संगमनेरात दरोडेखोरांचा पोलिसांवर सत्तुरने जिवघेणा हल्ला.! मोठी शस्रास्रे जप्त.! पोलिसच असुरक्षित.! पाच जण जाळ्यात.!

 


सार्वभौम (संगमनेर) :-

                               राज्यात गुन्हेगारी विश्वात अहमदनगर नंबर वन वर आला आहे तर पुणे दोन नंबरवर गेले आहे. गुन्ह्यांच्या बरोबरीने जिल्ह्यात पोलिसांवर जिवघेणे हल्ले होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. संगमनेर शहरात दिल्ली नाक्यावर पोलिसांना ज्या अमानुष पद्धतीने मारहाण झाली तो सिलसिला उत्तर नगरमध्ये कायम टिकून राहिला. संगमनेर पोलिसांनी कारवाई करायला इतका वेळ लावला की, येथील गुन्हेगारांची मजल पुन्हा पोलिसांना धमकाविण्यापर्यंत गेली. त्यानंतर, अकोले तालुक्यातील राजूर येथे पर्यटकांनी दोन पोलिसांच्या अंगावर हात उचलून वर्दी फाडली. हे प्रकरण होते कोठे नाहीतर लोणी येथे किराणा दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या बरगड्या जखमी केल्या. यावर कारवाई झाली आणि त्या पाठोपाठ काल संगमनेर तालुक्यातील माळवाडी बोटा येथे दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या काही पोलिसांवर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांच्या जवळील दगडगोटे घेऊन ते पोलिसांवर भिरकविले गेले. यात काही पोलीस जखमी झाले आहेत. मात्र, या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात घरगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून काही धारधार हत्यारे व शस्रास्रे ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई उल्लेखनिय असली तरी, कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होतात ही फार मोठी खेदाची बाब आहे. त्यामुळे, आजकाल ३५३ (सरकारी कामात अडथळा) हा कलम जरी सेशन कमीट गुन्हा झाला. तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले कमी होत नाही. त्यावर पोलिसांनीच कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. अशी चर्चा सुरु आहे.

             याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील माळवाडी बोटा परिसरात घारगाव पोलीस हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, माळवाडी परिसरात काही लोक हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धारधार शस्र घेऊन पहाटे २ वाजता अढळून आले आहेत. त्यानंतर, घारगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी तत्काळ एक टिम बोट्याकडे रवाना केली. त्यानंतर, पोलिसांनी संबंधित परिसरात चोरट्यांचा शोध सुरु केला. त्यावेळी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास माळवाडी बोटा या ठिकाणी पाच व्यक्ती दिसून आल्या. त्यांच्याकडे दोन दुचाकी व काही साहित्य दिसून आले. जेव्हा पोलिसांनी या दरोडेखोरांना पाहिले, तेव्हा त्यांनी पाटलाग सुरु केला. पळू नका असे म्हणत असताना देखील या दरोडेखोरांनी धुम ठोकली. यावेळी अगदी फिल्मी स्टाईलने पोलीस आणि चोरटे यांच्यात धुमचक्री झाली. पोलिसांनी दरोडेखोरांवर झडप घातली असता त्यांनी पोलिसांवर लोखंडी सत्तुराने हमला केला. तर, पाच जणांनी पोलिसांवर दगडांचा जोरदार भडीमार केला.

                  दरम्यान, जोवर पोलीस मागे फिरत नाही. तोवर दरोडेखोरांनी दगडफेक सुरुच ठेवली. मात्र तरी देखील घारगाव पोलिसांनी हार मानली नाही. दरोडेखोरांचे शस्र व दगड हे पोलिसांच्या धाडसापुढे फिके ठरले. मोठ्या धैर्याने सुनिल पाटील याच्या पथकाने दरोडेखोरांवर धडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या. यात जानकु लिंबाजी दुधवडे (वय 22, रा. गाढवलोळी, अकलापूर ता संगमनेर), संजय निवृत्ती दुधवडे  (रा. गाढवलोळी,अकलापुर ता संगमनेर), दत्तु बुधा केदार (वय 19, रा. नांदुर खंदरमाळवाडी ता संगमनेर) राजू सुरेश खंडागळे (वय 25, रा. माळवाडी, बोटा ता संगमनेर) भाऊ लिंबा दुधवडे (वय 25, रा. गाढवलोळी, अकलापूर ता संगमनेर) असे पाच दरोडेखोर असल्याचे लक्षात आले. यात चार जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक पसार आहे. त्यांच्याकडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यात दोन स्प्लेंडर मोटार सायकली, एक लोखंडी सत्तुर, एक लोखंडी चाकु, लोखंडी पकड, स्क्रु ड्रायव्हर, दगडे व मिरची पुड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश लोंढे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           संगमनेर प्रमाणे लोणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाढ बु येथे देखील पोलिसांवर हल्ला झाला आहे. कोविडच्या काळात ४ नंतर दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. त्यांची अंमलबजावणी लोणी पोलीस करीत असताना दाढ बु येथील गावातील विरभद्र मंदिरा समोर गणेश सुभाष जेजुरकर यांचे विरभद्र किराणा दुकान बंद करण्याचे काम सुरु असताना गणेश संतोष जेजुुरकर, पप्पू रमाकांत टाक, रविंद्र उर्फ भावड्या रमाकांत टाक व निवृत्ती जेजुरकर (सर्व रा. दाढ बु, ता. राहाता, जि. अ. नगर) या सर्वांनी पोलीस कर्मचारी संतोष लांडे यांच्यावर हल्ला केला. यात त्यांची बरगडी फॅक्चर झाली आहे. लांडे यांना शिविगाळ दमदाटी करीत मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता संगमनेर, अकोले, घारगाव, संगमनेर तालुका, लोणी  अशा अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होऊ लागले आहेत. सरकारला कायदा व सुव्यवस्था हवी आहे. मात्र, पोलिसांच्या जिवाची काही चिंता आहे की नाही ? येणाऱ्या काळात गुन्हेगारी देखील हायटेक झाली असून त्यांच्यात देखील नवनव्या यंत्रणा कार्यन्वीत होत आहे. त्यामुळे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.