जुगार आड्ड्यावर छापे, पाच आरोपी, बाकी सोडून दिले. 15 लाखांचा मुद्देमाल.! अकोले-संगमनेरात मोठ्या कारवाया.!


सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोले तालुक्यात पोलीस निरीक्षक अभय परमार यांची गच्छंती झाल्यानंतर नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी आज पहिल्यांदाच धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांवर छापे टाकले असून त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सगळ्यात पोलिसांनी विरगाव येथे जो छापा टाकला तो एक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. यात पाच जणांना आरोपी करण्यात आले आहेत. तर जे अन्य जुगार खेळणारे होते ते पळून गेल्यामुळे, त्यांना पोलिसांनी आरोपी देखील केले नाही. मात्र, अटक आरोपींकडून 15 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या पलिकडे अकोल्यात वाळु तस्कार आणि अवैध दारु विक्री करणारांवर घुगे यांनी कारवाई केली आहे. तसेच संगमनेरात देखील पोलिसांनी 5 ते 6 ठिकाणी छापे टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या कित्तेक दिवसांपासून विरगाव फाटा हा फार मोठा चर्चेचा विषय होऊन बसला आहे. येथे डांसबार वगळता असे काही नाही. जे या फाट्यावर मिळणार नाही. जुगार मटक्या पासून तर हर एक प्रकारच्या दारुपर्यंत, हवाल्यापासून तर दिलवाल्यांपर्यंत प्रत्येक प्रकार येथे प्रचलित झाला आहे. याला अभय कोणाचे? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. यापुर्वी कित्तेक लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली असेल. मात्र, ती निरर्थक ठरली आहे. आज दि. 26 मे 2021 रोजी घुगे यांनी विरगाव शिवारात छापा टाकला आणि देवठाण-विरगावच्या गेमाड्यांची पळता भुई थोडी केली. यात पाच जणांना त्यांनी आरोपी केले खरे.! मात्र, जे अन्य तीन ते चार जण होते. ते डोंगरा-डोंगराने पळून जाण्यात यशस्वी झाले. काही झाले तरी ते जुगार खेळत होते. त्यामुळे, त्यांचा शोध घेऊन देखील त्यांना आरोपी केले पाहिजे. अशा प्रकारची मागणी स्थानिक व्यक्तींनी केली आहे. यांची नावे पोलिसांनी जोर लावला तर ती लगेच पुढे येतील. मात्र, पोलिसांनी इच्छा असेल तर त्यावर प्रकाश पडेल अन्यथा झाकली मुठ सव्वा लाखाची अशा प्रकारची चर्चा या रेडबाबत सुरू आहे. म्हणजे एकीकडे देवठाण येथे अरुण शेळके यांच्यासारखा सामजभिमुख व्यक्ती आणि त्यांची ग्रामपंचायत टिम तथा आशा सेविका ह्या रस्त्यावर उतरुन समाजप्रबोधन करीत आहे. देवठाण गावात शुन्य कोरोना रुग्ण मिळावेत त्यासाठी उन्हातान्हात उभे राहुन जनतेला विनवनी करीत आहेत. तर, दुसरीकडे काही लोक याच शिवारात जुगार आड्डे चालवत आहेत. ही किती दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे,  देवठाण गावातून या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे. या छाप्यात राजु वसंत बोडखे (रा. देवठाण, ता. अकोले), मच्छिंद्र लक्ष्मण साळुंखे (रा. नवलेवाडी, ता. अकोले), गणेश नामदेव बोडखे (रा. देवठाण, ता. अकोले) सोमनाथ बारकु उघडे (रा. विरगाव) व अनुप केदारनाथ नापडे (रा. संगमनेर बायपास, ता. संगमनेर) अशा पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. तर यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहने असा 15 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

तर या पलिकडे काल घुगे यांच्या पथकाने कारखाना रोड परिसरात राहणार्‍या वाळु वाहतुक करणार्‍या व्यक्तीस ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे परवाना व कागदपत्रांची चौकशी केली असता कोणताही परवाना मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह वाहनास ताब्यात घेऊन अवैध वाळु वाहतुक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शुभम संजय चव्हाण (रा. कारखाना रोड, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे. तर त्याच्याकडून 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अकोल्यात अवैध दारु विक्री करणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात काशिनाथ भिमराव शिंदे (रा. शाहुनगर, ता. अकोले) व सुनिल अर्जुन मेंगाळ (रा. ठाणगाव, ता. सिन्नर) अशी दोघांची नावे आहेत. यांच्याकडून 3 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून या सर्वांवर अकोले पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर संगमनेर शहरात देखील पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. यात अकोले रोडवर चिखली येथे दारु आड्ड्यावर छापा टाकून रामदास सुर्यभान रोहम (रा. अरगडे मळा, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यास अटक केली आहे. त्याच्याकडून 5 लाख 22 हजार 496 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर संगमनेर तालुक्यातील खराडी येथे दारु आड्ड्यावर छापा टाकून अर्जुन भागाजी पवार (रा. खराडी, ता. संगमनेर) यास अटक केली आहे. त्याच्याकडून 2 हजार 496 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. राजापूर येथे देखील राजू पिंपळे यांच्या गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. त्यात 8 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. समनापूर येथे शौकत आयुब शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 हजार 300 रुपयांची दारु हस्तगत केली आहे.

तसेच संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे दारु आड्ड्यावर छापा टाकला असता राजहंस रतन शिंदे (रा. देवगाव, ता. संगमनेर) यात अटक केली आहे. त्याच्याकडून 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.  संगमनेर तालुक्यातील वैदुवाडी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. त्यात संदिप तया शिंदे यास अटक केली असता त्याच्याकडून 3 हजार 120 रुपयांची दारु मिळून आली आहे. याच वैदुवाडीत सपना गणेश महाले हिला ताब्यात घेतले असता तिच्याकडे 1 हजार 300 रुपयांची दारु मिळाली आहे. तसेच याच शिवारात राजू रामा लोखंडे यास अटक केली असता त्याच्याकडे 2 हजार 496 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या कारवाया केल्यानंतर पोलिसांचे एकीकडे कौतुक होत असले तरी दुसरीकडे असे बोलले जात आहे की, मोठमोठी दुकाने आतून चालु असताना त्यांच्यावर कोणी कारवाई करीत नाही. मात्र, या छोट्याछोट्या माशांना मात्र, पोलीस शिकार करताना दिसत आहे.