दोन मुन्नाभाई डॉक्टरांना ठोकल्या बेड्या.! डिग्री नसताना द्यायचे गोळ्या अन टोचायचे इंजक्शन, गुन्हा दाखल.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे बोगस मुन्नाभाई डॉक्टर मिळून आले. वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री नसताना दवाखाना टाकुन नागरिकांचे उपचार करत होते. ही बाब प्रशासनाला कळाली त्यांनी घटनेची शहानिशा केली असता तेथे नागरीक उपचार सुरू असताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये एक्सपायर औषधे, ओपिडी आयपीडी रजिस्टर, दोन्ही ओपिडी प्रिस्क्रिप्शन पॅड, एक रुग्ण अॅडमिट आढळुन आले तर 17 प्रकारची विविध कंपनीचे औषधांचे बॉक्स मिळून आल्याने साक्षीदारांसमोर पंचनामा करून कारवाई केली. यात तालुका आरोग्य अधिकारी कामेश कृष्णाजी टावरे यांनी दिलेल्या फिर्यदिवरून शैलेश किसनराव कडलग (रा. निमगाव भोजापुर, ता. संगमनेर), प्रवीण गंगाधर कवडे (रा. निमगाव भोजापुर,ता. संगमनेर) या दोन डॉक्टरांवर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असुन संगमनेरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसुन वैद्यकीय शिक्षण नसताना ही बोगस डॉक्टर नाव लावुन तालुक्यात दवाखाने उघडत रुग्णांना उपचार करत आहेत. त्यामुळे, या बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असुन चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका वैद्यकीय अधिकारी कामेश टावरे हे बोगस डॉक्टर समितीचे सचिव आहेत. त्यांना शनिवार दि. 4 एप्रिल रोजी 11:30 वाजता गोपनीय महितीद्वारे समजले की, निमगाव भोजापुर येथे कुठलीही वैद्यकीय डिग्री नसताना बोगस मुन्नाभाई डॉक्टर शैलेश कडलग हा रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांनी साईलीला रिहॅबीलीटेशन सेंटर चालवुन लोकांवर औषध उपचार करत आहे ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांना समजली त्यांनी तात्काळ वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य अधिकारी कामेश टावरे हे शहानिशा करण्यासाठी निमगाव भोजापुर येथे घटनास्थळी गेले. तेथे साईलीला रिहॅबीलेटेशन सेंटरमध्ये हे मुन्नाभाई डॉक्टर आपला दवाखाना चालवत होते. तेथे डॉ. प्रवीण कवडे यांची ओपीडी व आयपीडी आढळून आली. ओपीडी मध्ये काही औषधे एक्सपायर असल्याचे निदर्शनास आले. तेथे ओपीडी आयपीडी रजिस्टर दोन्ही ओपिडी मध्ये प्रिस्क्रिप्शन पॅड मिळून आले. तेथे एक रुग्ण अॅडमिट असल्याचे आढळले. मात्र, तेथे हे मुन्नाभाई डॉक्टर देखील उपस्थित नव्हते. रुग्णाला अॅडमिट देखील नर्स करत असल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, कारवाई सुरू असताना तेथे डॉ. शैलेश कडलग आले. त्यावेळी तालुका वैदयकिय अधिकारी टावरे यांनी वैद्यकीय व्यवसायाची डिग्रीची विचारली तर मुन्नाभाई डॉ. कडलग यांनी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅकु पंचर ही डिग्री दाखवली. त्यांना दवाखान्यातील रुग्णांना उपचार कोण करते असे विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. तेथे रुग्णाला डॉक्टरांचे हाताखालील लोक हे वैद्यकीय उपचार करताना दिसुन आले. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी टावरे यांनी मुन्नाभाई डॉक्टर शैलेश कडलग यांना हे मेडिसिन तुमच्या ओपीडी मध्ये कुठून आले असता विचारले तेव्हा त्यांना उत्तर देता आले नाही. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी टावरे यांनी दोन पंचा समक्ष औषधांची पाहणी करून औषधे जप्त केली. मुन्नाभाई डॉ. शैलेश कडलग यांच्या घरी देखील पाहणी केली असता 17 कंपन्यांचे औषधांचे बॉक्स मिळुन आल्याने हे बोगस दवाखाना चालवत असल्याची खात्री झाली त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कामेश टावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश किसनराव कडलग (रा. निमगाव भोजापुर, ता. संगमनेर), प्रवीण गंगाधर कवडे (रा. निमगाव भोजापुर,ता. संगमनेर) या दोन बोगस डॉक्टरांवर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात बोगस डॉक्टर वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी न घेता तसेच कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता. बोगस डॉक्टरकीचे नाव लाऊन बेकायदेशीर पध्दतीने जनतेचे उपचार केल्याचे अनेक वेळेस संगमनेरात उघडकीस आले आहे. मात्र, यावेळी कळस गाठला आहे. कुठलीही डिग्री नसताना दुसऱ्या डॉक्टरची पदवी दवाखान्यात लावली आणि नर्स रुग्णांचा उपचार करत असुन अॅडमिट देखील करत असल्याचा प्रताप घडला आहे. खरंतर, संगमनेरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसुन वैद्यकीय शिक्षण नसताना ही बोगस डॉक्टर नाव लावुन तालुक्यात दवाखाने उघडत रुग्णांना उपचार करत आहेत. त्यामुळे, या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असुन चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच आशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, तक्रार आल्यानंतरच आरोग्य विभागाकडून कारवाईची पाऊले उचलली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
