पोलीस ठाण्याच्या गेटवर नवरदेव धुतला, राजकीय घरातील मुलगी पळविली, पोलिसांचे दोघांना संरक्षण, बाकीच्यांचे स्टण्ट.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   प्रेमाला जात-पात ना धर्म असतो, त्यामुळे, एकदा का मने जुळली, मग ना गरिबी दिसते ना श्रीमंती. त्यामुळे, जर दोन्ही मुले सज्ञान आणि स्वत:च्या पायावर उभे असतील तर त्यांच्या प्रेमात भल्याभल्यांनी मध्ये येऊ नये. जर असे झाले तर कोणती रात्र काय घेऊन येईल हे आजकाल कोणी काही सांगू शकत नाही. त्यानंतर होणार्‍या परिणामाला सामोरे जाणे हेच दोन्ही कुटुंबाच्या पदरी पडत असते. असाच काहीसा प्रकार अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात घडला आहे. एका आळेफाटा येथील एका 22 वर्षीय तरुणाने एक 21 वर्षीय तरुणीस पळवून नेले आणि लग्न केले. जेव्हा दोघे पोलीस ठाण्यात आले असता मुलीच्या नात्यातील काही समर्थकांनी या नवोदीत नवरदेवास अकोले पोलीस ठाण्याच्या गेटवर मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. काही झाले तरी मी मुलाच्या सोबत लग्न केले आहे. त्यामुळे, मी घरच्यांच्या सोबत नव्हे तर माझ्या प्रियकराच्या सोबत जाणार असल्याचे त्या मुलीने स्पष्ट केले. त्यामुळे, काही लोकांनी तेथे स्टण्टबाजी करीत धिटाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून या वादाची फारशी दखल घेतली गेली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

खरंतर अकोले पोलीस ठाण्यात वाद होण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. गेल्या महिन्यात एका राजकीय पदाधिकार्‍यांनी भर पोलीस ठाण्यात मद्य प्राषण करुन धिंगाणा घातला होता. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि त्याची दखल पोलीस अधिक्षकांना घ्यावी लागली होती. आता हा धिंगाणा घालणारा देखील त्याच गुन्ह्यातील व्यक्ती असून पोलिसांनी जर त्यांचे सीसीटीव्ही कॉमेरे चेक केले तर पुन्हा तोच प्रकार समोर येईल. पोलीस अधिक्षक महोदय किंवा पोलीस उपाधिक्षक यांनी याची चौकशी केली तर घडला प्रकार समोर येईल. कारण, पोलीस ठाण्यात जर असाच कायम नंगानाच सुरू राहिला तर पोलीस ठाण्याचे भय कोणाला वाटणार नाही. आज याच पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचार्‍याने शरिर सुखाची मागणी केल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तर राजूर पोलीस ठाण्यात देखील एका मद्यपी पोलीस कर्मचार्‍याने एका महिला पोलीसाची छेडछाड केल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे दाखल झाली आहे. त्यामुळे, जगाचे गार्‍हाणे सोडविणारे पोलीसच आता चौकशी आणि त्यांच्या रंगेल कहाण्यांनी मशहुर होऊ लागले आहेत.

आता अकोले पोलीस ठाण्यात राडा म्हणजे तो काही नवा प्रकार राहिला नाही. आख्खा तालुका शांत असताना पोलीस ठाण्यातील प्रकरणे सोडविता सोडविता अधिकार्‍यांच्या नाकीनव येऊ लागले आहेत. पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी काही कर्मचार्‍यांचे कारणामे उघड केले तर त्यांना बदलीला सामोरे जावे लागले आहे. पोलीस निरीक्षक अभय परामार यांनी कर्मचार्‍यांना ताकीद देऊन देखील त्यांनी लाच खाणे सोडले नाही, परिणामी त्यांच्यावर दोन तीन वेळा संकट येऊन नंतर कंट्रोलला जमा व्हावे लागले. आता त्यांच्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी ऐन्ट्री झाली खरी, त्यात त्यांना स्थानिक राजकारणाचे ग्रहण लागले होते. तर एक बर्थडे त्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. ते प्रकरण होते कोठे नाहीतर पोलीस ठाण्याच्या आवारात एका नवरदेवास मारहाण करणे, ते ही ज्या व्यक्तीवर पहिल्या गुन्ह्यात 151 (1) ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे त्या व्यक्तीने राडा करणे म्हणजे हे पोलिसांचे अपयश नाही का?

खरंतर जेव्हा दोन व्यक्ती सज्ञान होतात आणि त्या परस्पर संमतीने विवाह करतात. तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही. एकीकडे अकोले तालुका बालविवाहात अग्रस्थानी असून येथे कोणी आवाज उठवायला तयार नाही. मात्र, स्वत:वर आले की, भल्याभल्यांची अस्मिता, जात, धर्म, प्रतिष्ठा जागी होते. हेच चित्र येथे पहायला मिळाले आहे. जेव्हा हे जोडपे पोलीस ठाण्यात आले तेव्हा एक पोलिसांवर विश्वास म्हणून त्यांनी तेथे घाव घेतली होती. मात्र, पोलीस ठाण्याच्या आवारात जर कोणी त्यांना मारहाण करीत असेल तर अकोले पोलीस ठाण्यात नेहमीच गुंडांचा वावर असतो की काय? असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने या तरुणास मारहाण केली. तो संबंधित मुलीचा नातेवाईक नाही. तो पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्‍याचा सहयोगी आहे. त्यामुळे, सुरक्षित ठिकाणी असुरक्षितता मिळत असेल तर जनतेने जायचे कोठे? असा प्रश्न अनेक सुज्ञ व्यक्तींनी उपस्थित केला आहे. आज या नवोदीत दाम्पत्यास पोलिसांनी संरक्षण दिले आहे. मात्र, त्यांच्या पुढील सुरक्षेचा प्रश्न काय? असा प्रश्न पुढे येऊन ठेपला आहे. आता हे प्रकरण घुगे साहेब कसे संभाळतात, कोणावर कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.