पडळकर साहेब.! ना. थोरातांकडे याल तर तोंड पाहण्याजोगे ठेवणार नाही.! पात्रता पाहुन टिका करा.! संगमनेरकर आक्रमक.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
राजकीय नेते दोन प्रकारे पुढे येतात. परंपरागत प्रकार म्हणजे स्व-कर्तुत्व आणि आता नव्याने पुढे आलेली वाच्चाळता. गोपीचंद पडळकर हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. कारण, गोपीचंद पडळकर यांचे स्व-कर्तुत्व शुन्य असल्याने ते प्रस्थापित नेत्यांवर तोंड सुख घेऊन राज्यात नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते शरद पवारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत वादग्रस्त विधान करून माध्यमांनमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तर आ. रोहित पवार म्हणतात शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर टिका करण्यासाठीच पडळकर यांना विधानपरिषदेवर आमदार केले आहे. सध्या त्यांचे टार्गेट बनले आहे. ते शांत, मृदु, संयमी स्वभावाचे नामदार बाळासाहेब थोरात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात या सत्ता समीकरणाचे दुवा ठरले. त्यामुळे, काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीची स्तुती चौफेर होत आहे. एक संयमी नेता म्हणुन त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. परंतु, त्यांच्या बदनामीचे षडयंत्र आता भाजपकडून रचले जात आहे की काय? अशी टिका राज्यभरातील राजकीय विश्लेषकांकडून होत आहे. कारण, छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे, येथे विरोध हा विचारांचा आणि तत्वाचा पाहिला जातो. पण, भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी ना. थोरतांवर ट्विट करताना अक्षरशः राजकीय भाषा वगळता खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पडळकर यांनी ट्विट केले की, 'महसुल मंत्री' पदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमीष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत... मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ पडळकरांच्या या वादग्रस्त ट्विटला ना. थोरतांनी आपल्या प्रांजळ स्वभावाप्रमाणे विशेष महत्व न देता त्याची दखल घेतली नाही. पडळकरांना वाचाळवीर म्हणुन सोडुन दिले. मात्र, ना.थोरातांची कन्या व अमृतवाहिनी कृषी शैक्षणिक संस्थेच्या संचालक शरयु देशमुख यांनी अतिशय अचुक शब्दात त्यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. अतिशय सौम्य शब्दात पडळकरांना संस्कार शिकवले आहे. त्यांनी ट्विट द्वारे म्हणले आहे की, ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ यामध्ये त्यांनी पडळकरांची पात्रता काय आहे, हे पण आणि त्यांचे संस्कार काय आहे हे पण दाखविले आहे.
दरम्यान, राज्यात आरक्षणाचा राजकीय वणवा पेटला आहे. त्यावरून राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, ओबीसींना चार महिन्यात पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन.’ असे वक्तव्य केले होते. त्यावर टिका करताना महसूलमंत्री थोरात यांनी ‘फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. विदर्भ राज्याच्या मागणीसाठीही त्यांनी पूर्वी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती.’ अशी टिका केली होती. पण, ही टीका होत नाही तेच पडळकरांनी थोरतांवर ट्वीटद्वारे संतापजनक टिका केली. या टिकेवर राज्यभरातुन संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. तसा ही भाजप पडळकरांचा उपयोग ढोल बजवण्यासाठीच करते. ते ही इमानइतबारे ढोल बजावत असतात. पण, यातुन त्यांना स्व-पक्षीय समर्थकांच्या टाळ्याच मिळतात. लोकांचा पाठींबा यत्किंचितही मिळत नाही. हे पडळकरांचे बारामतीतून डिपॉजित जप्त झाल्याने संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. पडळकरांची विचारसरणी दर लाटेला बदलत असते. कधी वंचित बहुजन आघाडी तर कधी भाजपच्या लाटेवर स्वार होऊन त्यांनी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या तिसऱ्या पक्षाची लाट दिसून आल्यास पडळकर भाजपच्या वरिष्ठांवर ही तोंडसुख घेण्यास मागे-पुढे पाहणार नाही. कारण, वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांनी मोदींवर देखील टिकेचा निशाणा साधला होता. तर भाजपची अैसी के तैसी करत पडळकरांनी तोंडसुख घेत बच्चे खुश केले होते. खरंतर निष्ठा आणि शपथ म्हणजे हे या पडळकरांना काय माहित असणार.! राजे छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मस्तकावर हात ठेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. म्हणून तर तलवारीच्या टोकावर आणि मनगटाच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य उभे केले. याला म्हणतात अस्मिता आणि शपथ.! पण, याच पडळकरांनी सांगलीच्या लोकसभा मतदारसंघात धनगरांची दैवत बिरोबा देवतेची शपथ घेऊन कपाळी भंडार लावलेल्या जनतेसमोर सांगितले होते. एकवेळी माझा बाप भाजपत गेला तरी मी भाजपत जाणार नाही. अन झालं काय? हेच पडळकर केवळ आमदार व्हायला भाजपत गेले आणि कशाचा सौदा केला ? तर वाट्टेल ते बरळायचे आणि भाजप विरोधकांवर तुटून पडायचे. म्हणू तर राष्ट्रवादी कॉ.चे प्रवक्त म्हणाले होते. पडळकर ही धनगरांचा नव्हे तर ती आरएसएसची औलाद आहे. हेच पडळकरांच्या प्रत्येक वक्तव्यातून सिद्ध होत आहे. म्हणून पडळकर हे फार मनाला लावून घेण्याजोगे व्यक्तीनत्व नसून केवळ राजकीय मनोरंजन आहे असे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत.
दरम्यान, या ट्विटमुळे नामदार साहेबांची कन्या शरयु देशमुख ह्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांनी अनिती आणि अपशब्दाचे राजकारण कधी केले नाही. संगमनेरकरांना त्यांचे गुण व कार्यपध्दती चांगल्या प्रकारे माहीत आहे. ना. थोरतांवर राज्याची जबाबदारी असताना त्यांनी मतदारसंघाची जबाबदारी अतिशय खंबीरपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. संगमनेरमध्ये महिला सशक्तीकरण व सबलीकरण यात त्या नेहमी अग्रेसर असतात. महिलांसोबत हळदी कुंकू, बचतगट, संवादसभा अशा नाना उपक्रमांतून सामन्यातल्या सामन्य महिलेसोबत त्यांनी आपली भावनिक नाळ जोडली आहे. मतदारसंघातील शैक्षणिक संस्था प्रगती पथावर नेण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी कधी राजकीय हस्तक्षेप केल्याचे फारसे पहायला मिळत नाही. मात्र, या ट्विटच्या माध्यमातून आपण आपल्या वडिलांच्या राजकारणाचा वारसा उत्तम प्रकारे चालवु शकतो. याची चुणुक राज्यातील जनतेला दाखवुन दिली आहे.
दरम्यान, चित्रपटात हिरोगिरी करणाऱ्या पडळकरांना संगमनेरातून फार विद्रोही टिकेला सामोरे जावे लागत आहे. संगमनेरचा राजा जरी शांत सयमी असला तरी येथील प्रजेने त्यांना ३५ वर्षे आमदार म्हणून निर्विवाद राज्याचे नेतृत्व करायला पाठविले आहे. ते भलेही शांत असोत, मात्र त्यांचे कार्यकर्ते बाकी पडळकरांना पुरून उरतील असे आहेत. त्यामुळे, काल राज्य पाहणारे ना. थोरात उद्या देशात जाण्याच्या तयारीत आहेत आणि कोण कुठले हे पडळकर? ज्यांना आयुष्यात एक निवडणूक धड जिंकता आली नाही, भाजपच्या कुबड्या घेऊन यांनी विधानपरिषद गाठली त्यांनी ना. थोरातांवर बोलावे का? त्यांची तितकी पात्रता आहे का ? त्यांनी भाजपचा इतिहास तपासला पाहिजे की, स्वत: चंद्रकांत पाटील म्हणाले होेते. ना. बाळासाहेब थोरात हे धुतल्या तांदळासारखे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यावर टिका करणे योग्य नाही. त्यामुळे, पडळकर हे चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा हुशार व अनुभवी नाहीत. हे भाजपने तरी समजून सांगितले पाहिजे. खरंतर, पडळकर हे पर्वी चित्रपटात हिरो म्हणून काम करायचे. त्यामुळे, तेथे स्क्रिप्ट असायच्या. आता भाजपने त्यांना काही ठराविक मानसे टारगेट म्हणून नेमून दिले आहेत. त्यांच्यावर बोललं म्हणजे तुम्ही राजकारणात हिरो म्हणून टिकून रहाल असे सांगितल्याने उठसुट पवार आणि महाविकास आघाडी. हे ठिक आहे. परंतु, ना. थोरातांवर टिका कराल तर हिरो एवजी झिरो व्हाल हे लक्षात ठेवा अशी टिका संगमनेरकर करु लागले आहेत. या पुढे जात ते म्हणतात की, धनगर समाज पाहुन तुम्ही बारामतीत गेले, तेथे डिपॉझिट जप्त झाले. जर संगमनेरचा विचार कराल तर आयुष्यभर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अशा प्रकारे पडळकर यांना थोरातांवरील टिका जड गेल्याचे दिसून आले आहे.
तर सोलापुरात गोपिचंड पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी आज दि. 30 जून 2021 रोजी सायंकाळी दगडफेक करण्यात आली. त्यात ते बचावले असून काल त्यांनी जे काही राजकीय वक्तव्य केले. त्या संदर्भात हा हल्ला झाल्याची माहिती पडळकर यांनी दिली आहे. तर, या हल्ल्याचे खापर पुन्हा त्यांना पवार कुटुंबावर फोडले आहे. याबाबत कोणताही गुन्हा दाखल करणार नाही. असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.