भाईंच्या बर्थडेत शस्त्रास्त्रांनी फुल हाणामार्या.! सात गंभीर, 20 जणांवर गुन्हे.! ऐसा वाढदिवस होणे नाही, संगमनेरातील प्रकार.!
सार्वभौम (संगमनेर):-
वाढदिवस साजरा करताना जमलेल्या तरुणांनी आरडा-ओरडा केला. त्यांना समजून सांगण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मात्र, दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात हॉकीस्टिक, लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि धारधार शस्त्राने एकमेकांना मारहाण करण्यात आली. हा अगदी फिल्मी स्टाईलचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील नाटकी चौक, इस्लामपूरा येथे शुक्रवार दि. 2 जुलै 2021 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी 7 जण जखमी, तर 20 जणांविरुद्ध विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्याक पोलीस निरीक्षक योगीता एस. कोकाटे करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमजद दाऊद सय्यद (रा. इस्लामपूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि. 2 जुलै रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हुजेब बागवान याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नातेवाईक व काही तरुण मोठमोठ्याने आरडा ओरड करून वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या तरुणांना फिर्यादी हे समजुन सांगण्यासाठी गेले होते. पण, त्यांना समजून सांगत असताना आरोपी व फिर्यादी यांची बाचाबाची सुरू झाली. याचे रूपांतर हळूहळू मोठ्या वादात झाले. आरोपी यांनी मागचा पुढचा विचार न करता लथाबुक्यांनी मारहाण करत लोखंडी रॉड, हॉकीस्टीक, लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ इब्राम इजाज यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यात अमजद दाऊद सय्यद, इब्राम दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, सोहेल अमजद सय्यद हे चौघेजण जखमी झाले आहे. तर त्यांना खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. यावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जमीर उर्फ पिट्या अजिज शेख, फैजान समीर शेख, अदनान समीर शेख, निसार शेख, मुन्ना शेख, गुड्डू निसार शेख, असीम शेख, अरबाज शेख, हुजेब बागवान, तस्लिम शेख, तबु शेख सर्व रा. इस्लामपुरा ता. संगमनेर या सर्वांवर विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हुजेब एजाज बागवान (रा. कुरणरोड, इस्लामपूरा, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 2 जुलै रोजी रात्री नातेवाईक व मित्रपरिवार वाढदिवस साजरा करण्यासाठी संगमनेर-लोणी रस्त्यालगत असलेल्या लोकसेवा गॅरेज येथे जमलो होतो. येथे केक कापत असताना आरोपी हे संघटित होऊन आले व फिर्यादिस शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या शिविगाळीमुळे हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी यांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने धार-धार हत्याराने व लाकडी फळीने बेदम मारहाण केली. यामध्ये शहेराज निसार शेख, अरबाज निसार शेख, अदनान समीर शेख हे जखमी झाले आहे. तर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात साहिल अमजद सय्यद, मजाज दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, अमजद दाऊद सय्यद, बब्बू दाऊद सय्यद, समीर अन्सार सय्यद, इरफान दाऊद सय्यद, परवीन अमजद सय्यद, रुक्सर मजाज सय्यद सर्व रा. इस्लामपुरा, ता. संगमनेर या सर्वांवर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध केले आहे. सकाळी 7 ते 4 या दरम्यानच शिथिलता आहे. 4 वाजल्यानंतर संचारबंदी आहे. पण, संगमनेरात सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. त्यामुळे, या लॉकडाऊनचा फायदा घेत काहीजण आपला कड काढण्यात व्यस्त झाले आहे. आता संगमनेर शहर हद्दीत संघटीत गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे, गुन्हेगारांना खाकीचा धाक दाखवुन सुता सारखे सरळ करायला हवे. अशा प्रतिक्रिया संगमनेरात उमटू लागल्या आहेत. तर कोरोनाचा प्रदुर्भाव संगमनेरातून पुढे गेला होता. तो आवरता-आवरता प्रशासनाच्या नाकीनव आला होता. याचे देखील भान नागरिकांनी बळगले पाहिजे. मुळशी पॅर्टर्न सारखे वाढदिवस घालण्यापेक्षा कोरोना रोखण्यासाठी काहीतरी उपक्रम हाती घेणे हेच तरुणांईचे कर्तव्य आहे अस मत जानकारांनी व्यक्त केले आहे.