ट ग्रामसेवकाने 9 लाख 8 हजार 191 रुपये स्वतःच्या नावावर काढले. या सर्व चौकशीतून असे निष्पन्न झाले की, या दोघांनी मिळवुन शासनाच्या पैशांचा अपहार करून शासनाची फसवणुक केली आहे.
दरम्यान, या दोघांवर जे काही आरोप करण्यात आले होते ते सिद्ध झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी काही सबळ कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केली होती. त्यानंतर, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी संगमनेरच्या गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी आरोपी सरपंच प्रशांत फटांगरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्यापही भ्रष्ट ग्रामसेवक गेली पाच महिन्यांपासून फरार आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत करत आहे.
खरंतर, अनेक गावांमध्ये गावच्या विकासासाठी लाखो आणि कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतो. मात्र, आजकाल बहुतांश ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक संगमताने फार मोठा भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप वारंवार होतात. संगमनेर मधीलच मंगळापुर गावात अनेक कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अंदाजपत्रकात निश्चित केलेल्या जागेपेक्षाही कमी जागेत काम, तेही काम अपूर्ण असली तरी बिले काढण्यात आली तसेच झालेली कामे नित्कृष्ट दर्जाची आशा तक्रारी मंगळापूर गावातील ग्रामस्थांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकारी देखील कर्मचाऱ्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप आता मंगळापूर मधील ग्रामस्थ करत आहे. आता संगमनेरात एक भ्रष्ट ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. अशा अनेक तक्रारी आहेत ज्या प्रशासकीय कार्यलयात फक्त कागदावरच आहेत. अधिकारी देखील फक्त कागदी घोडे नाचवतात त्यामुळे अनेकांचा भ्रष्टचार दडला जातो आहे. त्यामुळे, निर्ढावलेल्या व्यवस्थेला जनता वैतागली असून आजकाल लोक थेट लाचलुचपत विभागाचा आधार घेऊ लागले आहेत. म्हणून तर संगमनेरात प्रती दोन महिने उलटत नाही. तोच अधिकारी गब्बरच्या जाळ्यात अडकू लागला आहे.