कोरोनाच्या पाठोपाठ संगमनेरात म्युकर मायकोसिस रोग दाखल.! २ रुग्णांमधील एक दगावला.! सावधान.! तो डोळे काढून घेतो.!

 


सार्वभौम (संगमनेर) : - 

                     संगमनेरमध्ये कोरोनाने हैदोस घातला अनेकांचे परपंच उध्वस्त झाले. त्यामुळे कोरोनापुढे संगमनेरकरांनी हात टेकले नाही तेच आता म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्ण संगमनेरात आढळुन आले आहे. ह्या रुग्णांनी प्रथमतः कोरोनावर उपचार घेतला होता. त्यानंतर त्यांना डोळ्याला व नाकाला त्रास होत असल्याने त्यांनी म्युकर मायकोसिसची प्रथम चाचणी केली. त्यामध्ये त्यांना म्युकर मायकोसिसचे लक्षणे असल्याचे उघड झाले आहे. यातील एक रुग्ण पुणे येथे उपचार घेत आहे.  तर  दुसरा नाशिक येथील खाजगी रुग्णल्यालयांमध्ये उपचार घेत असतान मयत झाला आहे. यामध्ये तालुक्यातील नामांकित पदाधिकार्याचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर नाशिकला जी व्यक्ती नेली होती, त्यांचा उपचारादरम्यान मत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिस या आजाराचे उपचार संगमनेरमध्ये कोणी करत नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. तेथे लाखो रुपयांचे डिपॉजीत भरल्याशिवाय रुग्णाला पुढील उपचार देखील करत नाही. मात्र, हा आजार राज्यशासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसवला आहे. त्यामुळे रुग्णाला मोफत उपचार भेटायला हवे. पण इथे लाखो रुपये मोजल्याशिवाय पायरी देखील चढू दिली जात नाही. या योजनेचा लाभ संगमनेरच्या प्रशासनाने रुग्णाला मिळुन देयला हवा परंतु, संगमनेरचे प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहेत. फक्त दिवस काढुपणा करत असल्याची टिका त्यांच्यावर होत आहे. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी फोन केला तर उडाउडीचे उत्तर देतात. फोन केला तर उचलत नाही. मेसेज टाकला तर रिप्लाय देत नाही. त्यामुळे, संगमनेरचे नागरिक मानसिक, आर्थिक दृष्ट्या होरपळुन निघाले आहेत. आज संगमनेरमध्ये  449 कोरोनाबाधीत रुग्ण आढळुन आले आहे. तर मागील 14 दिवसात तब्बल 4 हजार 32 रुग्ण आढळुन आले आहे. तर आजपर्यंत शहरासह तालुक्यामध्ये 19 हजार 207 रुग्ण आढळुन आले आहेत.

               दरम्यान, संगमनेरमध्ये कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिस हा आजार संगमनेरकरांच्या मानगुटीवर येऊन बसला आहे. येथे कोरोना थांबायला तयार नाही तेच म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्ण आढळुन येऊ लागले आहेत. त्यामुळे, संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात  म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळुन आला आहे. त्याला उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले होते.  मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस आजाराची लागण झालेला व्यक्ती तालुक्यातील अत्यंत सर्वसामान्य घरातील असतील तर त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्यास ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या भरवशावर बसतात. मात्र, त्यांना या उपचारासाठी मोठी रक्कम भरायला सांगत आहे. एकीकडे राज्यसरकार सांगते महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार आहे. तर दुसरीकडे प्रशासनच याबाबत अनभिज्ञ आहे. आता या विस्कळीत व्यवस्थेला जबाबदार कोण? पैशाअभावी उपचार भेटत नसेल तर आज एकाच झाला उद्या  कित्तेक सामन्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.

             दरम्यान, महाविकास आघाडीचे दुवा ना. बाळासाहेब थोरात आहे. राज्यशासनाची कुठलीही योजना असली तर ते सोशीलमीडियावर गवगवा करत असतात. पण, आता त्यांच्या मतदारसंघातील जनतेला म्युकरमायकोसिस या आजाराचा मोफत उपचार भेटत नसेल तर यापेक्षा दुर्दैव काही नसेल. एकीकडे राज्यशासन निर्णय घेते दुसरीकडे लाखो रुपयांची लुट होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडुन सामान्य माणसाच्या पदरात निराशाच आलेली आहे.

             दरम्यान, कोरोनाची पहिली लाट संगमनेरला धडकली आणि प्रशासनाने संगमनेर कडकडीत बंद केले. तत्कालीन जिल्ह्याअधिकारी राहुल द्विदेवी यांनी देखील संगमनेर बाबत कडक पाऊले उचलली होती. पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत यांनी देखील माथेफिरूनवर कारवाईचा धडाका धरला होता. तर साहय्यक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी यांनी देखील एकाच महिन्यात 20 लाखांचा दंड केला होता. त्यामुळे, संगमनेर कडकडीत बंद होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. प्रशासनाचा जनतेवर धाक दिसत होता. येवढेच काय! प्रांतअधिकारी देखील दांडा घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे, कोरोनाच्या पहिल्या लाटेतून संगमनेरकरांना प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे दिलासा मिळाला. मात्र, आता संगमनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे प्रमाणही वाढले. एकाच महिन्यात सहा हजारांचा आकडा ही गाठला. पोलिसांवर ही हल्ला झाला. रस्त्यावरील रहदारी ही वाढली. लॉकडाऊन निव्वळ नावाला आहे. सोशल डिस्टनसिंगचा जागोजागी फज्जा उडाला आहे. त्यामुळे, संगमनेर प्रशासनाचा धाक जनतेवर राहिलेला दिसत नाही. फक्त आलेला आदेश कागद रंगवण्यातच जात आहे अशा आरोपाला प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे.


म्युकोर मायकोसिस म्हणजे काय?

म्युकोर मायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन शरीरात वेगाने पसरते. त्याला ब्लॅक फंग्सही म्हणतात. मेंदू, फुफ्फुस आणि त्वचेवर याचं इन्फेक्शन होतं. या आजारात डोळ्यांची दृष्टीही जाते. काही रुग्णांच्या नाकाची हड्डी ठिसूळ होते. वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

थेट मेंदूपर्यंत जाते...

म्युकर मायकोसिस म्हणजे हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. नाक व डोळ्याला याचे इन्फेक्शन होते आणि डोळे व नाकाच्या मार्गाने ते थेट मेंदूपर्यंत पोहोचते. यावर वेळीच योग्य उपचार न झाल्यास या आजाराने मृत्यू देखील होऊ शकतो. इतके हे इन्फेक्शन्स धोकादायक आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या आजाराची माहिती पुढे आली होती. परंतु, कोविडच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांना आंधळे करुन सोडले आहे. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे यापासून वाचायचे असेल तर डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, 

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना डोळ्यांची समस्या निर्माण होते किंवा त्यांचे डोकंदुखू लागते.  त्याकडे चुकूनी दुर्लक्ष करु नका. कारण ते महागात पडू शकते. या त्रासामुळे म्युकोर मायकोसिस फंगलचं इन्फेक्शन होऊ शकते. सायन्समध्ये आधी त्रास होतो. नंतर दोन ते चार दिवसात हे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत जातं. त्यानंतर 24 तासात मेंदूपर्यंत जातं. अशा परिस्थितीत रुग्णाचे डोळे काढण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. तसे न केल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो,


कोणाला धोका आहे.!

ज्यांची इम्युनिटी अत्यंत कमजोर आहे. त्यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे या लोकांना अधिक सतर्क राहावे लागते. या लोकांना प्रचंड डोकेदुखी होते. डोळे लाल होतात, डोळेही प्रचंड दुखतात, डोळ्यांमधून पाणी येते, डोळ्यांची हालचाल कमी होते, अशी माहिती तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितली आहे.

म्युकर मायकॉसिस हा आजार पहिल्यांदा सुरत येथे लक्षात आला होता. तेथे ८ जणांचे डोळे काढण्याची वेळ आली होती. त्यानंतर तो महाराष्ट्रात देखील येऊन धडकला होता. महाराष्ट्रात आता त्याचे शेकडो रुग्ण आहेत. तर १० पेक्षा जास्त जणांनी आपले प्राण गमविले आहेत.  आज नाशिक १५० पेक्षाजास्त ३ मयत, पुणे २९, चंद्रपूर १८, नागपूर ४५, संगमनेर २ एक मयत असे काही जिल्ह्यांत आणि तालुक्यांमध्ये हे प्रमाण वाढते दिसून येत आहे. हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार करताना जास्त प्रमाणात स्टेराँईडची इंजेक्शन दिल्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे रुग्णाचे नाक ,डोळे दुखणे, नाक व तोंडाजवळ काळे ठिपके होणे, डोळे सुजणे,पापणी खाली पडणे,मोठ्या प्रमाणात डोके दुखणे, नाक व डोळ्या जवळ त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात.हा आजार शक्यतो अवयव प्रत्यारोपण, कोरोना, किडनी, मधुमेह उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये आढळतो .

काळजी घ्या.!

म्युकर मायकॉसिस हा रोग होऊ नये यासाठी पहिल्यांदा आपल्याला कोरोना होऊ नये.  यासाठी काळजी घेतली पाहिजे. मोघम उन्हातान्हात, गर्दीत फिरु नये, वारंवार हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ कोविड सेंटर गाठावे, कोणताही आजार अंगावर काढू नये. ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये.

अकोले अजुनही सुरक्षित

अकोल्यात आजवर जितके कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहे. त्यात अद्याप एकही रुग्ण म्युकर मायकोसिसचा नाही. किंवा कोणालाही लक्षणे दिसून आलेले नाहीत. येणाऱ्या काळात जे कोणी कोविडचे रुग्ण आहेत. त्यांनी स्वत:ची शुगर मेंन्टेन ठेवली पाहिजे, बीपी किंवा अन्य आजार असतील तर त्यावर वेळोवेळी उपचार घेतले पाहिजे. शक्यतो डोळ्यांना नाकाला हात न लावणे, त्यांना न चोळणे हे लक्षात ठेवले पाहिजे. कोविड बाधित रुग्णांनी तसेच बीपी शुगर वाल्यांनी सकाळीच उठून प्राणायम किंवा शक्यतो व्यायाम केला पाहिजे. आपली इम्युनिटी कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे, आपल्या शेजारी नाशिक, मुंबई आणि आता संगमनेरात रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे, आपल्या लोकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. म्युकर मायकोसिसला थांबविण्यासाठी पहिले कोरोनाला थांबविले तर पुढील समस्या उद्भवणार नाहीत. त्यामुळे, घरी रहा, सुरक्षित रहा, शासकिय नियमांचे पालन करा. ही लढाई आपल्या सहकार्याशिवाय जिंकणे अशक्य आहे. 

         डॉ. इंद्रजित गंभिरे (तालुका आरोग्य अधिकारी)

- सुशांत पावसे (प्रतिनिधी)