चोरट्याने दानपेटी फोडली आणि फाटक्या नोटा देवाला वाहिल्या.! हरीपाठाला एक मशीन ठेऊन तो पसार झाला.!
कोरोनाच्या काळात देऊळे बंद झाली आणि दर्शनाची दारे देखील बंद झाली. त्यावेळी पोलीस, डॉक्टर आणि नर्स यांच्यात अनेकांनी देव पाहिला. मात्र, याच दरम्यान काही माणसांमधील राक्षसांचे देखील दर्शन आपल्याला झाले. कारण, देऊळे खुले होतात कोठे नाहीतर या भस्मासुरांना देऊळातील दानपेट्यांवर डल्ला मारु पाहिला. तर काही ठिकाणी दानपेट्या फोडून हजारो आणि लाखो रुपये लंपास केल्याचे पहायला मिळाले. असाच एक प्रकार अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे घडला आहे. या भुरट्या चोरट्याने दानपेटी फोडून हजारो रुपये नेले खरे. मात्र, या पेटीतून ज्या काही फाटक्या नोटा होत्या. त्या या चोराने देवाला वाहिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, हा चोरटा इतका संवेदनशील कसा? असा प्रश्न उपस्थित होऊन अनेकजण आवाक झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराजांचे एक मंदीर आहे. तेथे नियमित झोपणार्या एक वारकर्याच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे होते. त्यामुळे ते दवाखाण्यात गेले होते. तर रात्री 10 ते पहाटे चार वाजेपर्यंत त्या दिवशी मंदीरात कोणी नाही. याची पुर्णत: खात्री चोरट्याला होती. त्यामुळे, या ठिकाणी जो कोणी व्यक्ती असेल तो निच्छित या परिसरात पाळत ठेऊन असणार यात गावकर्यांच्या मनात तिळमात्र शंका नाही. या चोरट्याने रात्री 12 ते पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मंदिरात प्रवेश केला. राम, लक्ष्मण, सिता आणि हनुमानाच्या समोर असणार्या दानपेटीला हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती लोखंडी आणि जड असल्यामुळे ती त्याला हलली नाही.
दरम्यान, दानपेटीला असणारे कुलूप त्याने एक स्क्रुच्या सहाय्याने उघडले आणि एका पिशवीत त्याने सर्व चिल्लर भरली. यावेळी दानपेटीत ज्या काही चांगल्या नोटा होत्या. त्या या चोरट्याने पिशवीत घातल्या आणि ज्या काही फाटक्या नोटा होत्या. त्यात देवाच्या समोर ठेऊन त्यांच्या स्वाधिन केल्या. म्हणजे इतका भामटा आणि संवेदनशील चोरटा आपल्याला शोधून सापडणार नाही. असा भावनिक प्रकार त्याने केल्याचे सकाळी लक्षात आले. इतकेच काय.! या चोराने मंदीरात असणारे दोन इको मशीन पाहिले आणि एक हरीपाठाला ठेवले तर दुसरे आपल्या सोबत घेऊन गेला. त्यामुळे, हा जगावेगळा चोर पाहुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, हा प्रकार सकाळी, पुजा करणार्या पंत महाराजांच्या लक्षात आला असता त्यांनी प्रतिष्ठीत गावकर्यांना त्याबाबत कल्पना दिली. दुसर्या दिवशी गुरूपौर्णिमा असल्यामुळे, संपुर्ण गाव राममाळ येथे आला होता. तेव्हा, चोरीचा हा प्रकार पाहिल्यानंतर अजब चोराची गजब कहाणी पाहिल्यानंतर पुन्हा इतिहासाला उजाळा मिळाला. कारण, दोन वर्षापुर्वी देखील अशाच प्रकारे येथील देवाची दानपेटी फोडण्यात आली होती. मात्र, कुलूप उघडले नाही. त्यामुळे, त्याच परिसरात दानपेटी ठेऊन चोरटे पसार झाले होते. तर याच गावात बहिरोबा महाराज यांची देखील दानपेटी फोडण्यात आली होती. त्यामुळे, कधी कोणाची वक्रदृष्टी न पडणार्या गावात आता असे प्रकार होऊ लागले आहेत. त्यावर गावकर्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. असे अनेकांचे मत आहे.
दरम्यान, उंचखडक बु येथील देवस्थानाला क वर्गाचा दर्जा आहे. मात्र, तेथे कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही नाहीत. गावात ग्रामपंचायतीचे जे सीसीटीव्ही आहेत ते देखील केवळ एक शोभेची वस्तू असून त्याचा काही एक फायदा नाही. विशेष म्हणजे याच गावात तीन वेळा चोरी आणि वेदांत देशमुख सारख्या चिमुकल्याचा जीव गावकर्यांनी गमविला आहे. असे असताना देखील गावकर्यांचे डोळे उघडत नाही. ही किती मोठी खेदाची बाब आहे. तालुक्यातील राजकीय स्थैर्य राखण्यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अक्षरश: हाणामार्या होताना आपण पाहिल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने गावाच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची उपायोजना येथे होताना दिसत नाही. इतकेच काय.! गावात ज्याला वाटेल तो कोठून आणि कसा गडी (बाहेरील कामगार) आणतो. तो कोठे जातो, काय करतो, त्याच्याकडे आधारकार्ड आहे का? त्याच्यावर गुन्हे आहेत का? याची कोणत्याही प्रकारचे खातरजमा न करता त्याला येथे वास्तव्य दिले जाते. त्यांना येथे घरकुले मंजूर होता. मग, कधी अपहरण तर कधी चोर्या असे गुन्हे होणार नाही तर काय? त्यामुळे, ज्या यशवंत बाबांनी या गावावर मायेचे छत्र धरले, आज त्यांच्याच मठात चोरी होणे. याला जबाबदार कोण? असा देखील प्रश्न समोर येत आहे.
येणार्या काळात उंचखडक बु सह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करायची आहे. त्यामुळे, येथील तरुणांनी आणि गावकर्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. ज्या मंदीरात चोरी झाली आहे. त्याचा आम्ही छडा लवकरात लवकर लावू. कारण, याच चोरांनी माळीझाप येथील पीराच्या देवाची देखील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच असाच प्रकार म्हाळादेवी येथे झाला होता. त्यामुळे, जर ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रत्येक गावात झाली तर असे प्रकार टाळण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. असे मत अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी व्यक्त केलेे. गुन्ह्याचा तपास आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मार्गदर्शनासाठी ते उंचखडक येथे आले होते.