राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने आमदारांना विचारले, तुम्ही कोणत्या पक्षाचे आमदार आहे.! त्यांनी पोलिसांना बोलविले आणि दिले आत टाकून.!


- Sagar Shinde

 सार्वभौम (अकोले) :-

                             माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आणि ऐकीकडे भाऊ प्रेम तर दुसरीकडे पक्षप्रेम त्यामुळे अनेकांच्या मनात निर्णयाचा द्वंद्व निर्माण झाले होते. तरी देखील काही झालं तरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडायचे नाही. म्हणून अनेकांनी काळजावर दगड ठेऊन राष्ट्रवादी स्विकारली. अशा विपक्ष परिस्थितीत अगदी सामान्य मानसाने डॉ. किरण लहामटे यांना साथ देत राष्ट्रवादीला प्रचंड मतांनी विजयी करुन दिले. मात्र, हे महोदय पक्षातील कार्यकर्त्यांना विचारायला तयार नाहीत, त्यांच्या गळ्यात कधी राष्ट्रवादीचा गमछा तुम्ही पाहिलाय का? नाही ना? म्हणून तर एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने त्यांना विचारणा केली की, तुम्ही गळ्यात नेहमी भगवे घालतात, राष्ट्रवादीचे काही नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे, तुम्ही कोणत्या पक्षाचे आमदार आहात? तुम्ही एकदा राष्ट्रवादी की जय म्हणा. अशा प्रकारची शब्दीक बाचाबाची नवनाथ काळे आणि डॉ. लहामटे यांच्यात झाली. त्यामुळे, आमदार महोदयांना राग आला आणि त्यांनी त्यांचे आवडते सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना फोन करुन तत्काळ या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यास सांगितली. मग काय.! तेथे कसला उशिर आलाय.! घुगे यांनी त्या कार्यकर्त्यास उचलुन आणले आणि थेट त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. तो रात्रभर पोलीस ठाण्यात बसून होता. भलेही तो मद्यपी अवस्थेत होता. मात्र, त्याचे पक्षप्रेम हे लक्षात घेता आमदारांनी त्याच्यावर इतकी मोठी कारवाई करणे अपेक्षित नव्हती. म्हणजे राष्ट्रवादीवर प्रेम करणे हीच माझी चुक का? असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे.


काळे काय म्हणतात..

साहेब.! आम्ही त्या आमदारांसाठी इतके रखडलो की, आम्ही 20 कार्यकर्त्यांनी स्वत: पैसे काढून येथे बुथ लावले. जे लोक कामं करीत होते त्यांनी स्वखर्चाने वडापाव चारले. आमच्या बेलापूर गावातून पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला मतदान झाले होते. म्हणजे 2 हजार 332 लोकसंख्या असताना 16 शे मतदार लहामटे यांना तर अवघे 300 मतदान वैभव पिचड यांना झाले होते. आम्ही सर्व खानदानी राष्ट्रवादी आहोत. असे असताना जेव्हा डॉक्टर निवडून आले तेव्हा ते गावात आल्यानंतर आम्हाला न विचारता त्यांच्या आवती भोवती सर्व विरोधक दिसतात. तेव्हा मी त्यांना एकदा विचारले होते की, तुम्ही कोणत्या पक्षाचे आमदार आहात. तुम्ही एकदा राष्ट्रवादी की जय असे म्हणा. मात्र, लहामटे जय म्हणाले नाही. ही गेल्या काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे, त्यांच्यात आणि माझ्यात पक्षाच्या निष्ठेहून बाचाबाची झाली होती.

डॉ. लहामटे हे शनिवारी आमच्या गावात आले होते. त्यांची आणि माझी आमने सामने गाठभेट झाली. मी नक्कीच मद्यपी होतो. मात्र, माझा एकही प्रश्न वावघा नव्हता. कारण, मी त्यांना निवडून येण्यासाठी फार कष्ट घेतले होते. माझे भाऊ, मित्र यांनी स्वत: काही खर्च केला होता. म्हणून त्यांनी गावात यावं, विरोधकांना बळ देण्यापेक्षा आम्हाला बळ द्यावे, गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा घालावा असे आम्हाला मनापासून वाटत होते. मात्र, ते जेव्हा येतात तेव्हा आमचे विरोधकच त्यांच्या आसपास दिसतात. ते जेव्हा गावात आले तेव्हा मी त्यांना प्रश्न केला की, तुम्ही कोणत्या पक्षाचे आमदार आहात. तुमच्या गळ्यात भगवी शॉल असते, पक्षाचे काहीच कधी दिसत नाही. माझा प्रश्न माझ्यासाठी काही वावघा नव्हता. मी कोणत्याही प्रकारची शिविगाळ किंवा वाईट बोललो नाही. मात्र, विरोधकांनी त्यांचे कान भरले आणि मला धडा शिकवा असे सांगितले. त्यानंतर आमदारांनी तत्काळ अकोले पोलीस ठाण्यात फोन केला आणि मला रात्री ११ वाजता पोलिसांनी उचलुन नेले.

या सगळ्या गोष्टीत मला एकच प्रश्न पडला की, मी फार कट्टर मद्यपी नाही, मात्र राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यामुळे, त्यांच्या काही गोष्टी खटकने हे सहाजिक होते. आमच्यातील वाद हे काही टोकाचे नव्हते. मात्र, मला समजून सांगण्यापेक्षा थेट पोलीस ठाण्यात फोन करुन मला अटक करायला सांगणे, म्हणजे राष्ट्रवादीला मदतान करण्याचे किंवा कार्यकर्ता असण्याचे हाच का फळ? गेल्या अनेक वर्षात आम्ही पिचड कुटुंबासोबत राष्ट्रवादीत काम केले. मात्र, त्यांनी कधी ब्र शब्दाने आम्हाला दुखावले नाही. हीच फार मोठी खंत आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला एका खोलीत घेऊन समजून सांगितले असते तरी मला आनंद वाटला असता, तसेच भले पोलिसांनी मला उचलुन नेले असते तरी चालले असते. मात्र, समज देऊन सोडून दिले असते तरी मला मान्य झाले असते. मात्र, 24 तास मला आत बसावे लागले. माझ्या मनात काय विचार आले असतील हे मलाच माहित आहे. अशा प्रकारची मुलाखत स्वत: नवनाथ काळे यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली.

style="color: red;">काय केली कारवाई.! 

कलम 85 असे सांगतो की, एखादा व्यक्ती कोणत्यातरी (दारु, गांजा, आफू चरस वैगरे) नशेत असताना त्याला समोरच्या व्यक्तीला काय बोलावे याची ज्ञान राहत नाही. त्यामुळे, तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने नव्हे तर त्या नशेच्या आधिन राहून शब्द अपशब्द बोलत असतो. त्यामुळे, हा गंभीर गुन्हा नाही. असे हे सेक्शन सांगते. आता हा शुल्लक प्रकार असताना पोलिसांनी रात्री अपरात्री बेलापूर येथे जाऊन अशा सामान्य व्यक्तीवर इतक्या शिताफीने कारवाई करणे म्हणजे किती मोठी ही तत्परता? गेल्या सहा महिन्यांपासून येसरठाव येथे उभा माणूस जिवंत जाळून टाकला. साधं या गुन्ह्याचा एक धागा देखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर, काळे म्हणतात, मी भलेली नशेत असेल, पण चुकीचे काय विचारले होते? आ. संग्राम जगताप पहा, आ. रोहित पवार पहा, खुद्द अजित दादा पहा, यांच्या गळ्यात प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रवादीचे गमछे असतात. अन आमच्या आमदारांच्या गळ्यात नेहमी भगवी शॉल.! ना ते राष्ट्रवादी की जय म्हणतात ना ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जवळ करतात मग मी काय चुकीचा प्रश्न केला? त्यामुळे मला 24 तास आत बसावे लागले.!

हीच खदखद अकोले शहरातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमदारांच्या जवळचे चारदोन डोके सोडले तर अन्य कार्यकर्ते आणि साहेब यांचे फारसे लागते जुकते नाही. राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना त्यांच्या वागण्याची आणि भगव्या शॉलची फार अ‍ॅलर्जी दिसते आहे. म्हणून तर आजकाल डॉ. किरण लहामटे यांचे जे काही पोष्टर सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यावर आता शॉल असणारे फोटो नव्हे तर राष्ट्रवादीचा गमछा गळ्यात असणारे पोष्टर फिरु लागले आहेत. म्हणजे, नकळत आमदारांनी जनतेच्या मनात जे काही स्थान निर्माण केले होते. ती लाट आता विरोधात अवतरु लागली आहे. त्यांचे हेच वागणे त्यांच्यासाठी घातक असून त्यांना ते सांगायचे कोणी? आणि ते ऐकणार तरी कोणाचे? त्यांचा एकला चलो रे.! चा नारा त्यांना भविष्यात आमदार होण्यापासून दुर नेत आहे. हेच विरोधकांना हवे आहे. मात्र, त्याचे अवलोकन डॉक्टर करायला तयार नाही. आज आमदार हे पद आहे म्हणून लोक त्यांच्या मागेपुढे फिरत आहेत. पद गेल्यानंतर आपण किती मानसे कमविली? याची जेव्हा गोळाबेरीज होईल तेव्हा वेळ निघून गेलेली राहील. हे सांगणारा एकही प्रगल्भ बुद्धीमत्तेचा माणूस त्यांच्या सानिध्यात नसल्याची खंत देखील अनेक लहामटे समर्थक मोठ्या खेदाने बोलुन दाखवत आहे. त्यामुळे, साहेब.! अजून वेळ गेलेली नाही. सन 2024 ची अनेकजण अगदी चातकासारखी वाट पाहत आहेत. आज पेेरलं तरच उद्या उगवेल, त्यामुळे, कार्यकर्ते संभाळा.!

क्रमश : भाग ५