आरे बाप रे.! पुन्हा अकोल्याच्याच पुरुषावर त्याच महिलेचा दुसरा हनीट्रॅप.! 10 हजार दे अन्यथा विनयभंग केला असे सांगून गुन्हा नोंदवू.! पोलिसांची हलगर्जी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोले तालुक्यातील एका व्यक्तीने संगमनेरच्या महिलेच्या हनीट्रॅपचा बुरखा फाडल्यानंतर आणखी एक तक्रारदार आता पुन्हा पुढे आला आहे. त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात येऊन सांगितले की, याच महिलेने दि. 6 जून 2021 रोजी माझ्यावर असाच ट्रॅप लावला होता. फेसबुकवर मैत्री करुन मला चहा पिण्यासाठी संगमनेरात बोलविले आणि दार बंद करुन माझा मोबाईल हिसकून घेतला. तसेच खिशातील पैसे देखील काढून घेतले प्रचंड मारहाण केली होती. दहा हजार रुपये दे नाहीतर तू आमची छेडछाड केली असे म्हणून तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करु. मात्र, कर नाही त्याला डर कशाला? असे म्हणत या निर्भिड पुरुषाने थेट संगमनेर पोलीस ठाणे गाठले आणि तीन महिला व दोन पुरुष यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दुर्दैवाने तक्रारदाराचे म्हणणे आहे की, पोलिसांनी मला सहकार्य केले नाही. माझी तक्रार देखील गहाळ झाली. त्यामुळे, मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो. काल सार्वभौमची बातमी वाचली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासमोर आपली कैफीयत मांडली. घुगे यांना हा प्रकार वरिष्ठांना कळविला आहे. आता संगमनेर पोलिसांनी ठरविले तर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. इतक्या पतिक्षेनंतर आणखी एक तक्रारदार पुढे आले त्यांचे आता पोलिसांनी आणि सुज्ञ नागरिक कौतुक करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात एका उच्च घराण्यातील व प्रतिष्ठीत व्यक्तीचे सोशल मीडियावर फेसबुक आकाऊन्ट होते. त्यामुळे, त्यांना याच गुन्ह्यातील एका महिलेची फे्रन्ड रिक्वेस्ट आली होती. मात्र, हेतूपुर्वक पाठविलेली ही रिक्वेस्ट त्यांच्या लक्षात आली नाही. बोलबोल करता यांच्यात फेसबुकला चॅटींग सुरू झाली. काही काळानंतर या महिलेने या व्यक्तीस संगमनेर येथील गणेशनगर परिसरात भेटण्यासाठी बोलविले. काही नाही, थोडसं काम आहे, मदत हवी आहे त्यामुळे चहापाणी घेऊ आणि चर्चा करु अशी तीने विनंती केल्याचे संबंधित व्यक्तीच्या अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, या व्यक्तीच्या मनात जरा देखील वाईट वाकडे काही नव्हते. त्यामुळे, मदत तथा चर्चा करण्याच्या हेतूने त्यांनी संगमनेर गाठले. तेथे एका पेट्रोलपंपावर यांची भेट झाल्यानंतर ते गणेशनगर येथे गेले. त्या घरात एकही पुरुष नसल्याने या व्यक्तीस शंका आली. त्यामुळे ते सावध होते. याच वेळी एकाने महिलेने घराचे दार बंद केले आणि संबंधित व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तुमचा मोबाईल किती सुंदर आहे असे म्हणून तो स्वत:कडे ठेवला आणि धमकी देत त्यांच्या खिशात जी काही रक्कम होती. ती त्यांनी काढून घेतली.
यावेळी या व्यक्तीने त्यांच्या मोबाईलची मागणी केली असात महिलांना त्यांना घराबाहेर काढून देत त्या दोघी कसारा दुमालाच्या पुलाजवळ गेल्या. त्यांच्याकडे यांचा मोबाईल असल्यामुळे, हे गृहस्त देखील त्यांच्या पाठोपाठ गेले. कारण, त्या मोबाईलमध्ये मुलाची काही कागदपत्रे आणि कौटुंबिक फोटो होते. या महिला या थराला जाऊ शकतात तर त्या मोबाईल व डाटा यांचा गैरवापर देखील करु शकतात याची त्यांना भिती होती. त्यामुळे ते देखील अकाले-बायपास नजीन कसारा दुमालाच्या पुलाजवळ आले. त्यांनी संबंधित महिलांना विनम्रपणे मोबाईलची मागणी केली. मात्र, नियोजनपुर्वक ठरल्यानुसार काही झालेच नव्हते तर त्या मोबाईल देणार कशा? त्यामुळे, या ठिकाणी महिला व या व्यक्तींमध्ये खडाजंगी झाली.
हा व्यक्ती स्वत:वर ठाम असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची चुक केली नाही. मात्र, संबंधित महिलांनी त्यांना सांगितले की, जर तुम्ही 10 हजार दिले नाही तर तुम्ही आमची छेडछाड केली असे म्हणून येथेच आरडाओरड करु आणि पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करु. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वत: पोलीस ठाण्यात चला असे म्हणत त्यांना नमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी लागेच दोन व्यक्तींना फोन करुन बोलावून घेतले. ते तेथे एका अलिशान गाडीत आले असता त्यांनी देखील यांना मारहाण करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोक तेथे जमा झाले असता या व्यक्तीने सर्व घडलेला प्रकार लोकांसामोर कथन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, आपले पितळ उघडे होत आहे. असे लक्षात येताच त्यांनी त्या अलिशान गाडीतून पलायन केले.
हा प्रकार दि. 6 जून 2021 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराचा आहे. बहुतांशी लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर एक मदतीच्या हेतूने गेलेल्या महिलांनी अशा प्रकारे कृत्य करावे हे संबंधित प्रांजळ मनाच्या व्यक्तीस फार वाईट वाटले. ते प्रचड घाबरलेले असल्याने त्यांना काही वेळ काहीच सुचत नव्हते. मदत करण्याचा हेतू अंगलट आल्यामुळे त्यांना पश्चाताप देखील आला होता. त्यामुळे, त्यांनी त्या दिवशी अकोल्याला येण्यापुर्वी थेट संगमनेेर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांच्या समोर मांडला. मात्र, त्यावेळी त्यांना सहकार्य झाले नाही. त्यांच्या घरात कोरोनाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे, त्यांनी शांत राहणे पसंत केले. मात्र, आजही तो मोबाईल, त्यांची रक्कम आणि त्यांच्यासोबत घडलेला प्रकार ते विसरले नाही. अकोले पोलीस ठाण्यातील दाखल झालेला प्रकार वाचताक्षणी त्यानी अधिकार्यांची भेट घेऊन आपल्या इतिहास जमा होणार्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आता ही घटना संगमनेर हाद्दीत घडल्यामुळे पुढे काय होते हे काही दिवसात समोर येईल. मात्र, अशा पद्धतीने तक्रारदार पुढे येऊन न्याय मागतात आणि येणार्या काळात पुरुषांवर झालेल्या अन्यायाला देखील वाचा फुटते हे सिद्ध करुन देत आहेत. त्यामुळे, त्यांचे समाजातून कौतूक आणि स्वागत होत आहे.