भंडारदारा धरणात पैलवानाचा बुडून मृत्यू.! तीन दिवसानंतर मृतदेह तरंगला.! अचानक निरोप कळताच त्यांनी टाहो फोडला.!


- संकेत सामेरे

सार्वभौम (अकोले) :- 

           अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात राहाता तालुक्यातील कोल्हार बु, येथे राहणार्‍या सागर विजय थोरात (वय 21) या पैलवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार शुक्रवार दि. 9 जुलै 2021 रोजी दुपारी घडला होता. मात्र, त्या दिवशी गोताखोर (अट्टल पोहणारे) आणून त्यांनी या मुलाचा पाण्यात शोध घेतला होता. तरी देखील तो मिळाला नाही. मात्र, दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. परंतु, हा तरुण कोण? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा मृतदेह प्रत्येकाने हातोहात शेअर केला. त्यानंतर तो कोल्हार येथील एका व्यक्तीकडे गेला असता त्याने ही माहिती सागरच्या कुटुंबाला दिली आणि अचानक मिळालेल्या माहितीने त्यांनी एकाच टाहो फोडला. आज रात्री मोठ्या शोकाकूल वातावरणात त्याच्यावर कोल्हार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सागर थोरात आणि त्याचे काही मित्र भंडारदरा फिरण्यासाठी आले होते. त्यांचे अन्यत्र फिरून झाल्यानंतर ते स्पिल्वे येथे गेले आणि त्यांनी अंघोळी करण्यासाठी आपले कपडे काढले. यावेळी, सागरचे मित्र आणि त्यांच्यासोबत अन्य 20 ते 25 जण देखील स्पिल्वे येथे अंघोळ करीत होते. मात्र, भंडारदर्‍याची रचना ही शेततळ्यासारखी उतरती असून अगदी पावला-पावलावर पाणी खोल-खोल होत जाते. सागर पोहत असताना त्याला खोलीचा अंदाज आला नाही. वारा आणि उसळणार्‍या लाटा त्याला थोड्या-थोड्या आत घेऊन जात होत्या. मात्र, त्याची त्याला जाणिव झाली नाही.

दरम्यान, 20 ते 25 जण तेथे पोहत असेल तरी त्यापैकी कोणी अट्टल पोहणारे नव्हते. त्यामुळे, जो-तो सावध आणि कडेला पोहत होता. याच दरम्यान, सागर जसा आत सरकला तोच त्याचे पाय खाली टेकले नाही. परिणामी काही क्षणात त्याच्या नाका तोंडात पाणी गेले. हा प्रकार पाहताच तेथे जे कोणी पोहणारे होते. त्यांनी तत्काळ पाण्याच्या बाहेर येणे पसंत केले. त्यानंतर पाण्यात सागर सोडून कोणी देखील दिसत नव्हते. काही व्यक्तींनी आरडाओरड सुरू केली. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. तेथे स्थानिक लोक आले, पोलीस देखील आले. मात्र, सागर दिसत नव्हता. हे बालंट आपल्या अंगी यायला नको, त्यामुळे, तेथे कोणीही थांबले नाही. जो-तो तेथून निघून गेला. इतकेच काय.! सागर थोरात याचे कपडे देखील घाईघाईत कोणीतरी घेऊन पळून गेले. त्यावेळी फक्त तेथे त्याचे बुट आणि सॉक्स होते.

येथे कोणतरी मुलगा बुडाला आहे. हे सांगणारे तेथे कोणी नव्हते. मात्र, तरी देखील राजूर पोलीस आणि तेथील काही ग्रामस्थांनी शेंडी येथून काही पोहणारे व्यक्ती आणले आणि सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुट आणि सॉक्स वगळता त्यांच्या हाती काही लागले नाही. आता याच वेळी तेथे काही मद्यपी गेले आणि पोलिसांना मारहाण करीत ते म्हणाले. आम्हाला तेथे फिरायला जायचे आहे. मात्र, काही मिनिटांपुर्वी तेथे एक मुलगा बुडून मयत झाला होता. आता या मद्यपींना तिकडे कसे सोडावे.! म्हणून त्यांनी या सहा तरुणांना तेथे जाण्यास विरोध केला. मात्र, या तरुणांनी पोलिस आणि स्थानिक नागरिकांना देखील मारहाण केली. त्यामुळे, अजित बाळासाहेब शिंदे, (रा. ठाणगाव, ता. सिन्नर), किरण कोंडाजी उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), विनोद संतोष औटी (रा. वाघापूर, ता. अकोले), ज्ञानेश्वर विश्वास कदम (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले), आकाश सतिष उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), ज्ञानेश्वर गणपत लांडगे (रा. वडगाव लांगडा, ता. संगमनेर) अशा सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवार दि. 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


तर अकोले तालुक्याची ओळख म्हणजे मीनी जम्मु कश्मिर आहे. येथे असणारे 11 टिएमसीचे भंडारदरा धरण, 1,646 मिटर उंचीचे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, सत्यवादी हरिश्चंद्रगड, प्रवरा नदीचा उगम असलेला रतनगड, पुरातन शिल्प असलेले अमृतेश्वराचे मंदीर, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काळीज हेलावून टाकणारा कोकण कडा, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असणारी सांधन दरी आणि अनेक चित्रपटांच्या शुटींग जेथे झाल्या असा रंधाफॉल असा नयमरम्य निसर्ग असल्यामुळे येथे देश विदेशातून पर्यटक येत असतात. खरंतर हरिश्चंद्रगड येथे एका गिर्यारोहकाचा मृत्यु वगळता देशाच्या काना कोपर्‍यातून येणार्‍या पर्यटकांचा येथे मृत्यू झालाय, हे फार कमी ऐकीवात आहे. मात्र, दुर्दैव असे की, आपल्याच परिसरातून काही लोक निसर्ग म्हणून नव्हे तर भलताच ऐन्जॉय करायला जातात आणि जीव गमवून बसतात असे प्रकार आजवर फार झाले आहेत.


सहकार्य कारा काळजी घ्या.!

पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी आहेत. तेथे एक व्यक्ती बुडाला म्हणून पुढे काही अनर्थ होऊ नये हाच आमचा हेतू होता. मात्र, दुर्दैवाने पोलीस म्हणजे दुष्मण वाटणे हे फार वेदनादायी आहे. मद्यपी करून अशा पद्धतीने धोक्याच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, स्वत:च्या जीवाला इजा होईल असे कृत्य कोणी करू नये, तालुक्याला इतका सुंदर नैसर्गिक ठेवा लाभला आहे. त्याचे प्रत्येकाने जनत केले पाहिजे. कोणी आपल्याला समजून सांंगण्यापेक्षा आपण स्वत: काही गोष्टी समजून घ्याव्यात. या भागातील लोक चांगले व प्रामाणिक असून त्यांच्याशी कोणी गैरव्यवहार करणे अयोग्य आहे. त्यामुळे, पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

- नरेंद्र साबळे (सहा.पो.नी)