छत्रपती शिवरायांचे अपेक्षित स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांतील लोकशाही.!

 

  सार्वभौम विशेष :-

           छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापना केले. किल्ले रायगडावर ६ जून १६७४ ला राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्धापनदिन निमित्त २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्याचा विचार केल्यास लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोककल्याणकारी राज्य म्हणून २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला. शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मिती व प्रजासत्ताक भारताची निर्मिती या इतिहासांच्या पानावरील अभिमानास्पद व लौकीक प्राप्त घटना आहेत. या निमित्ताने आजचे भारतीय लोकशाही मुल्य व प्रजासत्ताकात प्रजेचे स्थान याबाबतचे वास्तव आत्मचिंतनचा विषय होऊ शकतो.

 शासन, प्रशासन, संस्था, राजकारण व समाजकारण यांचे वर्तमान आज अतिशय क्लेशदायी तर भविष्य चिंतादायी दिसतेय. अंधारलेल्या वाटा व  ठेचाळत चाललेले कारभारी, कारभाऱ्यांनी गमावलेली विश्वासाहर्ता, कायदे बनविणाऱ्या सभागृहांची झालेली गावचावडी, राजकारण, समाजकारण व वैयक्तिक जीवनात कार्यकर्तृत्वाची हरवलेली निकोप स्पर्धा व बदनामीतून खच्चीकरणाची वाढलेली राजकीय संस्कृती ही आजची दारुण व क्लेशकारक स्थिती आहे. ज्याचा परिणाम सार्वजनिक व वैयक्तिक जीवनावर आज होत आहे. याला जबाबदार कोण. सत्ताधारी, विरोधक, शासन-प्रशासन, राजकारणी, बुद्धिवादी, अजाण किंवा अज्ञानी व्यक्ती की समाज. आजच्या परिस्थितीत दोषी ठरवायचे झाल्यास व एका शब्दात उत्तर द्यावयाचे तर प्रत्येक घटक कमी अधिक प्रमाणात जबाबदार आहे. लोकशाही व्यवस्थेत हक्काच्या लाभाची अपेंक्षा ठेवणारे कर्तव्यात मात्र कसूर करीत असलेले हे सर्व घटक आहेत. एकमेकांकडे बोटे दाखवून हे भयावह वास्तव लपविता येणार नाही.

    उगवणारा प्रत्येक दिवस अनुभवताना माणूस कालचा दिवस चांगला होता असे म्हणतो. भूतकाळ बरा होता, वर्तमान सोसवत नाही व भविष्य चांगले दिसत नाही असे असेल तर मागे वळून बघण्याचे आपण विसरून गेलोय. संसदेत भाषण करताना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबाबत बोलताना असे म्हटले होते की, काय घडले याला इतिहास समजू नये तर कसे घडावे याला इतिहास संबोधावे. व्हिएतनामला जाण्याची संधी मला मिळाली होती. कॉम्रेड व्ही चिमिन यांच्या पुतळ्यावर कोरलेले वाक्य आहे ज्यात लिहिले आहे. “ छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेतोय.” कॉ. व्ही चिमीन यांनी शिवाजी राजांचा ‘ गनिमी कावा’ वापरून जगातील साम्राज्यवादी देश अमेरिकेला पराभूत करून व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळवून दिले. जगाच्या पाठीवरील सर्वाधिक लोकसंख्येचा आपला देश लोकशाही व्यवस्थेवर चालवतांना देश घडविणार्या, वाढविणाऱ्या व समृद्धीपर्यंत या देशाला घेऊन आलेल्या राष्ट्रीय नेत्यांचे विचार, कार्यपद्धती व दृष्टिक्षेपाकडे पाठ फिरवून देश व राज्य किंवा संस्था तसेच समाजव्यवहार चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न आज होतोय. बापाला विसरलेली व्यक्ती कुटुंब चालवू शकत नाही. माझ्या गावात (नवलेवाडी तालुका अकोले) देशातील सर्वात अधिक स्वातंत्र्यसेनानी आहेत. ग्रामसभेत मागे बसलेल्या तरुणाला मी जाणीवपूर्वक विचारले स्वातंत्र्यसैनिक म्हणजे कोण ? याचे उत्तर त्याला  देता आले नाही. ही एका तरुणाची ही स्थिती आहे असे समजू नये. प्रत्येक  राष्ट्रीय नेत्याला समजुन न घेता आपला प्रवास रामभरोसे चालू आहे. शिवजयंतीला  मिरवणूकीत भलत्याच गाण्यावर ठेका धरून नाचणारी तरुणाई पाहताना काय होईल छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्वच राष्ट्रीय नेत्याच्या विचारांचे ? आपण त्यांचे विचारांना पराभूत करतोय याचे भान हरपलेली व्यवस्था आज नांदते आहे.

   

वर्तमानाची व्यथा व भविष्याची काळजी करणारे सर्वच घटक आज इतिहासाकडे पाठ करून वर्तमान जगू पाहतात व या जगण्याला व मनमानीला लोकशाही समजतात. पोटभरू आयुष्य नव्हे तर स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन घडविणारी व्यवस्था आजही जन्माला आलेली नाही. शिक्षण पद्धतीचे म्हणावे तर उणे ‘जीवन शिक्षण’ पद्धतीमध्ये फक्त परीक्षार्थी घडतात. आव्हान पेलणारा नागरिक नाही.

विदेशात जाऊन बॅरेस्टर झालेले कितीतरी मान्यवर समाजसेवेत आले. राजकीय क्षेत्रात आले. सत्तेसाठी राजकारणात नाही तर माझी किंवा माझ्या पक्षांची विचार प्रणालीच जनकल्याणाची व देशहिताची आहे या जाणिवेतून उभे आयुष्य पक्षासाठी व देशासाठी अर्पण केले त्यांची आठवण होत नसेल अगर त्यांचा विचार मनाला स्पर्श करीत नसेल तर अशा राजकारणी नेत्यांकडुन लोकशाही मार्गाने देश व लोककल्याण केवळ दिवास्वप्न ठरेल. राजकारणात येण्याच्या  ऊर्मी आता बदल्यात. त्याग, योगदान हे राजकीय क्षेत्रातील परवलीचे शब्द आता हवेत विरलेत. सत्ता हस्तगत करण्याचे तंत्र हे सत्ता,संपत्ती व प्रतिष्ठा या सूत्रांमध्ये अडकलेय हे स्पष्ट झालेय. या तंत्राशिवाय राजकारण करू पाहणारांची स्थिती आज केविलवाणी झालीय. घुसमट व उदासीनतेच्या खाईत विचार,मूल्य,चारित्र्य व आपली राजकीय विचारधारा याचा जप करण्याखेरीज  त्यांच्या नशिबी दुसरे आता काही उरले नाही जनअपेक्षांची पूर्ती व देशहिताची कीर्ती आता राजकारणात कुणालाच नको आहे. लोकशाही व्यवस्थेत मात्र राजकारण व राजकारणी यांना पर्याय नाही. म्हणून राजकारणात चांगले लोक यावे. तरच राजकारण रयतेच्या हिताचे  होइल. हे सुद्धा विशेष महत्वाचे आहे.  

       आजतर उघडउघडपणे विषमतेच्या विषवल्लीला शासन खतपाणी घालते आहे. बिनदिक्कतपणे महिनोमहिने चाललेल्या शेतकरी आंदोलनाची साधी दखल घेतली जात नाही. हे त्याचेच उदाहरण आहे.‘ हम करे सो कायदा ’ या नुसार तीन कृषी विधेयके आम्ही म्हणतो म्हणून शेतकरी हिताची आहेत. असे केंद्र सरकार म्हणत आहे. शेतकरी  काहीही म्हणो सरकार म्हंटले तेच खरे ही आजची लोकशाही आहे. आजही विषमतेचा वेलू वाढत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षानुसार प्रत्येक नागरिकांच्या स्वावलंबनाची आणि स्वाभिमानाची व्यवस्था जन्माला यावी. यावर मात्र कोणी बोलल्याचा आवाज येत नाही. बेंबीच्या देठापासून मांडणारां व भांडणारा  कार्यकर्ता व याचा आवाज क्षिण होतो आहे. तरीही जनता मात्र अफूच्या गोळीने ग्लानी आल्यासारखी जगतेय. 

                  राज्य अगर देश चालविणाऱ्या रथाची दोन चाके म्हणजे शासन व प्रशासन आहे अशी वाक्य नेहमी आपण ऐकतो. मात्र यांचा सूर जुळलेला कुठेच ऐकू येत नाही. प्रशासन अद्यापही रयतेच्या राज्याचे प्रशासनात्मक अंग आहोत. असे मानीत नाही. त्यांचा म्हणून एक निरंकुश सत्ता शासकाचा तोरा आजही कायम आहे. शासन हाकणारी यंत्रणा प्रशासन समजून घेवून किंवा प्रशासकीय चौकटीची नवी फ्रेम तयार करून रयतेला सहजसुलभ प्रशासनसेवा मिळू शकेल असे काही करीत नाही. आजही सामान्य माणूस सरकार दरबारी जाऊन आपले काम करू शकत नाही. “ द्यावे तेव्हा घ्यावे ” ऐशी  उदार प्रशासनसेवा आज कार्यरत आहे.

                  लोकशाही व्यवस्था किंवा घटना मान्य करून राजकीय सामाजिक क्षेत्रात पूर्वी काम करणारा ‘कार्यकर्ता’ आज राजकारणात कुठेच दिसत नाही. मनमानी, दंडेलखोर वृत्ती व सुलतानी प्रवृत्तीनुसार काम करणारा वर्ग आज राजकीय सामाजिक क्षेत्रात दादागिरी करून आपले प्रस्थान प्रस्थापित करीत आहे. शिवाय दुसरा एक वर्गसुद्धा सत्ता हाती घेण्यात यशस्वी झालेला दिसतोय. आर्थिक धनदांडगाई ने पुढे आलेला. निवडणुका जिकंण्यात त्यांची गुणवत्ता सर्वात अधिक असते अशा पुढाऱ्यांनी राजकारण आपल्या हाती घेतले आहे.ज्याची पूर्वीची ओळख कार्यकर्ता आहे असा कार्यकर्ता राजकारणाच्या आखाड्यात पुढाऱ्यांच्या गर्दीत आज पूर्णपणे हरवलाय. कदाचित ‘ तो हारलाय सुद्धा’ त्याची हार ज्यांना आपण समाज संबोधतो त्या समाजानेच केलीय. सत्ता जेव्हा निरंकुश होते तेव्हा कार्यकर्ता राजकारणात अधिक महत्वाचा ठरतो.हे आजही लक्षात घ्यावे.जनाकुंश निर्माण करण्याची क्षमता त्याच्यात असते. मात्र आर्थिक व व शारीरिक सामर्थ्य असलेले व्यवसायिक राजकारणी  कार्यकर्त्याला पराभूत करून राजकारणात आपले बस्तान बसवतात. समाज मात्र हे  उघड्या डोळ्यांनी बघत असतो. समाज ‘कार्यकर्ता’ घडवितो, वाढवीतो व आपलेच सुरक्षा कवच निर्माण करतो. अशा कार्यर्त्याला बळ देण्याचे समाज विसरला तर मतदानाचा हक्क राहिला तरी लोकशाही असेल का ? समाजानेच हा विचार करण्याची गरज आहे.                                                                      

 - मधुकर नवले 

मो.नं.८८८८९७५५५५