मी अकोल्यातून रेल्वे नेणार म्हणजे नेणार! ते श्रेय्य घ्यायला येतील.! त्यांनी अधिकार्‍यांची सोडून रेशन चोरांची रेकॉर्डींग व्हायरल करावी.! पिचडांची जहरी टिका.!


सार्वभौम (अकोले) :-

                              राष्ट्रवादीच्या कृपेने अकोल्याच्या पदरात फक्त रेल्वेच्या भोंग्याचा आवाज नशिबी पडला आहे. तसेच अकोल्यात बहुतांशी विभागांमध्ये कनिष्ठ दर्जाचे प्रभारी अधिकारी आहेत, तिसरी लाट येऊ घातली आहे तरी अद्याप अ‍ॅक्सिजन टँक नाही, दुसर्‍या लाटेत येथे किड्या मुंगीसारखे लोक मयत झाले तरी येथे आरोग्यची यंत्रणा प्रगल्भ झाली नाही, ना येथे उपजिल्हा रुग्णालय मिळाले. उलट कोरोनाची आकडेवारी खोटी दाखविली जात आहे. उलट तालुक्यात कोरोनाच्या काळात देखील जे लोकप्रतिनिधी गोरगरिबांचे रेशन चोरणार्‍यांना पाठीशी घालतात त्यावर काय म्हणावे समजत नाही. जर अधिकार्‍यांचे फोन व्हायरल केले जातात मग रेशन चोरणार्‍यांचे का नाही? असा प्रश्न वैभव पिचड यांनी उपस्थित केला. म्हणजे, ज्याच्या हातील चाव्या, तोच चोर अशा प्रकारची जुनी म्हण आहे. त्याप्रमाणे येथे कारभार सुरु आहे का? असेच काहीसे म्हणत पिचडांनी अनेक गोपनिय गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर अकोल्यातून रेल्वे जाणार म्हणजे जाणार, त्यासाठी माजी मंत्री मधुकार पिचड साहेब हे केंद्रात प्रयत्न करीत आहेत. या पलिकडे अकोले बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव येऊन भंडारदरा धरणाला विल्सन डॅम ऐवजी अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे हे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली, तर निळवंडे धरणाला मधुसागर हे नाव द्यावे अशी मागणी भाऊप्रेमी यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले बस स्थानकावर छत्रपती शिवरायांचा अश्वरुढ पुतळा उभा करुन भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे हे नाव द्यावे यासाठी माजी. आ. वैभव पिचड हे फेसबुक लाइव्ह आले होते. त्यांच्या या विषयानंतर अकोले तालुक्यातून रेल्वेने जो काही टर्ण घेतला आहे. त्याबाबत जनतेने पिचड यांच्यापुढे कैफीयत मांडली. त्यानंतर वैभव पिचड यांनी डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता चांगलाच खरपूस समाचार घेतला. ज्यांनी पत्रकार परिषदा घेऊन देवठाण आणि बोटा येथे रेल्वे स्टेशन होणार असे सांगितले होते त्याचे काय झाले? म्हणजे जनतेच्या तोंडाला पाने पुसली असेच ना? त्यामुळे, आता अकोल्यातून रेल्वे जावी, देवठाण आणि बोटा येथे स्थानक व्हावे यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी स्वत: पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे, हा मार्ग कोणी पळविला आहे हे जनतेने लक्षात घ्यावे, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणतात मला मार्ग बदलल्याबाबत माहिती नाही, तर दुसरीकडे सर्व स्टेशन हे संगमनेरातून गेले आहेत. त्यामुळे, आता जी काही यंत्रणा हलेल ती केंद्रातूनच. त्यामुळे, आमचा पाठपुरावा सुरू झाला आहे. नंतर फक्त श्रेय्यवाद घ्यायला कोणी येऊ नये म्हणजे झालं.! अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसल्या.

तर, अकोले तालुक्यात रेशन घोटाळ्याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर मा. आमदार म्हणाले की, हे ठेकादार कोण आहेत याची माहिती घेतली पाहिजे. तर जे लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल करतात ते रेशन घोटाळे करणार्‍या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या क्लिपा व्हायरल का करीत नाहीत? असा देखील प्रश्न पिचड यांनी उपस्थित केला. आपल्या गुन्हेगारी कार्यकर्त्यांना पाठीशी घालायचे, त्यांचे समर्थन करायचे आणि आपण गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहोत असे म्हणत छाती ठोकायची. असा प्रकारची जहरी ठिका सोशल मीडियावर पहायला मिळाली.

दरम्यान, अकोले तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. अकोले पोलीस ठाण्यात 42 कर्मचार्‍यांची गरज असताना येथे फक्त कार्यरत म्हणून 22 कर्मचारी आहेत. म्हणजे राजूर येथे 18 तर अकोल्यात 22 म्हणजे शहर पोलीस ठाण्याचे उप पोलीस ठाणे करुन ठेवले आहेत. विशेष म्हणजे अकोल्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असताना येथे दुय्यम दर्जाचा म्हणजे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणून बसविले आहेे. हे आणले कोणी? असा खोचक सवाल तोफीक शेख यांनी उपस्थित केला. तर अकोल्यातील गुन्हेगारी आणि भोंगळ कारभारला आळा घालण्यासाठी आता रस्त्यावर उतरू अशा प्रकारची तंबी राहुल देशमुख यांनी दिली आहे. तर अकोल्यात आमदारांच्या जाचापोटी कोणी अधिकारी यायला तयार नाही. म्हणून तर बांधकाम विभाग, लघु पाठबंधारे, शिक्षण विभाग अशा अनेक ठिकाणी दुय्यम दर्जाचे अधिकारी कसेबसे दिसव काढण्याचे काम करीत आहे. तर या विषयावर मी पुन्हा लाइव्ह येईल असे पिचड म्हणाले. यावेळी, त्यांनी प्रशासनाने कोविडच्या काळात त्यांना सहकार्य केले नाही. समशेरपूर कोविड सेंटर चालविणार्‍या रावसाहेब वाकचौरे आणि संदिप दराडे यांच्यासह कैलास वाकचौरे, जालिंदर वाकचौरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे कौतूक केले.