अगस्ति कारखाण्याचे वाटोळे होण्यापेक्षा तुम्ही चालवून दाखवा.! बी.जे देशमुखांची ही तरफड का? तडकाफडकी खुलासा.!

   

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                           अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर संपतो कोठे नाहीतर लगेच कारखाण्याच्या राजकारणाचा बॉयलर पेटल्याचे पहायला मिळाले आहे. या राजकारणापायी तालुक्याने उत्तम प्रशासक (एमडी) गमविले आहे. तर आता बी.जे देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे संचालक मंडळ पुरते वैतागले आहे. या सगळ्या राजकीय वर्दळीत कर्मचारी आणि शेतकर्‍यांचे सन 10 जून 2002 प्रमाणे हाल व्हायला नको हीच मापक अपेक्षा आहे. कारण, पिचड साहेब खोटे, गायकर साहेब खोटे, एमडी साहेब खोटे मग खरं कोण आहे? सगळे खोटे असतील तर कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा? जर तुम्ही दोघे मिळून त्यावर पर्याय सांगत असाल तर तो सांगितला पाहिजे, ते न करता आरोपांचा भडीमारच सुरू आहे. किंवा तुम्ही तरी तो चालवायला घेतला पाहिजे अशा प्रकारच्या चर्चा तालुक्यात उमटू लागल्या आहेत. सहकारात असा कारखाना नाही, ज्यावर कर्ज नाही. मग जर आता खुद्द शरदचंद्र पवार साहेब आणि अजित दादांनी कारखाना ताब्यात घेऊन तो चालविण्याची हमी घेतली आहे तर इतका विरोध का? की येणारे राजकारण डोळ्यासमोर ठेऊन यावर सरबत्ती सुरू आहे? अशी टिका होऊ लागली आहे. या सर्व घडामोडींवर कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळ दि. १४ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. 

सन 4 डिसेंबर 1989 साली अगस्ति सहकारी साखर कारखाण्याचा परवाना मंजूर झाला. तेव्हा राज्याच्या राजकारणात अकोले तालुक्याचा फार मोठा प्रभाव होता. दादासाहेब रुपवते, यशवंत भांगरे, मधुकार पिचड, भाऊसाहेब हांडे यांच्यासह अन्य लोकांची राज्यात चलती होती. कालांतराने ही सर्व सत्ता एककेंद्री झाली आणि येथे पिचड पर्व सुरू झाले. कारखाना स्थापनेपासून तर अगदी 2002 पर्यत साहेबांनी स्वत:चे अस्थित्व नेहमी सिद्ध केले. मात्र, दरम्यानच्या काळात तालुक्यात सुकाणू समिती स्थापन झाली आणि विरोधाचा अंकूर येथे उभा राहिला. त्यावेळी, दशरथ सावंत, मधुभाऊ नवले, अशोकराव भांगरे, अ‍ॅड. शांताराम वाळुंज, प्रकाश मालुंजकर, शिवाजी धुमाळ यांच्यासह अनेकांनी पिचड साहेबांना नेहमी शह देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांच्या चळवळीला यश आले. मात्र, संघर्ष कमी पडला असे म्हणावे लागेल. कारण, त्यांना कारखाण्यात यश आले नाही.

नंतरच्या काळात सन 2002 च्या निवडणुकीत हेच नेते पिचडांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आणि ती लढाई मात्र अटातटीची झाली. तेव्हा दोन निकाल पिचड साहेबांच्या विरोधात असल्यामुळे, ते राखून ठेवण्यात आले अशी माहिती बाहेर पसरली आणि अचानक कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. जे नेते कारखाण्याच्या खुर्चीसाठी भांडत होते, त्यांना अगदी खुर्च्या उलट्या करुन डोक्यावर घेऊन उभे राहण्याची वेळी आली होती. इतकी दगडफेक आणि गोळीबार झाला होता. दुर्दैवाने यात व्ही. बी. नवले, चंद्रकांत कानवडे यांना अधू व्हावे लागले होते. तर, सतिष तिकांडे यांना आपला जीव मगवावा लागला होता. या पलिकडे यात 40 जण जखमी आणि 4 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची सरकार दरबारी नोंद आहे.

आता मुळ प्रश्न येथे उभा राहतो. तो असा की, 2002 मध्ये सुकाणू समिती आणि पिचड गट या दोन्ही गटाचे 11-11 सदस्य निवडून आले होते. अखेर पिचड साहेबांनी सलोख्याची भमिका घेत माघार घेतली आणि सुकाणू समितीच चेअरमन प्रकाश मालुंजकर व व्हाईस चेअरमन गुलाबराव शेवाळे यांना करण्यात आले. सुदैवाने यांनी पहिला हंगाम अगदी यशस्विरित्या पार पाडला. मात्र, त्यानंतर पिचड साहेबांच्या राजकीय गणितात हे वारंवार नापास होऊ लागले. तेव्हा साहेब हे राज्यात मंत्री होते. त्यांचा राज्यात प्रचंड दबदबा होता, त्यामुळे विरोधकांना कर्ज उपलब्ध करून देतील ते साहेब कुठले? मात्र, तरी देखील या सुकाणू समितीने मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यात महत्वाचा मुद्दा अधोरेखीत करावासा वाटतो की, जेव्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात होता तेव्हा बँका कर्ज देत नव्हत्या. त्यावेळी खुद्द शरद पवार साहेबांनी बँक अधिकार्‍यांना आदेश दिले होते की, कारखाना माझ्या समर्थकांकडे असो वा विरोधकांकडे त्यांना कर्ज देण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करु नका. त्यानंतर पाच कोटी रुपयांचे कर्ज अगस्ति कारखाण्याला मिळाले होते.

आता कारखाना तेथे कर्ज आलेच. ही काळ्या दगडावरील रेघ आहे. मात्र, कर्ज मिळून देखील सुकाणू समिती कारखाना चालविण्यास अपयशी ठरली. पहिला हंगाम यशस्वी काढला मात्र, दुसर्‍या हंगामात कारखाण्याचा हागामा झाला. त्यावेळी असे बोलले जाते की, साहेबांनी कारखाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आपल्या बाजुने उभे केले. त्यानंतर काही कारणास्तव कर्मचार्‍यांचा वारंवार असहकार, अधिकार्‍यांचे असहकार्य अशा अनेक गोष्टींना कारखाना अडचणीत येऊ लागला. समितीत असणार्‍या अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, झोपेचे सोंग आणलेल्या कर्मचार्‍यांना कोणी जागे करु शकत नव्हते. परिणामी अचानक हतबल होऊन प्रकाश मालुंजकर आणि शेवाळे यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला. इतकी हतबलता कारखाण्याच्या राजकारणात पुन्हा कधी निर्माण झाली नाही. अखेर कारखाना दोन वर्षे बंद पडला. असे राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले. यात शेतकर्‍यांचे आणि कर्मचारी यांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी पुन्हा पिचड साहेबांनी 2005 साली 11-11 असे सभासद होऊन संगनमताने सर्वपक्षीय सत्ता कारखाण्यात उभी राहिली.

आता हा इतिहास मांडण्याचे कारण काय? तर, सन 2002 ची पुनरावृत्ती तालुक्यात होऊ नये हीच अपेक्षा अनेकांची आहे. कारण, पिचड साहेब किंवा गायकर साहेब वगळता कारखाण्याला कोणी चालवू शकत नाही. आता पिचड साहेब सत्तेबाहेर असल्यामुळे, त्याच्या ताब्यात कारखाना राहिला तरी त्याची परिस्थिती अधिक घाट्यात जाऊ शकते. मात्र, सिताराम पाटील गायकर साहेब हे शरदचंद्र पवार साहेब यांच्या कुटुंबाशी संलग्न आहेत. त्यांना सहकाराचा अनुभव आहे. पिचड साहेबांमुळे त्यांना जे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते त्यावर गदा येत होती. त्यामुळे, आमदार डॉ. किरण लहामटे साहेब यांना सहकाराचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्या सहकार्याने गायकर साहेबांचे पारडे पाहता तेच तालुक्याच्या धनलक्ष्मीला तारु शकतील असे राष्ट्रवादीतील अनेकांचे मत आहे. मात्र, त्याला खोडा घालण्याचे काम वारंवर होऊ लागल्यामुळे, तालुक्यात काहीसे असंतोषाचे वातावरण होऊ लागले आहे.

वास्तव पाहता बी. जे. देशमुख सर आणि सावंत साहेब यांनी कारखाण्याच्या मर्मावर बोट ठेवले आहेत. मात्र, वारंवर त्याच-त्याच गोष्टींना डिवचणे व त्यावर उपाय न सांगता केवळ खोडा घालण्याच्या पद्धतीला सगळेच वैतागले आहेत. त्यांनी कारखाण्याकडे जी काही माहिती मागविली होती. ती कारखाण्याने दिली आहे. त्यांना कारखाण्याच्या व्यावहारात दोष वाटला म्हणून त्यांनी वरिष्ठ पातळीवर अपिल देखील केले आहे. मग जर त्याची चौकशी सुरू असताना देखील वारंवर तीच गुल आणि तीच काडी करुन यांना काय साध्य करायचे आहे? जर संचालक मंडळ किंवा प्रशासन दोेषी असेल तर ते चौकशीत सिद्ध होईल आणि जी काय शिक्षा व्हायची ती कायदेशीर होईल. मग हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना यांना वारंवार तेच-तेच तुनतुनं का वाजवावं? असा प्रश्न संचालक मंडळाने उपस्थित केला आहे. जर यांना कारखाना चालवायचा असेल तर यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे. यांच्या विरोधात कोणी अर्ज देखील भरणार नाही. त्यांनी कारखाना कसा चालविणार किंवा काय करणार हे तरी स्पष्ट केले पाहिजे. केवळ माध्यमांच्या समोर यायचे आणि आरोप प्रत्यारोप करुन वातावरण दुषित करायचे हे योग्य नाही. असे मत सुज्ञ व्यक्तींनी मांडले आहे.

खरंतर, 2002 मध्ये मातब्बर नेते असताना कारखाना बंद पडला, आता बी. जे. देशमुख आणि सावंत साहेब यांना काय अपेक्षित आहे? हे तरी त्यांनी सांगितले पाहिजे. यांच्या मागे नेमकी कोण आहे? त्यांचा उद्देश काय आहे? भलेभले कारखाना चालविताना गुडघे टेकतात तर नेते म्हणून वावरणारे एकत्र आले तरी ते काय कारखाना चालविणार आहेत? त्यामुळे, कारखाण्याचे व शेतकरी यांचे हित चिंतताना त्याचे पुन्हा वाटोळे होणार नाही. याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आता प्रश्न नको तर उत्तर काय? हे शोधले पाहिजे. पवार साहेब जर कारखाण्याचे पालकत्व घेत असेल तर प्रत्येकाने योग्यवेळी समजून घेतले पाहिजे अशा प्रतिक्रिया जाणकारांकडून येऊ लागल्या आहेत.