अखेर दादांनी घेतले अगस्ति कारखान्याचे पालकत्व.! संचालकांचे राजिनामे नामंजूर.! कारखाना पुन्हा सुरु.!
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति कारखाण्याचा राजकीय बॉयलर मोठ्या आवेशाने पेटला होता. कारखाण्याचा कडेलोट होणार म्हणून अनेकांनी टिमकी वाजवत संचालक मंडळावर टिकेची झोड उठविली होती. त्यामुळे, या आरोप-प्रत्यारोपाला वैतागून सर्व संचालक मंडळाने तडकाफडकी राजिनामे दिले होते. त्यानंतर मात्र खरोखर कारखाना बंद पडतोय की काय.! असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर तालुक्यातील काही जाणकार व्यक्तींनी यावर मध्यस्ती करीत थेट मंत्रालय गाठले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा व राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कारखाण्याच्या कर्जाबाबत चर्चा केली. त्यावर दादांनी सांगितले की, सध्या राज्यातील सर्वच कारखाने अडचणीत आहे. त्यामुळे, काळजी करण्याची काही गरज नाही. मी आहे तोवर कारखाना बंद पडू देणार नाही. येणाऱ्या काळात देखील आपण कर्ज उपलब्ध करुन देऊ. कोणी-कोणावर आरोप प्रत्यारोप करु नका. सर्व काही सुरळीत होईल. तसेच ना. बाळासाहेब थोरात यांनी देखील अगस्तिच्या उन्नतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व संचालकांनी आपले राजिनामे मागे घेतले असून १९ संचालकांनी आपले राजिनामे मागे घेतले आहेत.
निवृत्त प्रशासक बी.जे.देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी अकोले तालुक्याच्या कामधेनुची अर्थिक परिस्थिती जनतेसमोर मांडली आणि बोलबोल करता जनतेत संभ्रमाचे वातावरण पसरले गेले. जे सुज्ञ होते त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या होत्या. मात्र, कष्टकरी मायबाप शेतकरी याबाबत अनभिज्ञ होता. आता कारखाण्याचे काय? उसाचे काय? भावाचे काय? अशा नाना प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी तो रोज पारावर येऊन बसत होता. आता पारावरच्या गप्पा तुम्हाला नव्याने सांगायला नको. त्यामुळे, ध चा म झाला आणि कोणी म्हणत होते की, बी.जे देशमुख चुकीचे तर कोणी म्हणे संचालक मंडळ चुकीचे. त्यामुळे, सगळा सावळा गोंधळ सुरु झाला होता. त्यावेळी रोखठोक सार्वभौमने एक सलोख्याचे वृत्तांकन केले आणि तालुक्यातील सुज्ञ व्यक्ती तसेच अजित दादा यावर योग्य निर्णय घेऊन उपाय काढू शकतात हे सर्वांसमोर मांडले. त्यानंतर, डॉ. किरण लहामटे, डॉ. अजित नवले, अशोकराव भांगरे, विनय सावंत, मारुती मेंगाळ यांनी मध्यस्ती केली आणि तडजोडीचा पहिली पायरी तालुक्यात उभी राहिली. त्यानंतर, सिताराम पाटील गायकर यांनी अजित दादा पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील शिष्ठमंडळ मुंबईत दाखल झाले आणि दादांनी त्यांना दिलासा दिला.
अगस्ति कारखाना चालवायला सर्वांनी सकारात्मक भुमिका घेतली आहे. कारखाना आता वेळेवर सुरु करु, बाहेरचे जे उस उत्पादक आहेत. त्यांना विश्वास देतो की, आपला उस आम्ही योग्य वेळेत आणू, कारखाण्याच्या कार्यक्षेत्रातील पुर्ण गाळप आपण करणार आहोत. तुम्हाला सांगायला आनंद होतो की, पुर्ण नगर जिल्ह्यात सर्वात जास्त आणि चांगली रिकवरी अगस्ति कारखाण्याची आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात अशीच प्रगती आपल्याला ठेवायची आहे. कारखान्याला सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आम्ही आभार मानतो.
- सिताराम पा. गायकर (व्हा. चेअरमन)