बाप रे.! दिड लाख रुपयांचे 28 टन टरबुज दोन व्यापाऱ्यांनी खाल्ले.! शेतातून नेले आणि बाजार पडले.! अकोल्याच्या शेतकऱ्याची संगमनेरच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक, गुन्हा दाखल.!

 


सार्वभौम (अकोले) :- 

                            अकोले तालुक्यातील विरगाव येथे एका शेतकऱ्याची तब्बल १ लाख ४८ हजार रुपयांची फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  संबंधित शेतकऱ्याने २५ टन टरबुज पिकविले होते. ते वेगवेगळ्या दराने १ लाख ४८ हजार रुपयांना संगमनेरच्या व्यापाऱ्याला दिले होते. मात्र, आज टरबुज दिले आणि नंतर चारदोन दिवसात टरबुजाचे भाव पडले. त्यामुळे, संबंधित व्यापारी टरबुजाची ठरलेली रक्कम द्यायला तयार नाही. परंतु, भाव पडू अथवा जास्त होवो, त्यात शेतकऱ्याचा काय दोष? ठरलं ते ठरलं.! मात्र, व्यापारी आता नाटकबुल आला आहे. त्यामुळे, संबंधित शेतकऱ्याने संगमनेरच्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद  दाखल केली आहे. त्यामुळे, या प्रकाराची तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. यात सुधाकर कोंडाजी तोडकर (रा. विरगाव, ता. अकोले) यांच्या फिर्यादीनुसार व्यापारी मारुफ असलम बागवान व शाहिद असलम बागवान (रा. जुना पोस्ट आँफिस, संगमनेर) यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस यांचा शोध घेत आहेत. 

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रगतशिल शेतकरी सुधाकर तोरकड यांनी त्यांच्या विरगाव येथील शेतात टरबुजाचे उत्पन्न घेतले होते. अवघ्या काही गुंठ्यात तोरकड यांनी मोठ्या कष्टाने २५ टनापेक्षा जास्त टरबुज काढले होते. त्याच्या या कष्टाचे कौतूक म्हणून काही माध्यमांनी थेट ग्राऊंड रिपोर्ट करुन त्यांची मुलाखत छापली होती. त्या मुलाखतीला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. भली-भली टरबुजे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. इतकेच काय.! व्यापारी देखील आले आणि त्यांनी माल बघताक्षणी मोठा साडेपाच रुपये प्रतिकिलो तर दुसरा तीन रुपये किलो प्रमाणे त्याचा भाव ठरविला होता. असे १ लाख ४८ हजार रुपये देणे ठरले होते.  मात्र, कोण जाणे या मालाला आणि बाजार भावाला कोणाची नजर लागली. कोण्या टरबुजाची शेतकऱ्याच्या कषटावर वक्रदृष्टी पडली आणि शेतमालाची रक्कम मिळविण्यासाठी तोरकड यांना मोठा संघर्ष करावा लागतो आहे.

            दरम्यान ठरल्याप्रमाणे व्यापारी यांनी काही साक्षिदारांच्या समक्ष हा व्यावहार केला होता. त्याबाबत लेखी बील देखील दिले होते. व्यावहारानंतर या व्यापार्यांनी शेतातील टरबुजे तोडून नेली होती. यावेळी व्यापारी मारुफ असलम बागवान याने शेतकरी तोरकड यांना दि. १ जून २०२१ रोजी १ लाख २० हजार रुपयेचा चेक दिला होता. तर उर्वरीत २८ हजार रक्कम दोन महिन्यांनी देतो असे दत्तात्रय जोरवर व सुनिल गिते यांच्या समक्ष सांगितले होते. यात २५ टन टरबुजाचे १ लाख ३७ हजार ५०० रुपये झाले होते. तर, ३ टन टरबुजाचे १० हजार ५०० रुपये झाले होते. असे १ लाख ४८ रुपये देणे होते. हे निर्धारित करुन व्यापारी शेतातून टरबुज घेऊन गेले होते.

           शेतातून टरबुज गेल्यानंतर मारुफ बागवान याने दिलेला १ लाख २० हजार रुपयांचा चेक शेतकरी यांनी संगमनेरच्या बँकेत टाकला असता तो वटला नाही.  कारण, त्यांच्या खात्यात तितकी रक्कम शिल्लक नव्हती. परिणामी तो चेक बाऊन्स झाला. दि. २ जुलै २०२१ रोजी चेकची हकीकत समजताच शेतकरी तोरकड यांनी संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, व्यापाऱ्यांनी उडवाउडवी सोडून काहीच खरी उत्तरे दिली नाही. माझ्या कष्टाचे १ लाख ४८ हजार रुपये मला द्या अशी वारंवार मागणी करुन देखील व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने अखेर अकोले पोलीस ठाणे गाठले आणि संगमनेरच्या दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आता अकोले पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

             दरम्यान, असे बोलले जाते की, व्यापाऱ्यांनी टरबुज नेले तेव्हा त्यांना चांगला बाजार होता. परंतु, मार्केटमध्ये बाजारभावात चढऊतार हे होतच असतात. त्यामुळे, टरबुजाचे भाव अचानक उतरले आणि हे टरबुज त्यांना महाग गेले असे व्यापाऱ्यांच्या तोंडची कुणकुण आहे. हे असे असले तरी, एकदा ठरले ते ठरले. जेव्हा एखाद्या मालाचा बाजारभाव शेतात ठरतो, तेव्हा शेतकरी त्या शब्दाला कधी फिरवत नाही. जसे अनेकदा कोथिंबिरीचे भाव आज कमी तर उद्या जास्त होतात. तेव्हा शेतकरी असे म्हणत नाही. की, आता मी हा माल तुला देणार नाही. तो आपल्या शब्दाला जागतो. त्यामुळे, एकदा भाव ठरला तो ठरला. त्यात तडजोड नाही. उलट जर उद्या टरबुजाला जास्त भाव मिळाला असता तर व्यापाऱ्याने पैसे वाढून दिले  असते का ? तर बिल्कुल नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी आणि त्यांच्याकडून पैसे काढून घ्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, शुभम आंबरे यांनी केली आहे.