अजित दादा पिचड मला नको म्हणजे नको.! म्हणून डॉक्टरांची गायकर पाटलांशी कट्टी.! पाटलांचे मत ऐकताच दादा म्हणाले आमदार तुम्ही थांबून घ्या.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात साखर कारखान्याचे राजकारण जोमात सुरु आहे. कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधत आहे. याची प्रचिती आता जनतेसमोर येऊ लागली आहे. काही झाले तरी तालुक्याची धनलक्ष्मी बंद पडायला नको. हेच आम जनतेचे मत आहे. मात्र, दुर्दैवाने येथे नको त्या वेळी राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. या राजकीय स्टण्टबाजीवर तोडगा काढण्यासाठी दोन शिष्ठमंडळ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. डॉ. किरण लहामटे हे आमदार असल्यामुळे त्यांना प्राधान्य नक्कीच होते. मात्र, त्यांनी परखड शब्दात दादांकडे कागाळी केली की, काही झाले तरी मला पिचड हे अगस्ति कारखान्यात नकोत. त्यांना आपण एकीकडे दुर लोटत आहोत आणि दुसरीकडे गायकर साहेब, पांडे साहेब हे त्यांच्या बरोबरीने बैठका घेतात तर पत्रकार परिषदा घेतात. हे आम्हाला आणि कार्यकर्त्यांना फार खटकते आहे. त्यामुळे, यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होणे सहाजिक आहे. अशा प्रकारचे मत मांडण्यात आले. त्यानंतर, अगस्ति साखर कारखाण्याचे व्हा. चेअरमन आणि संचालक प्रकाश मालुंजकर तसेच मिनानाथ पांडे यांच्यासह अन्य शिष्ठमंडळाने त्यांची बाजू मांडली. त्यानंतर, ती योग्य वाटल्याने अजित दादांनी सांगितले की, आमदार साहेब, जोवर कारखाण्याच्या निवडणुका लागत नाहीत. तोवर तुम्ही समझदारीची भूमिका घ्यावी. कारखाना चालु असताना ऐकाएकी अशा प्रकारची भूमिका घेणे हे कारखाण्याच्या चालु हंगामासाठी बाधक आहे. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर, ही बैठक संपल्यानंतर आमदार अकोल्याच्या शिष्ठमंडळाशी साधे बोलले देखील नाही. त्यांच्या हेकेखोर ठेक्यात त्यांनी तेथून काढता पाय घेतला आणि मंत्रालयातील अन्य कामे त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
सन २०१९ च्या निवडणुकीत पिचड साहेबांनी पवार साहेबांना धोका दिला. अशा प्रकारचा जनआक्रोष समोर आला आणि बोल-बोल करता पिचड पर्वाचा राजकीय अस्त होऊन लहामटे पर्व नव्याने उदयाला आले. आता हे काही राष्ट्रवादी किंवा पवार प्रेमी आहे असे जर कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा दुधखुळेपणा म्हणावा लागेल. कारण, यांची हाफ चड्डीतील कट्टरता तालुक्याने पाहिली आहे. मनसे, शिवसेना, भाजप आणि मग राष्ट्रवादी असा हा प्रवास काही पक्षप्रेम म्हणून कधी पुढे आला नाही. तर, कट्टर पिचड विरोधक म्हणून त्यांची ख्याती झाली. म्हणून तर राष्ट्रवादीने डाव साधत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि वैभव पिचड यांना पराभव चारला. यात अशोकराव भांगरे यांच्या कुटुंबाचे पक्षाने पुर्वसन केले. मात्र, मधुकर तळपाडे, सतिश भांगरे, मारुती मेंगाळ यांच्यासह अनेकांना घड्याळाच्या काट्यासह फिरते ठेवले. या सगळ्या प्रक्रियेत डॉक्टरांचे सोने झाले आणि त्यांच्या हातातील कमळ गळून पडत घड्याळाशी त्यांची मैत्री झाली.
आता राष्ट्रवादीचे अकोल्याचे सगळं वैभव काढून ते डॉक्टरांच्या स्वाधिन केले. ही जबाबदारी ते मोठ्या शिताफिने पेलतील असे वाटले होते. मात्र, साध्या युवक अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदाच्या शुल्लक चर्चा थेट मंत्रालय आणि बारामतीला धडकू लागल्या. त्यामुळे, हा असंघटनाचा पहिलाच बॅड इम्पॅक्ट आमदारांचा पडला. उठसुट कोणीतरी दादांना फोन करणार, उठसुठ कोणतरी वरिष्ठांकडे तक्रारी करणार. हे सगळ्यांनाच खटकू लागले होते. इतकेच काय.! त्यांच्या एकलपणाच्या तक्रारी देखील मधल्या काळात फार गाजल्या. त्यामुळे, डॉक्टरांची प्रतिमा राज्यातील नेत्यांमध्ये त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी केली. हे जगजाहीर आहे. त्यामुळे, त्यांचे मंत्रीपदातून नाव गायब झाले, जिल्हा बॅंकेवर ते चर्चेत देखील आले नाही, राज्यातल्या एकीही कमिटीवर ते सभापती अध्यक्ष होऊ शकले नाही, ना त्यांना शिर्डीच्या संस्थानावर अध्यक्ष म्हणून घेण्यात आले. इकतेच काय.! आमदार निधी आणि अन्य शुल्लक कामे वगळता त्यांच्याकडून सर्वच काम प्रलंबित राहिले गेले. त्यात उपजिल्हा रुग्णालय, एमआयडीसी, रेल्वे, अॅक्सिजन प्लान्ट, म्हणजे तीच गुल आणि तीच काडी जनतेला उगळावी लागली आहे हे त्यांनी कितीही नाकारले तरी खरे नाही का? याचे आत्मचिंतन जनतेने केले पाहिजे. खरंतर रोखठोक सार्वभौमने डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असता त्यांनी काल थेट मंत्रालय गाठले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या दालनात जाऊन त्यांनी एमआयडीसी, अकोल्यातून रेल्वे, अॅक्सिजन प्लॉन्ट, उपजिल्हा रुग्णालय आणि तोलार खिंड हे प्रश्न कधी मार्गी लावणार ? असा सवाल केला. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की, या सर्व गोष्टींवर सकारात्मक चर्चा होणार आहे. तसेही पिचड साहेब देखील हीच उत्तरे देत आले आहेत. चर्चा झाली आहे, सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काम होणार आहे. त्यात नवीन काय ? असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.
आता काल कारखान्याबाबत डॉ. किरण लहामटे यांनी अजित दादा पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी असे मत मांडले की, आपण, पिचड यांचे विरोधक आहोत. सिताराम पाटील गायकर आणि त्यांचे संचालक मंडळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तरी देखील आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर गायकर आणि पिचड हे अगदी माडीला मांडी लावून पत्रकार परिषदा घेतात. त्यामुळे, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही आपली दिशाभूल आहे. हेच काल्यकर्त्यांना फार खटकते आहे. या सगळ्यांनी एकवटून पिचडांना विरोध केला पाहिजे असेच काहीसे मत त्यांनी व्यक्त केले. अर्थात डॉक्टर कट्टर पिचड विरोधी आहेत त्यामुळे त्यांच्या मनात तो भाव निर्माण होणे सहाजिक आहे. मात्र, या सगळ्या वातावरण निर्मित्तीला खतपाणी कोण घालते याचे देखील चिंतन गरजेचे आहे. अर्थात राष्ट्रवादीत डॉ. लहामेट यांना प्रांजळ मार्गदर्शक कमी आणि शकुनी मामा फार आहेत. त्यात डॉक्टरांचा स्वभाव तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे, त्यांनी संचालक मंडळासह पिचडांचा कडाडून प्रतिकार केला. आता ही त्यांची एक बाजू होती. त्यांनी दादांशी चर्चा केली व ते बाहेर आले. त्यानंतर बाहेर बसलेले संचालक मंडळ दादांच्या केबिनमध्ये जाते तेच डॉक्टर पुन्हा त्यांच्यासोबत आत गेले. संचालकांनी त्यांची बाजू मांडली की, दादा हा कारखाना बंद पडला तर तो पुन्हा उभा राहणार नाही. आम्ही जरी कारखान्यावर एकत्र असलो तरी पिचड साहेब हे कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांच्याकडे जे अधिकार आहेत ते कोणाकडे नाही. संपुर्ण सहकाराचे तुम्ही बाप आहात. सदोदित माहिती आपल्याला ज्ञात आहे. आज त्यांच्यावर अविश्वास आणावा असे काहींना वाटत असले तरी ते शक्य नाही. येथे प्रशासन नेमला गेला तर तो कारखान्याचे हित पाहु शकत नाही. कधी कधी चौकटीच्या बाहेर जाऊनही कामे करावी लागतात. त्यामुळे, हात बांधले जातात. कारखाना बंद पडू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे, झटपट आणि अविचारी निर्णय घेऊन जर आम्ही अबोल झालो किंवा त्यांना विरोध केला तर कारखाना बंद पडायला वेळ लागणार नाही. इतके दिवस सोबत काम केलय, आता संचालकांचा कार्यकाळ संपत आलाय, येणाऱ्या काही महिन्यात कारखान्याचे इलेक्शन लागेल. तेव्हा कोणाशी कसे लढायचे हे तेव्हा ठरवू. परंतु, आज कारखाना चालला पाहिजे. बंद पडला तर ते पातक आपल्यावर नको. म्हणून इलेक्शन लागत नाही. त्यापुर्वी वैर करुन किंवा आरोप करीत बाहेर पडून तालुक्याच्या भाग्यलक्ष्मीचे नुकसान का करावे ? ही भूमिका दादांना खरोखर प्रांजळ वाटली. सगळीकडे भावना आणि अवेशाने निर्णय घ्यायचे नसतात तर काही ठिकाणी बुद्धीची देखील जोड द्यावी लागते. याचे दर्शन दादांकडून घडले.
दरम्यान, संचालक मंडळाची शिष्टाई दादांनी मान्य करीत तिला ग्रीन सिग्नल दिला. आता यातून आणखी एक प्रतित होते की, जर दादांना किंवा नामदारांना हा कारखाना बंद पाडून विकत घ्यायचा असता तर त्यांनी आज कारखाना चालण्यासाठी जी सलोख्याची भुमिका घेतली ती कदापी घेतली नसती. त्यामुळे, तुम्ही कारखाना चालवा, जे काही कर्ज पाहिजे किंवा मदत पाहिजे ती मी मिळवून देईल. असे म्हणत दादांनी जिल्हा बॅंकेचे चेअरमन यांना फोन लावला आणि सर्व अडथळे दुर केले. अगस्ति चालावा यासाठी पिचडांना तुर्तास विरोध झालाच पाहिजे असे काही नाही. इतकी सामंजस्य भुमिका दादांनी घेतली. यातून खरंतर डॉ. किरण लहामटे यांनी धडा घेतला पाहिजे. की, प्रत्येकवेळी व्यक्तीद्वेष आणि कट्टर विरोधाचे राजकारण चालत नाही. दिर्घकाळ राजकारणाला फार संयमी भूमिका घ्याव्या लागतात. जेथे विकास खुंटतो तेथे विरोध थांबला पाहिजे. मात्र, यांचे असे की, विकास फिकास काही नाही, पिचड विरोध म्हणजेच विकास होय.! परंतु, जनता प्रत्येकवेळी २०१९ ची पुनरावत्ती करीत नाही. त्यामुळे, साहेबांनी प्रगल्भ विचार, योग्य मार्गदर्शक आणि संयम. या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जेव्हा हे सर्व शिष्ठमंडळ दादांच्या केबिनमधून बाहेर आले. तेव्हा डॉक्टरांनी एकाही व्यक्तीशी एक शब्दभरही चर्चा केली नाही. म्हणजे, हाच हेकेखोरपण त्यांच्या प्रगतीत आजवर अडथळा होऊन बसला आहे. असे अनेकांचे मत आहे. कारण, जर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, आज राष्ट्रवादीकडे असणारे संचालक मंडळ आणि जनता. यांची मोट जर कधी आमदारांनी बांधली. तर, त्यांना पुन्हा आमदारकी फार दूर, आत्ताच जो काही मंत्रीमंडळाचा विस्तार होईल त्यातच त्यांना मंत्रीपद मिळेल. त्यामुळे, त्यांनी काही गोष्टी लक्षात घेत प्रगल्भ विचारांचे रजकारण करणे अपेक्षित आहे. अन्यथा वरती हाच मेसेज जात राहिल की, जे तालुका संभाळू शकत नाही. ते राज्य संभाळू शकतील का.? होय.! ते संभाळू शकतील असे ठणकावून सांगणारे नेते देखील त्यांनी निर्माण करणे गरजेचे आहे.
भाग ३ : क्रमश: