आता शंभर दिवस हाताची घडी, तोंडावर बोट.! कारखाना पुन्हा सुरू होणार.! आता राजकीय दंगल ऑक्टोबरमध्ये.!
सार्वभौम (अकोले) :-
तालुक्याची भाग्यलक्ष्मी म्हणून अगस्ति सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. मात्र, येथील प्रशासनाचा कारभार हा संदिग्ध असल्याचे आरोप बी.जे.देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी केले होते. यात किती तत्थ्य आहे हे चौकशीत पुढे येईलच. मात्र, हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर कारखान्यावर होणारी चिखलफेक ही येणार्या हंगामास बाधक असल्याचे पुढे येत होते. म्हणून रोखठोक सार्वभौमने काही सुज्ञ व्यक्तींना मध्येस्ती करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आ. डॉ. किरण लहामटे, डॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, पुरोगामी विचारधारेचे विनयजी सावंत, कामगार युनियन कर्मचारी अशा काही सुज्ञ व्यक्तींनी एकत्र येत सावंत साहेब व निवृत्त प्रशासक देशमुख यांना विनंती केली आणि हा तीन महिन्यासाठी यांनी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे, अकोले तालुका हा पुरोगामी चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो, त्याचे दर्शन आज पुन्हा येथे घडले आहे. कारण, कारखाना चालावा यासाठी यांची नम्रता ही त्याची साक्ष देऊन जाते.
अगस्ति साखर कारखाण्यावर 365 कोटी रुपयांचे कर्ज झाल्यानंतर एक सभासद म्हणून त्याचा ताळा मागितला असता संचालक मंडळ आणि सभासद यांच्यात घमासान आरोपयुद्ध सुरू झाले. मात्र, या सगळ्यात कारखाना बंद पडतो की काय.! हा हंगाम देखील निघतो की नाही.! यांना कर्ज मिळते की नाही, कारखान्याला लेबर मिळतील का असे नाना प्रश्न तालुक्यातील जनतेच्या मनात उभे राहिले. दुसरा हंगाम अगदी तोंडावर आल्याने या कारखान्याची चर्चा अगदी वार्यासारखी बाहेर भटकली आणि येथे कोणी लेबर यायला धजेनासे झाले. कारण, हा कारखाना पैसे देईल का? आपल्या कष्टाचे पैसे बुडणार तर नाही ना? त्यामुळे, बाहेर फार मोठा संभ्रम निर्माण झाला होता. यापलिकडे बँका देखील काही प्रमाणात निगेटीव्ह झाल्या होत्या. म्हणून सिताराम पाटील गायकर आणि कार्मचारी यांनी ही चर्चा येथे थांबवा, पुढचे पुढे पाहता येईल. तुर्तास हंगाम निघून जाणे गरजेचे आहे अशी विनंती केली होती. मात्र, दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप आणि पत्रकार परिषदा रंगू लागल्या आणि कारखान्याचा नको तसा बोभाटा दुनियाभर गेला.
आता दुसरा गळीप हंगाम हा तोंडावर असताना या वादात जर कारखाना अडकला तर तो खरोखर बंद पडेल यात तिळमात्र शंका नाही. आता शेजारी भाऊसाहेब थोरात कारखाना आहे त्यांच्यावर 420.40 कोटी कर्ज, प्रवरानगर लोणी यांच्यावर 340.81 कोटी कर्ज, ज्ञानेश्वर कारखान्यावर 482.67 कोटी कर्ज तर मुळा कारखान्यावर 403.53 कोटींचे कर्ज म्हणजे हे निव्वळ जिल्हा बँकेचे आहे. अन्य कर्जाची यात गोळाबेरीज देखील काही. यात अगस्ति कारखान्याने 340.72 आणि अन्य असे 365 कोटी कर्ज आहे. म्हणजे, तुलनात्मक कारखाना बुडेल वैगरे याची भिती सभासदांनी बाळगू नये. फक्त हा व्यावहार जनतेने समजून घेतला पाहिजे. वास्तवत: बी.जे.देशमुख हे एकदाही म्हटले नाही की, अगस्ति कारखान्यात घोटाळा झाला आहे, त्यात अपहार तथा गैरव्यवहार झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे जे कर्ज झाले, त्याचा विनियोग कसा केला ते सांगावे आणि कारखाना पुढे कसा चालविणार याची उत्तरे द्यावीत. या पलिकडे त्यांनी ज्या काही चौकशा लावल्या आहेत. त्या ऑडिटमध्ये सर्व प्रकार जनतेसमोर येईलच.
एकंदर, कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर रोखठोक सार्वभौम आपल्यासमोर अगदी डोळ्यात अंजन घालणारी माहिती सामोर मांडणार आहे. मात्र, कारखाना वाचला पाहिजे, येथील शेतकरी जगला पाहिजे, हजारो कर्मचार्यांच्या संसार उघड्यावर येऊ नये यासाठी एका समन्वय समितीने पुढाकार घ्यावा असे आवाहन रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून करण्यात आले होते. भलेही आमच्या भावनांना शंभर टक्के यश आले नाही. मात्र, कारखान्याच्या वादावर पडदा टाकण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून प्रयत्न केला आहे. ज्यांनी एक पाऊल मागे घेतले त्यांचे जनतेने आभार व्यक्त केले आहे. विशेषत: डॉ. किरण लहामटे, डॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, विनयजी सावंत, मारुती मेंगाळ, कारखाना कर्मचारी युनियन यांचे आभार मानले पाहिजे. तर यापलिकडे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व बी.जे.देशमुख यांचेही आभार मानले पाहिजे. कारण, कारखाना चालावा, तो टिकावा हीच प्रत्येकाची आपेक्षा आहे. तर, रोखठोक सार्वभौमच्या वृत्तानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा तसेच राज्याच्या नेत्यांनी कारखाण्याची परिस्थिती जाणून घेतली. तर, जिल्हाकार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी देखील अकोल्यात धावती भेट घेत काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर काही ठराविक व्यक्तींशी त्यांनी कारखान्याबाबत चर्चा केली आणि ते पुढे गेले.
साहेब, घ्या बुवा समजून.!
आम्ही देशमुख यांना भेटलो. कारखाना सध्या चालु करण्याची परिस्थिती आहे हे समजून सांगितले. सध्या 15 दिवसांच्या आत लेबर पेमेंन्ट, डिपॉझिट वैगरे नाही दिले तर आपल्याला लेबर मिळणार नाही. त्यामुळे, कारखाना चालु होऊ शकणार नाही. या बातम्यांमुळे लेबर अगस्तिला वगळून दुसरीकडे करार करीत आहेत. तुमचे जे मुद्दे आहेत ते कारखान्याचे इलेक्शन लागले की मग मांडा, जर हे वातावरण असेच राहिले तर लेबर मिळणार नाही अशी त्यांना विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. तर दुसरीकडे संचालक मंडळाने जे राजिनामे देऊन काम बंद केले आहे. त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करत आहोत. काही झालं तरी कारखाना बंद पडू नये हीच आमची इच्छा आहे. कारण, संचालक नसतील तर येथे प्रशासक बसेल आणि त्याला कारखाना चालविणे शक्य होणार नाही, परिनामी तो बंद पडेल. आणि एकदा की कारखाना बंद पडला. तर तो शंभर टक्के परत चालु होणार नाही.
- शिवाजी नेहे (का.यु. अध्यक्ष)
संघर्ष कटुतेत परावर्तीत होऊ नये
राजकारण आणि समाजकारण यात कट्टरता आवश्यक असते. मात्र, या कट्टरतेचे रुपांतर कटुतेत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ती हळुहळू होऊ लागली होती. त्यामुळे, आम्ही भष्टाचार आणि गैरव्यावहार होऊ नये यासाठी नक्कीच प्रयत्न करु. मात्र, वेळेनुरूप जर तालुक्याचे नुकसान होणार असेल तर कोठे थांबायचे, हे आम्हाला माहित आहे. आपल्या तालुका हा पुरोगामी विचारांचा असून येथील मातीत मॅच्युरीटी आहे. मुल्य, कटुता, संघर्ष हे ज्या-त्या जागी ठेवता आले पाहिजे. आम्ही उपस्थित केलेले मुद्दे चुक आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, त्यातून एक संघर्ष उभा राहत होता आणि तो कटुतेत परावर्तीत होऊ नये म्हणून आम्ही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती. आज कारखाना सुरू होण्यास आम्ही सहकार्य केले आहे. ज्यांनी एक पाऊल मागे घेतले त्यांचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.
- डॉ. अजित नवले (मार्क्सवादी)
तर आम्हाला शिक्षा द्या.!
अगस्ति कारखाना बंद पाडावा असा आमचा हेतू नव्हता ना राहिल. फक्त कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. हे सांगण्याचे काम आम्ही करीत होतो. गेल्या 5 वर्षात कर्जाचे प्रमाण वाढते होते. त्यामुळे, त्यात सुधारणा व्हावी हीच माझी इच्छा होती. संचालक मंडळाने जी काही आकडेवारी दिली ती मी सांगितल्यापेक्षा अधिकची आहे. मग, मी बदनामी केली असे कसे म्हणता येईल? वास्तव सांगणे ही काही बदनामी होत नाही. मात्र, माझ्या मांडणीचा विपर्यास केला गेला. आम्ही कोठे चूक वागलो असेल किंवा कोणाला काही कर्ज न देण्याबाबत सांगितले असेल तर ते सिद्ध करुन द्यावं, तुम्ही म्हणाल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत. यांचे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती झाली आहे. आता आम्ही ठरविले आहे. येणारे तीन महिने कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. कारखाना जसा चालवायचा तसा चालवा. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा.!
- बी.जे. देशमुख (निवृत्त प्रशासक)
कारखाना चालला पाहिजे.!
अगस्ति कारखाना ही आपल्या तालुक्याची धनलक्ष्मी आहे. तेथे कोणाचा हकूमशाही चालु देणार नाही. सघ्या हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे, त्यात काही अडचण येऊ नये म्हणून संचालक मंडळावर जे काही आरोप आहे. त्यावर तुर्तास तरी भाष्य करणे योग्य नाही. कारखाना हा आपल्याला बंद पडू द्यायचा नाही. याचा अर्थ तो कोणी गिळावा असेही नाही. बी. जे. देशमुख आणि अन्य व्यक्ती माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी मला तेथे जो कारभार चालतो तो सांगितला. आता जर समोरच्यांना देखील समीप घडवायचा असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे, त्यांचे म्हणणे मांडावे. त्यावर आपल्याला तोडगा काढता येईल. मी माझ्या परिने जी काही मदत पाहिजे ती देण्याचा प्रयत्न करेल. आरोप प्रत्यारोप करताना सावंत साहेबांसारख्या व्यक्तीला तालुक्यासाठी काय केले हे विचारले जाते हे दुर्दैव आहे. आम्ही ४० वर्षाचा इतिहास विचारला तर तो कोणी आम्हाला दिला नाही. त्यामुळे, आता कारखाना हे राजकारण नाही. म्हणून कोणावर आरोप करण्यापेक्षा तीन महिने त्याकडे कोणी बोट करणार नाही. वाटलं तर आमची गरज घ्या. अन्यथा तुमच्या परिने हा हंगाम काढा.
- डॉ. किरण लहामटे (विधानसभा सदस्य)