क्राईम मिटींगमध्ये पीएसआयची तडकाफडकी निलंबन.! कामात कसुरी केल्याचा ठपका.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांचे तडकाफडकी निलंबीन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कर्तव्यात कसुर, स्टेशन डायरीला नको त्या नोंदी घेणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या सुचनेचे पालन न करणे, प्रशासकीय नियमांचे पालन न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी योग्य त्या पद्धतीने बरताव न करणे अशी अनेक कारणे देत तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्याला ग्रहण लागल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर, माळी यांना गोवा येथील एक ट्रिप देखील नडल्याची चर्चा सुरु होती. 

               दरम्यान, संगमनेरात लाचखोर अधिकाऱ्यांसह कर्मचारी देखील लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याचे आढळुन आले आहे. यामध्ये पोलीस देखील कोठे कमी राहीले नाही. याच संगमनेर  शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यामुळे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना तडकाफडकी मुख्यालयात जावे लागले होते. परंतु, देशमुख यांना पुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाणे मिळाले. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात आलेली मरगळ अगदी सुतासारखे सरळ करण्यासाठी जो कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसुर करील त्याला कागदावर घेतले आहे. यामध्ये काहींना नोटीस तर काहींचा डिफॉल्ट रिपोर्ट देखील पोलीस अधिक्षकांकडे पाठवला आहे. त्यामुळे शहरातील क्राईम रेट कमी करण्यासाठी मुकुंद देशमुख यांनी कसोनिशी प्रयत्न सुरू केले. जो कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसुर करील त्यावर थेट कारवाई होईल हाच संदेश आता माळी यांच्या कारवाईने गेला आहे.

         दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी तेलाच्या कारवाईची उकल केली. तेव्हा त्यांचे संगमनेरात कौतुक होत होते. पण, आज अचानक निलंबन झाल्याने सर्वांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहे. पण, स्टेशन डायरीला नको त्या नोंदी घेणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या सुचनेचे पालन न करणे, प्रशासकीय नियमांचे पालन न करणे, अधिकाऱ्यांशी योग्य त्या पद्धतीने न वागणे अशा नाना कारणांनी माळी यांचे निलंबन झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुढच्याला ठेच मागचा शहाणा याच उद्देशाने एसपी साहेबांनी कारवाई केल्याचे बोलले जात आहे. 

              दरम्यान, संगमनेर शहरात टपरी तेथे गुटखा व उपनगरात गांजा, वेश्या व्यवसाय, हनीट्रॅप, अवैध वाळु तस्करी राज रोस सुरू आहे. तर एकीकडे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून 55 लाखाच्या मलिद्याबाबत टिका होत आहे. येवढेच काय! हा विषय राज्यगृहमंत्री शंभुराजे देसाई व पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्या दालनात देखील गेला आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाणे नेहमी चर्चेचा विषय ठरत आहे. आता माळी यांचे प्रॉपर निलंबन नेमकी कोणत्या कारणाने झाले याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम आहे. मात्र, या कारवाईने पोलिसांच्या शिस्तीला आर्मीचे नियम लागू होतील हे मात्र नक्की.!

          दरम्यान, आजवर पोलीस दलात पोलीस अधिक्षक हे कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करत होते. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वगळता कितीही मोठे कारण असले तर पीएसआय ते पीआय यांच्या बदल्या व इन्क्रिमेंन्ट वगळता फार मोठी कारवाई केली जात नव्हती. मात्र, एसपी मनोज पाटील यांनी पोलीस दलाला फार मोठा धक्का दिला आहे. त्यांनी संगमनेरचे पीएसआय माळी यांच्या निलंबनाने नव्याने इतिहास रचला आहे. यापुर्वी त्यांनी रजपूत व पाटील या अधिकाऱ्यांचे देखील निलंबन केले आहे. खरंतर जेव्हा डॉ. सौरभ त्रिपाठी हे येथे एसपी म्हणून कार्यतर होते. तेव्हा त्यांच्या कार्यकाळात ४० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असावे. कारण, त्यांच्याकडे चुकीला माफी नव्हती. याच काळात कोपर्डी, राशिन, वेदांत देशमुख, पांगरमल, पाथर्डीतील शालेय मुलीवरील अत्याचार, पोलीस भरती संदिग्धता, असे अनेक गंभीर गुन्हे घडले होते. त्यामुळे, निलंबनाची संख्या फार मोठी होती. अशात अधिकाऱ्यांच्या बदल्या वगळता मोठी कारवाई झाली नाही. तर, कर्मचाऱ्यांना खात्यातून डिसमीस करणे हे देखील त्यांच्याच काळात झाले. त्यांच्या पाठोपाठ तत्कालिन एसपी रंजनकुमार शर्मा यांनी जितके पोलीस खात्याला पाठीशी घातले तितके कोणी पाठीशी घातल्याचे दिसत नाही. आता मनोज पाटील यांनी देखील चुकीला माफी नाही. हेच खात्याला सुचित केले आहे.