अरे बाप रे.! सीईओ अँन्टी करप्शनची धाड़.! 3 करोड 46 लाखांचा मुद्देमाल.! शिपायाच्या नावाखाली, अधिकारी रईस.!
- सागर शिंदे
सार्वभौम :-
घर दुरुस्तीची परवानगी मिळण्यासाठी भ्रष्ट सीईओ याने सर्वसामान्य व्यक्तीकडून तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितली, हा सर्व कारणामा या बहादराने आपल्या कार्यालयातील शिपायाच्या करवी केला. मात्र, मुंबईतील (अरे विभाग) लाचलुचपत विभागाने तो उधळून लावत दोघांनाही बेड्या ठेकल्या आहेत. जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा लाचखोर मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेव्हा त्याच्याकडून ३ करोड ४६ लाख १० हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज लाचखोर सीईओ नथु राठोड आणि त्याचा शिपाई अरविंद तिवारी या दोघांनाही बेड्या ठोकल्या असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका व्यक्तीचे मुंबईतील अरे कॉलनी, गोरेगाव पुर्व येथे घर आहे. हे घर मोडकळीस आले असून त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, त्याची परवानगी घेण्यासाठी हे तक्रारदार आरे दुग्ध वसाहत गोरेगाव पुर्व येथील नथु राठोड या अधिकाऱ्याकडे गेले होते. मात्र, या भ्रष्ट सीईओने स्वत: ५० हजारांची मागणी न करता आपल्या कार्यालयातील शिपाई अरविंद तिवारी याला पुढे करुन ५० हजार दिले तर तुमचे काम होईल असे सांगितले. आता घर दुरुस्ती करायची की यांच्या घशात इतकी मोठी रक्कम घालायची ? अशी द्विधा मनस्थितीत असताना तक्रारदार याने थेट मुंबईच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केला. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून लखमी गौतम हे निर्भिड अधिकारी असल्याची माहिती तक्रारदारास माहित असल्यामुळे त्याने पैसे देण्याऐवजी या भ्रष्ट यंत्रणेचा कुच्चामोड करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला. संबंधित डिमांड त्यांनी दि. 14 मे 2021 रोजी लाचलुचपत विभागाला कळविली असता त्यांनी तत्काळ त्याची खात्री केली.
दरम्यान, सीईओ नथु याने घर दुरुस्तीच्या मंजुरीसाठी शिपाई तिवारी यास भेटण्यास सांगितले होते. त्यामुळे, ही दोघे संगनमताने ही लाच घेत आहे. हे सिद्ध करणे लाचलुचपत विभागाला जिकरीचे होते. मात्र, तरी देखील लखीम गौतम साहेब यांच्या टिमने अगदी शातीर पद्धतीने हा सापळा रचला. तो यशस्वी करण्यासाठी तक्रारदार यांना 19 मे 2021 रोजी नथु राठोड याच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर राठोड याने पैशाशिवाय कोणतेही सहकार्य न करता त्यांना पुन्हा शिपाई अरविंद तिवारी याच्याकडे पाठविले. तेथे देखील पैसा फेको तमाशा देखो हेच सांगण्यात आले असता या दोघांनाही लाच हवी आहे हे स्पष्ट झाले.
दरम्यान, तक्रारदार हे दि. 24 मे रोजी ५० हजार रुपये नथु राठोड यांच्या कार्यालयात गेले असता ते तिवारी यांना भेटले. तक्रारदार यांनी 50 हजार रुपये आणले आहेत. त्यामुळे ते घ्यायचे की नाही ? याची शास्वती करण्यासाठी तिवारी याने राठोड याच्याकडे विचारणा केली असता त्याच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर राठोड याच्या सहमतीने तक्रारदार याच्याकडून 50 हजार रुपये तिवारी याने रोख स्विकारले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते दोघे दोषी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना बेड्या ठेकल्या. यात शिपाई तिवारी याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे विशेष काही असंपदा मिळून आली नाही. मात्र, नथु राठोड याने घरात दडून ठेवलेले घबाड मात्र पोलिसांच्या हाती लागले आहे. याच्याकडे थोडे ना थिकडे ३ करोड ४६ लाख १० हजार रुपयांची अपसंपदा मिळून आली आहे. या कारवाईमुळे, मुंबईत चालणारा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर, एकीकडे गृहविभाग ते पोलिस अशा पद्धतीने होणाऱ्या शंभर कोटींच्या वसुली बाबत होणारा आरोप गाजत असताना दुसरीकडे लाचलुचपत विभागात कोणाच्याही दबावाला भिक न घालणारा अधिकारी लखमी गौतम यांच्या टिमने केलेली कारवाई मुंबईच नव्हे राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. एखाद्या सीईओ तथा उपायुक्तांकडे इतकी बेहिशोबी मालमत्ता सापडणे हा प्रकार महाराष्ट्रला लाजवेल असा आहे. ही सर्व रक्केम जनतेच्या कष्टाची कमाई असल्याचे बोलले जात असून याची लाचलुचपत प्रतिबंध विभाग कसून चौकशी करीत आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त अलका देशमुख, सतिश चिचकर, पोलीस निरिक्षक सुप्रिया नटे, गणेश कानडे, किशोर शेवते, विक्रम पवार या पथकाने अप्पर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली केली.