चुलत भावाने एका टोल्यात घेतला भावाचा बळी.! काळुचा राग वाळुवर निघाला, तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल.!
सार्वभौम (अकोले/राजूर):-
जेवणातील भाकरी वरून वाद झाल्याच्या क्षुल्लक कारणाने एका तरुणास तिघांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने ठार मारल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे रविवार दि. 6 जून रोजी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. अगदी क्षुल्लक कारणाने झालेल्या खुनामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. यात वाळू भगवंता बांडे (रा. खडकी बु, ता. अकोले, जि. अ. नगर) हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादिनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत भिमा चिंतामणी बांडे, हरिश्चंद्र बाजिराव बांडे व स्वप्निल भिमा बांडे आशा तिघांना आरोपी करण्यात आले आहेत. यात शोकांतीका अशी की, खुद्द चुलत भावानेच आपल्या भावाचा खून केला आहे. यात सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांनी स्वत:कडे तपास घेत तिनही आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भगवंता बंडे हे अगदी सामान्य कुटुंब आहे. मोलमजुरी आणि आवकाळी शेती करुन आपली गुजरान करते. भगवंता यांना काळु, बाळु आणि वाळु असे तीन मुले आहेत, आज ते वेगवेगळे राहतात. यातील काळु हा ओतूर येथे त्याचा चुलतभाऊ भिमा चिंतामणी बांडे याच्यासोबत शेतीच्या कामासाठी जात होता. दि. 3 जून रोजी काळु आणि भिमा यांनी एकत्र काम केले. या दरम्यान त्यांच्यात भिकरीहुन किरकोळ वाद झाले होते. त्यावेळी भिमा याने काळुला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे तो निघून आला होता. हाच घडलेला प्रकार काळु याने आपले भाऊ बाळु व वाळु याला दि.5 जून रोजी सायंकाळी 7 वाजता सांगितले होते.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 6 जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे भगवंता, काळु, बाळु व वाळु हे त्यांच्या घरासमोरील अंगनात बसले होते. तेव्हा भिमा, हरिश्चंद्र व स्वप्निल हे तिघे (सर्व रा. खडकी बु, ता. अकोले) काठ्या तसेच लोखंडी पाईप हातात घेऊन आले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट चौघांना जोराची मारहाण सुरु केली. यांच्या तडाख्यात पहिल्यांदाच काळु ऐवजी वाळु सापडला आणि आरोपींपैकी एकाने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारला. तो वार थेट मेंदुवर झाल्याने काही क्षणात तो जमिनिवर कोसळला. मात्र, आरोपी यांच्या मनात इतका रोष होता की, त्यांनी कोणताही विचार न करता चौघांना मारहाण सुरुच ठेवली. काळु आणि बाळु हे दोघे वाळुची परिस्थिती पाहून त्यास उचलण्यासाठी गेले असता आरोपींनी दोघांच्याही हातांवर जोराने मारहाण सुरुच ठेवली. तर स्वप्निलने बाळुच्याही डोक्यावर वार केला.
दरम्यान, घडलेला प्रकार लक्षात आला आणि चौघे जखमी झाल्याचे पाहून तिनही आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला. यावेळी जखमींनी वाळुकडे पाहिले असता तो काहीच हलचाल करत नव्हता, त्याचे भाऊ आणि पिताश्री यांनी एकच टाहो फोडला मात्र वाळु वाचला पाहिजे या अपेक्षेने त्यांनी तत्काळ एका गाडीत त्याला राजूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने तोवर फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी स्वॉरी म्हणत वाळुला मयत घोषित केले. त्यानंतर याप्रकरणी भगवंता शंकर बांडे यांच्या फिर्यादिनुसार राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिमा चिंतामणी बांडे, हरिश्चंद्र बाजिराव बांडे व स्वप्निल भिमा बांडे आशा तिघांना आरोपी करण्यात आले आहेत.
अकोले तालुक्यात डॉ. भांडकोळी यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व अकोले तालुक्याने त्यांच्यासाठी दुवा केली. डॉ. भांडकोळी हे आता एकदम ठणठणीत झाले असून त्यांचे हॉस्पिटल पुन्हा सुरु झाले आहे. डॉक्टर स्वत: कार्यरत झाले आहेत. याची तालुक्यातील जनतेने याची नोंद घ्यावी.