सार्वभौम (राजूर) :-
सुनिल पदमेरे याने आजीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने फस्त करण्यासाठी निर्दयीपणे आपल्या आजीच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असता तिच्या कानातील कर्णफुले व डोरले बोचकडून तो घेऊन गेला. यात शांताबाई गोविंद पदमेरे ही महिला जागीच ठार झाली होती. त्या दिवशी सुनिलने तिथून पळ काढून तो स्वत:च्या बचावासाठी डोंगरा-डोंगराने फिरत-फिरत तो माणिक ओझर येथे दुपारी दिड दोन वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्राकडे आला होता. मित्राकडे येऊन, तो म्हणाला मला दोनशे रुपये उसने पाहिजे आहेत, त्यासाठी माझा मोबाईल तुझ्याकडे ठेव व मला तुझे कपडे देखील दे. कारण, माझे कपडे खराब झाले आहेत. दोनशे रुपये घेऊन मला मुंबईला जायचे आहे असे सांगून तो तिथून निघून गेला. आरोपी सुनील ने पुन्हा पेंडशेत येथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या कुकर्मामुळे सगळीकडे एकच बोंब पेटली होती. गावात लोकांची गर्दी जाणवत होती. त्यामुळे पेंडशेत येथे त्याला जाता आले नाही. म्हणून आरोपी सुनील पुन्हा डोंगरा-डोंगराने जायला निघाला परंतु त्यास पोलिसाची चाहुल लागली. कारण, राजूर पोलिसांना देखील त्याचा संशय आला होता की, सुनील हा त्याच्या पाहुण्यांकडे टाकेद येथे बांबळेवाडीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे, पोलिसांनी तो पोहचण्यापुर्वीच तेथे धडक मारली होती. आरोपी हा आरोपी असतो, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तरी त्याला गुन्ह्यातून सुटका नाही. त्यामुळे, जवळचा जरी असला तरी इकडे तिकडे पळून पैसा खर्च होऊन उगच भटकणे हे योग्य होणार नाही. त्यामुळे, कायदेशीर मार्गाने नंतर त्याला जामीन मिळू शकेल. आयुष्यभर भटकंती करण्यापेक्षा पोलिसांना शरण आलेले कधीही योग्य आहे अशी प्रकारची कल्पना दिली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांना आरोपी सुनील याच्या पाहुण्यांचा फोन आला. की, सुनील हा टाकेद येथे आलेला आहे. असे राजूर पोलिसांना कळताच त्यांनी तेथे जाऊन आरोपी सुनील याला ताब्यात घेतले. खरंतर, कायदा आणि पोलिसांवर विश्वास ठेऊन त्याला पाहुण्यांनी पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यांनी जे काम केले त्यासाठी फार मोठे मन लागते. कारण, आरोप असला तरी तो सिद्ध होतोच असे नाही, तोवर त्याला गुन्हेगार म्हणता येत नाही. त्यामुळे, घडल्या प्रसंगाला सामोरे जाणे हे फार महत्वाचे असते. सुनिल हा मद्यपी होता. त्याच्यावर यापुर्वी कोणतीही केस दाखल नाही. त्यामुळे तो सराईत नसला तरी त्याच्याकडून ने कृत्य झाले आहे ते अक्षम्य आहे. विशेष म्हणजे तो खून झालेल्या आजीचा नातेवाईक नसून फक्त जवळ गावात राहणारा आहे. राजूर पोलिसांच्या या कारवाईचे तालुक्यातून कौतूक होत आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार देविदास भडकवाड, प्रवीण थोरात, दिलीप डगळे, कैलास नेहे, अकोले पोलीस ठाण्याचे आनंद मैड, गणेश शिंदे, राकेश मुळाने, विजय मुंढे, विजय फटांगरे, होमगार्ड सोमनाथ उगले यांनी केली.
नेमकी काय घटना आहे.!
जवळच राहणार्या आजीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने फस्त करण्यासाठी एका निर्दयी व्यक्तीने तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असता तिच्या कानातील कर्नफुले व डोरले अगदी बोचकडून तो घेऊन गेला होता. हा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील पेंडशेत येथे मंगळवार दि. 15 रोजी पहाटेच्या सुमारास घडला होता. यात शांताबाई गोविंद पदमेरे (वय, 70, रा. पेंडशेत, ता. अकोले, जि. अहमदनगर) ही महिला जागीच ठार झाली होती. त्यामुळे फिर्यादी भारत गोविंद पदमेरे (रा. पेंडशेत, ता. अकोले) यांच्या फिर्यादीहून आरोपी सुनिल मंगळा पदमेरे (रा. पेंडशेत, ता. अकोले.) यांच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून तो पसार होता, पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेंडशेत येथे गोविंद पदमेरे हे शिक्षक रहात होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघांचे लग्न झाल्यामुळे ते विभक्त रहात असल्याने या दोघांचा वृद्ध संसार गुण्या-गोविंदाने सुरू होता. कालांतराने गोविंदराव यांना देवाज्ञा झाली आणि नंतर मात्र त्यांची पत्नी शांताबाई ही एकटी पडली. आपल्या पतीच्या पेन्शनवर त्या आपली गुजरान करीत होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच गावात परंतु अलिप्त रहात असल्यामुळे वयाच्या 70 व्या वर्षी जीवन जगताना त्यांची फार मोठी कसरत होत होती. त्यामुळे, एकटी महिला कोठे सुरक्षित राहते का? म्हणून तर या माऊलीच्या गळ्यात व कानात असलेल्या सोन्यावर सुनिल या निर्दयी मानसाचा डोळा गेला होता.
दरम्यान, सोमवार दि. 14 ते मंगळवार दि. 15 रोजी पहाटे या अंधार्या रात्रीत या आजी अखेरची निवांत झोप घेत होत्या. सुनिल या निर्दयी मानसाने तिच्या एकट्या पणाचा फायदा घेत हळुच आत प्रवेश केला. कोणत्याही प्रकारचा विचार न करता भलामोठा दगड त्याने आजीच्या डोक्यात टाकला होता. इतक्या मोठ्या रक्ताच्या थारोळ्यात ती पडलेली असताना देखील त्याने तिच्या गळ्यातील डोरले काढले. तर कानातील कर्नफुले अक्षरश: ओरबडून घेत कोणी पाहण्याच्या आत तो चालता झाला होता.
दरम्यान, दुसर्या दिवशी आजीचा आवाज येईना म्हणून कोणीतरी तेथे चौकशी केली होती. तर शांताबाई कायमच्या शांत होऊन पडल्या होत्या. आजुबाजूला रक्ताचे थारोळे पाहून काही व्यक्तींनी थेट राजूर पोलीस ठाण्याशी संपर्क केला होता. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पेंडशेत गाठले. गुन्ह्यातील काही महत्वाच्या गोष्टींची चौकशी करुन काही वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. सदर गुन्हा हा सुनिल मंगळा पदमेरे यानेच केला असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. जेव्हापासून हा प्रकार घडला आहे. तेव्हापासून सुनिल हा परागंदा झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते नंतर त्यास टाकेद येथून नरेंद्र साबळे यांनी अटक केली आहे.