अकोल्यात आज बैलपोळा साजरा.! आम्ही जातो आमच्या गावा साहेब आमुचा रामराम घ्यावा.! जड अंत:करणाने त्यांनी निरोप घेतला.
हिवाळ्याच्या सुरूवातीस फ्लेमिंगो आणि मोरशराठी हे पक्षी समुद्र किनारी पाणवठ्यावर येतात आणि पोटाची भूक भागवून हिवाळ्याच्या शेवटी हजारो किलोमिटर पुन्हा दक्षिण भारतात मार्गस्त होतात. आज तसेच चित्र अकोले तालुक्यात पहायला मिळाले. शेकडो किलोमिटर दुरहून उसतोड कामगार आपल्या पोटाची खळगी भरविण्यासाठी सप्टेंबर महिन्याण्याची थांडी अंगावर घेत आपले घरदार सोडून वेगवेगळ्या कारखाण्यांवर येतात आणि उन्हाळ्याच्या मे महिन्यात पुन्हा परतीचा प्रवास करतात. आज कारखाना बंद झाला आणि उसतोड कामगारांनी स्वत:साठी दिवाळी तर आपल्या सर्जा राजांसाठी बैलपोळा साजरा केल्याचे पहायला मिळाले. आज घरी जायचे म्हणून बैलांच्या पाठीवर घेरु टाकून शिंगांना हिंगोळ फासला होता. त्या पाचटांच्या झोपडीतून खमंग पुरण पोळीचा वास येत होता. तो आनंद इतका होता की, त्यापुढे अक्षरश: गगण ठेंगणे वाटत होते. त्यामुळे, खरोखर आज या उसतोड्या कामगारांकडे पाहून तालुक्याचे बहुजन नेते सिताराम पाटील गायकर यांच्या इतिहासाच्या आठवणी जाग्या झाल्या. कारण, जेव्हा मी त्यांच्या मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्याचे जिवण चरित्र रेखाटले होते. त्यात नकळत गायकर साहेबांच्या इतिहासाचे उत्खनन झाले आणि तेच चित्र आज डोळ्यासमोर अगदी चलचित्रासारखे तरळु लागले. म्हणून आज पुन्हा तालुक्यात बैलपोळा आणि दिवाळी साजरी झाल्याचे पहायला मिळाले. तर काही उसतोडी कामगारांचे आपल्या व्यथा सांगताना अक्षतश: डोळ्यातून आश्रृ घरंगळत खाली आले. हे क्षण अंत:करणाला छेदून गेले म्हणून ते शब्दरुपात आपल्यासामोर मांडून मी देखील व्यक्त होत आहे.
पोटाला लाज नसते माऊली, जग नावं ठेवण्यात दंग असतं पण दोन वेळची भाकरी कोणी देत नाही. त्यामुळे, उचलायचे बिर्हाड अन टाकायचे खांद्यावर, बायकोने मारलेल्या मुरक्याकडे दुर्लक्ष करुन फिरायचं जगाच्या पाठीवर. त्या उसतोड कामगाराचे हे वाक्य कानावर पडले आणि काळजात चर्र झाले. खरंच ते फ्लेमिंग पक्षी पोट भरण्यासाठी भारतात येतात आणि दुसर्यांच्या घरावर अतिक्रमण करुन स्वत: काही काळ वास्तव्य करतात, फक्त ते निसर्गप्रेम आणि पाहुणे म्हणून त्यांचा आदर सत्कार केला जातो. मग त्यांच्यात आणि या उसतोड कामगारांमध्ये फरक तरी काय? हे देखील पोटाचा पीळ कमी करण्यासाठी येतात आणि कोणाच्यातरी हाडकी हाडवळ्यात आपल्या कोप्या मांडून अतिक्रमण करतात, आपले काम झाले की माघारी जातात. फरक फक्त इतकाच की, लोक यांच्याकडे माणूस म्हणून पाहत नाही तर वैताग म्हणून पाहतात आणि हेटाळणी करतात. त्यामुळे, आज त्यांच्या जाण्यानं मला फार आनंद झाला आहे. कारण, ते आज स्वत:च्या घरी जाऊन दोन लेकरांना कुशीत धरुन पोटभर भाकरी खात शांततेची झोप घेणार आहेत. तो आनंद त्यांच्यासाठी सर्वोच्च असणार आहे या कल्पनेतच आपला आनंद आहे.
खरंतर 20 मार्च 2020 रोजी तालुक्याचे बहुजन नेते सिताराम पाटील गायकर यांच्या मातीश्री यांना देवाज्ञा झाली आणि तेव्हा मधुभाऊ नवले व कचरुपाटील शेटे यांनी मला त्यांच्या जिवणावर प्रकाश टाकणारी एक पुरवणी काढण्याचा अग्रह धरला. तेव्हा नकळत माझ्या मनावर उसतोड कामगारांचे आयुष्य कोरले गेले. म्हणून तेव्हापासून मला त्यांच्याप्रती प्रचंड आस्था वाटत होती. अगदी गेल्या आठवड्यात माझ्या गावच्या रस्त्यावर काराच्या पोटाला त्यांचा तांढा येऊन बसला होता. म्हणून मी मोठ्या कुतुहलाने त्यांच्या वस्तीवर गेलो. त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. इतकी प्रामाणिक आणि प्रंजळ मनाची मानसे होती की, एकीकडे फार केविलवाणे वाटले तर दुसरीकडे त्यांच्या संघर्षमय जिवणाचा हेवा देखील वाटला. नकळत गायकर साहेबांचे आयुष्य कसे घडले, शुन्यातून विश्व निर्मिती करण्याचा आभास मला झाला. काल लोकांच्या थळात जाणारा माणूस आज लोकं त्यांच्या शेतात थळ करु लागले आहेत. खरच ना.! वाटतो तितका सोपा नाही हा प्रवास. म्हणून उसतोडी करणार्या त्या मानसांनी त्यांची घरटी मोडून पुन्हा घराकडे मार्गक्रमन केले असले तरी माझ्या मानात त्यांनी नव्याने घर केले आहे.
काल मी साखर कारखाण्याहून काम आटपून घराकडे निघालो होतो. सुर्य गडात पडला होता. पशुपक्षी आपापल्या घरट्यांना जवळ करीत होते. सुर्यकिरण लंबरुप असल्यामुळे अगदी सोनेरी पहाट उजाडल्याप्रमाणे वातावरण दिसत होते. जेव्हा मी गाडीची काच खाली घेतली तेव्हा पुर्व दिशेला निळ्या रंगाच्या झोपड्यांचे साम्राज्य दिसले. रस्त्याच्या दुतर्फा जे कोणी बालबच्चे बगडत होते, त्यांच्या चेहर्यावर प्रचंड आनंदाच्या हलरी जाणवत होत्या. हा दिवस जणूकाय त्यांच्यासाठी एखादा सुवर्णक्षण घेऊन आला आहे की काय? मला काहीच कळेना, तालुका खड्डेमय असल्यामुळे गाडीला फार काही वेग नव्हता. त्यामुळे, प्रत्येक झोपडीत ओझरती नजर जात होती. त्या दिवशी माझ्या सोबत विकास, ईश्वर, आशिष आणि निखील असे आम्ही प्रवास करीत होतो. त्या वातावरणात प्रचंड काहीतरी दडलेले आहे याचा माझ्या मनाला स्पर्श झाला. म्हणून मी विकासरावांच्या खांद्याला हात लावला आणि म्हटलं गाडी थांबवा. त्यानी गाडीला ब्रेक मारला. मी एका व्यक्तीला मोठ्या कुतुहलाने विचारले. काय हो साहेब.! आज काही तुमच्यात विशेष आहे का? तो उत्तरला, हो.! काय विशेष हे विचारण्याच्या पुर्वीच मी पुढील प्रश्न केला. साहेब.! या बैलांंच्या खांद्याला घेरु का लावला आहे? त्यांची शिंगे हिंगोळाने का रंगविली आहे? काही नाही हो.! आज आम्ही आमच्या गावी जात आहोत. त्यामुळे, प्रचंड आनंद झाला आहे. हा दिवस आमच्या सर्जा राजाचा बैलपोळा असतो. त्यांनी मोठ्या दिलदार अंत:करणाने उत्तर दिले आणि आम्ही चालते झालो. तरी देखील माझ्या चेहर्यासमोर नाना प्रश्न आणि पुन्हा-पुन्हा गायकर साहेबांच्या अंध:कार आयुष्यात पडलेल्या प्रकाशाचे प्रतिबिंब पडत होते. थोडा पुढे आलो आणि ते विचार काही काळ विश्रांतीच्या गर्भात गुडूप झाले.
सायंकाळी मी घराकडे निघालो होतो. पुन्हा आमच्या काराच्या पोटाला जी वसाहत बसलेली होती, त्यांची आवरासावर दिसली. का हेच चित्र वारंवार माझ्या भावनांशी खेळतात हे मला कळेनासे झाले होते. एकदा मला शक्य ती मदत मी केली होती. कदाचित त्यामुळे माझी त्यांच्याशी नाळ जुळली असावी. मी त्या खडतर रस्त्याच्या कडेवर गाडी उभी करुन बाहेर डोकावलो. यांनी देखील बैलांना अगदी घासून पुसून आंघोळ घातली होती. त्यांच्या पाठीवर काहीतरी काळ्या अक्षराने लिहीले होते. काय ते मला लांबून दिसले नाही. मात्र, कष्टकर्या बैलाप्रती आपल्या भावना त्या उसतोड कामगारांनी व्यक्त केल्या होत्या हे त्रिवार सत्य आहे. मला फार वाईट वाटले होते. की, आता मला हे लोक रोज दिसणार नाहीत. त्या दिवशी मी त्यांच्यात जाऊन अगदी शुटिंग काढली होती. त्यांचा संसार, त्यांच जगणं, त्यांचे आयुष्य माझ्या मोबाईलच्या कॅमेर्यात जतन केले होते. आता ती जागा देखील पोरकी आणि बोडकी दिसणार होती. पण, या दु:खाच्या पलिकडे देखील त्यांचे आपल्याप्रमाणे जगणे आहे, ते त्यांनी जगले पाहिजे हे देखील मला वाटत होते. इतकेच काय? तर या देशात उसतोड कामगार ही संकल्पनाच नामशेष व्हावी, यांनी यांच्या मुलांना प्रचंड शिकवावे, मोठे करावे, व्यापार, व्यावसाय करायला शिकवावा किंवा गायकर साहेबांप्रमाणे नेतृत्वाचे गुण अंगिकारावे. परंतु पहाटेची थंडी चिरत सुर्यांच्या आधी उठून उसाच्या पात्यांचा आंगावर वार करुन घेण्याची कला मला अजिबात मान्य नव्हती. परंतु, मी करणार तरी काय? मी व्यवस्था बदलु शकत नाही, ना मी इतका सक्षम आहे की त्यांना उभे करु शकतो. त्यामुळे, माझ्याकडे त्यांच्या दु:खात सहभागी होण्यापलिकडे कोणताही पर्याय नाही. परंतु त्यांच्यातील प्रत्येकाने गायकर साहेब होत स्वयंप्रकाशित व्हावे असे वाटत होते.
आज डोळे मिटल्यानंतर रात्री स्वप्न असेच पडेल की, ते लोक त्यांच्या घरी गेले असतील, पोटभर जेवण करुन मित्रांशी गप्पा गोष्टी करतील, रोज खुल्या आभाळाखाली चांदण्यांच्या प्रकाश झोतात झोपणारे सगळे मायेच्या छताखाली निवांत पहुडलेले असतील. ती पहाट अशी असेल की, सुर्य ढगांच्या गर्भात असतानाच त्यांना जाग येईल. मात्र, आज आपण घरी आहोत, रोज अंगावर शहारा आणणारी थंडी नव्हे तर आज आजीच्या लुगड्याने शिवलेल्या गोधडीची उब त्यांना पुन्हा झोपी लावेल आणि ते निवांत उठलेले असतील. यातच माझे समाधान असेल. मात्र, काही झाले तरी उद्या त्याच मार्गाने जाताना तेथे झोपडी नसणार, त्यातून निघणारा धुर आणि लुकलुकणारे दिवे दिसणार नाही. ती जागा आयुष्यात कधी न भरो. त्यांच्या वाट्याला असे दिवस कधी न येवो. येवोत त्यांची लेकरं आपल्या तालुक्यात अधिकारी बनून अगदी लाल दिव्याच्या गाडीत, सुटा बुटात किंवा पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करुन गायकर साहेबांसारखी अढळ ध्रुवतारा म्हणून...बस इतकच.! आज मात्र मी नि:शब्द झालो.