राष्ट्रवादीच्या भोंगळ कारभारामुळे शेंगाळ कुटुंबाचा काँग्रेसमध्ये प्रवेश.! घड्याळाचा उलट दिशेने प्रवास सुरू.!



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                   अकोले तालुक्यात विधानसभेच्या वेळी जनतेने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखून शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर आपली श्रद्धा व्यक्त केली. मात्र, आज तीच जनता प्रचंड वैतागलेली दिसून येत आहे. इतकेच काय.! पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी देखील लोकप्रतिनिधींच्या मनमानी कारभापुढे हात टेकले आहे. मात्र, पुढील विधानसभा येईपर्यंत गुतली गाय अन फटके खाय. यापेक्षा करणार तरी काय? मात्र, ज्यांनी सन 2019 च्या विधानसभेला राष्ट्रवादीचे काम केले. ते आमदारांच्या एकला चलो रे च्या भुमिकेला कंटाळून पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. खरंतर, येथे राष्ट्रवादीचा आमदार झाल्यानंतर पक्ष वाढायला हवा होता. मात्र, तो लयास जाताना दिसून येत आहे. कारण, काही दिवसांपुर्वी मधुकर नवले, मिनानाथ पांडे, रमेश जगताप यांच्यासारखे बडे नेते राष्ट्रवादीत येत होते. मात्र, त्यांना प्रवेश देताना गुर्मीचा हेका पहायला मिळाला. परिणाम काय झाला? तर, येथे काँग्रेसचे अस्तित्व संपत आले होते. तीच काँग्रेस प्रबळ झाली आणि मदन पथवे, अशोक माळी, मारुती शेंगाळ, मिनाक्षी शेंगाळ यांच्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे, एकला चलो रे.! या आमदारांच्या भुमिकेमुळे उद्या 2024 मध्ये राष्ट्रवादीचा आमदार पडला तर आश्चर्य वाटायला नको. काल मिळालेला जनेचा कौल आज पक्षाला टिकविता आला नाही. त्यामुळे, येणार्‍या निवडणुकीपर्यंत असेच भोंगळे नियोजन राहिले तर मतांच्या विभाजनात शरद पवार देखील पिचडांच्या यशापुढे चितपट होतील. यात तिळमात्र शंका नाही.

एखाद्या तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा आमदार झाला की, तो तेथे स्वत:ची नव्हे तर पक्षाची पाळंमुळं रोवण्याचे काम करतो. मात्र, अकोले तालुक्यात उलटपक्षी वातावरण दिसून येत आहे. येथे पक्ष नव्हे, तर स्वत:चे अस्तित्व नव्याने कसे उभे करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विशेषत: जेव्हा डॉ. लहामटे यांचे सोशल मीडियावर एक गाणे फिरत होते. त्याचे बोल असे होते की, गडी एकटा निघाला. त्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या की, गडी एकटा निघाला, हेच आमचे फार मोठे दुर्दैव आहे. गड्याने आम्हा सर्वांना घेऊन निघाले पाहिजे. तालुक्याच्या वाड्या वस्तीपर्यंत संघटन बांधायला पाहिजे. कारण, जे काम एकट्याने होत नाही, ते संघटना करुन होते. हे कोणीतरी आमच्या साहेबांना सांगायला हवे. खरंतर, अनेकजण सांगतातही. मात्र, साहेब कोणाचे ऐकायला तयार नाही. त्यामुळे, पक्षातच फार मोठा नाराजीचा सुर आहे.

खरंतर, आ. निलेश लंके हे त्यांच्या कर्तुत्वातून महाराष्ट्राला परिचित झाले. 25/15 चा निधी वाटणे म्हणजे आमदारकी आणि विकास नव्हे. जनतेच्या हितीची आणि अस्मितेची कामे काय? वेगळा उपक्रम काय? जनसहभाग काय? सामाजिक निधी काय? असे प्रकार व उपक्रम तालुक्याला माहित नाही. दुर्दैवाने येथे कोणालातरी सांगितले जाते की, मंत्रीपद मिळण्याची शक्यता, संस्थानांवर घेण्याची शक्यता, अशा प्रकारची चर्चा सुरू करा. त्यानुसार माध्यमांमध्ये वावडी उठविली जाते. मात्र, वास्तव काय? तर केवळ गुढगाला बाशिंग बांधुन बसल्यासारखे कारायचे. मात्र, या प्रकारामुळे, जनतेत हासू होते. हे देखील कोणीतरी समजून सांगितले पाहिजे. खरंतर, जिल्हा आणि राज्याचे काही पदाधिकारी तालुक्यात फोन करुन म्हणतात की, तुमच्या साहेबांनी तालुक्याची धुरा संभाळता येईना. सतराशे साठ कार्यकर्ते आणि जनता देखील नाराज आहे. अशा परिस्थिती त्यांना राज्याच्या कारभार देण्याचा विचार तरी कोणाच्या मनात सुद्धा डोकावेल का? म्हणजे अशी मिश्कीन ठिका होत आहे.

खरंतर, येथे काँग्रेसला बळकटी देण्याचे काम खर्‍या अर्थाने आमदार किंवा येथील राष्ट्रवादीने केले आहे. कारण, नवले, पांडे, जगताप यांच्यासह अनेकांना त्यांनी राष्ट्रवादीत घेतले असते तर आज पुन्हा काँग्रेस फार उदयाला आली नसती. म्हणजे, येथे व्यक्तीद्वेष उरात बाळगून पक्षाचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे, राष्ट्रवादीपेक्षा येथे काँग्रेसचे संघटन अधिक प्रबळ होताना दिसत आहे. उद्याची विधानसभा प्रत्येकजण स्वबळावर लढले तर येथे पठार भागावर स्वत: ना. बाळासाहेब थोरात हे लक्ष घालतील. आज आ. सुधिर तांबे यांनी तालुक्यावर कटाक्ष टाकला आहे. त्यामुळे, पिचड किंवा एखादा प्रबळ उमेदवार पक्षाला मिळाला तर पुर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या अकोले मतदारसंघावर पुन्हा हाताचा पंजा फडकायला वेळ लागणार नाही. जर असे झालेच तर, याचे सर्व श्रेय्य आजच्या राष्ट्रवादीच्या कारभाराला जाईल. कारण, येणार्‍या तीन वर्षात राष्ट्रवादीला आज लागलेली गळती थांबली नाही तर यांची आवस्था तालुक्यात फार दयनिय राहिल. हे कटू असलेले वाक्य प्रत्येकाने कोठेतरी लिहून ठेवा म्हणजे आठवायला सोपे जाईल.

आता यापेक्षा आणखी एक दुर्दैव असे म्हणावे लागले की, डॉ. किरण लहमटे यांनी तालुक्यात संघटनाचा बोजबारा वाजविल्याचे आरोप होत असताना दुसरीकडे सिताराम पाटील गायकर यांनी राष्ट्रवादीत फार मोठी फौज आणली होती. मात्र, ती देखील या माणसाला टिकविता आली नाही. म्हणते ते स्वत: काही कट्टर राष्ट्रवादीचे समर्थक नाहीत. मनसे ते आरएसएस प्रणित भाजप असा त्यांचा प्रवास सर्वज्ञात आहे. अचानक त्यांची लॉटरी लागली. त्यामुळे, त्यांनी स्वत:ला पक्षासाठी फार काही वाहुन घेतले अशातला काही भाग नाही. उलट, शरद पवारांना मानणार्‍या कार्यकर्त्यांने राष्ट्रवादी की जय असे म्हणा अशी विनंती केली. तर त्या नवनाथ काळेवर गुन्हा ठोकून त्यास रात्री अपरात्री उचलुन आणून जेलमध्ये टाकले गेले. अशा वृत्तीने पक्ष वाढेल की घटेल हे नव्याने सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादीच्या अशा जबाबदार लोकांच्या वागण्याने पक्षात आलेले लोक देखील पुन्हा दुसर्‍या पक्षात निघून जात आहे. याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचे?

खरंतर जशी विधानसभा झाली. तेव्हापासून एकही बडा नेता राष्ट्रवादीत आणण्यात आमदार किंवा पदाधिकारी यांना यश आले नाही. एकीकडे गायकर पाटील यांच्यामागे कारखाण्याचे 14 संचालक आणि शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र, या आमदारांनी त्यांचा स्वागत करायचे सोडून त्यांच्यावरच कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याची टिका त्यांच्यावर झाली. कारण, असे म्हटले जाते की, डॉक्टर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार परिषदा घेतात, यांचे पक्षासाठी योगदान काय? डॉक्टरांनी आमदार करण्यात त्यांचा वाटा किती? आमदारांनी स्वत: पक्ष वाढीसाठी काय केले? किती पदाधिकारी व जनता त्यांच्या कार्यपद्धतीवर खूश आहे? उलट जे लोक राष्ट्रवादीत येत होते त्यांना यांनी येऊ दिले नाही. तर जे आले त्यांच्यावर वारंवार अविश्वास ठेऊन पक्षाच्या वाढीपेक्षा घातक परिस्थिती निर्माण करु पाहिली. असा आरोप त्यांचे कार्यकर्ते आता करु लागले आहेत. तर हा असला भोंगळ कारभार पाहुन जे पक्षात आले. ते देखील पुर्णत: वैतागले आहेत. त्यामुळे, काल जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेला व्यक्ती आज प्रत्येकाच्या तोंडात टिकेचा धनी ठरत आहे. त्यामुळे, पक्षाचे फार मोठे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. तर, कारखान्यात दादांनी एका व्यक्तीवर विश्वास टाकला, त्याला फाटे फोडत तालुक्याच्या सहकाराला प्रदुषित करण्याचे काम लोकप्रतिनिधी करीत असल्याचे बोलले जात आहे. म्हणून तर नको त्या लोकांच्यात हवा भरण्याचे काम त्यांच्याकडून सुरु असल्याची टिका होत आहे.

एकंदर, आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काही लोक पक्ष सोडत आहेत. डॉक्टरांनी त्यांचा चिडखोर आणि हाट्टी स्वभाव सोडून संयमाने प्रत्येकाची बाजू ऐकूण त्यावर उत्तर शोधले पाहिजे. स्वत:च्या वेळेचे योग्यते नियोजन करून त्यांची स्वत:ची एक यंत्रणा उभी केली पाहिजे, विशेष म्हणजे कोणी एकावर तरी डोळे झाकुण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या पीए पासून तर त्यांच्या गाडी ड्रायव्हर पर्यंत एक यादी केली तर त्यांच्या वागण्याची आणि जगण्याची पद्धत लक्षात येईल. त्यामुळे, त्यांनी स्वत: आत्मचिंतन केले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन अनेकजण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ची शिकार करुन घेतात. तरी यांना तेच धन्य वाटतात. राजकारणात काही तत्वे बाजुला ठेवावे लागतात. काही ठिकाणी फ्लेक्झीबल व्हावे लागते. एकाने एक सांगितले तर त्याला दुसरी देखील बाजू असेल हे लक्षात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने त्यांचे अनेक कार्यकर्ते आजवर तुटले आहेत. अशा अनेक गोष्टी त्यांच्या अनुकरणातून जर बदलल्या नाही. तर, येणार्‍या काळात हे आमदार भविष्यकाळाच्या इतिहासात कोणत्याही पानावर दिसणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे असा ठाम विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

दरम्यान, येणार्‍या काळात अशोक भांगरे, अमित भांगरे, वैभव पिचड, मधुकर तळपाडे, सतिष भांगरे, मारुती मेंगाळ, मिनाक्षी शेंगाळ, यांच्यासह कित्तक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आज डॉ. लहामटे यांनी असेच प्रत्येकाशी तुच्छ आणि हेकेखोरपणे वागावे, माध्यमांनी त्यांच्या विरोधात लिहावे, जनतेच्या मनात अनादर करावा म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख कमी होत जाईल. म्हणून तर डॉक्टरांच्या विरोधात लिहीले की, अनेकांना गुदगुल्या होतात. दुर्दैव इतकेच की, यातून ते स्वत: काही धडा घेत नाही. त्यामुळे, जसे यापुर्वी तालुक्याला यशवंतराव भांगरे यांच्यासारखे आमदार लाभले होते. तसे नसले तरी तुलनात्मक डॉक्टर हे समाजभिमूख व्यक्ती आहेत. पिचड यांच्याप्रमाणे त्यांच्या गाडीच्या काचा कधी वर होत नाहीत. आता कार्यकर्ते अपेक्षा ठेवत आहेत की, येणार्‍या काळात ऐकला चलो रे.! ही भूमिका सोडून ते सर्वांना सोबत घेऊन चालतील...!