संगमनेरच्या मार्केटला लागलेल्या आगीत २२ कोटींचे नुकसान, आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरुच.!आठ ठिकाणच्या आग्निशामक.! तालुक्याच्या भावना होरपळून निघाल्या.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                           संगमनेर शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामास काल मंगळवार दि.27 एप्रिल रोजी 8:30  वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. यामध्ये तब्बल 22 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या गोदामात कापूसगाठी 170 किलो तर हमीभावात खरेदी केलेले चना 8 हजार 823 पोती, मिरी 250 बॅग 50 किलो प्रमाणे, सोयाबीन 242 बॅग, गहू 210 बॅग, बाजरी 1 हजार 400 बॅग हे सर्व या आगीत जळुन खाक झाले आहे. यामुळे तब्बल 22 कोटी रुपयांचा मुद्देमाल आगीत जळून खाक झाला आहे. या नुकसानीमुळे व्यापारी आणि संगमनेरकरांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी अवतरले आहे. हे फार मोठे नुकसान असून यातून बाहेर पडायला फार कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या राज्य वखार महामंडाळाच्या धान्य साठवणूकीच्या गोदामास आग लागली होती. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. पण, ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच ह्या गोदामातील कापसाच्या गाठी, चण्याचे पोते, मिरी, सोयाबीन,गहू, बाजरी सर्व जळुन खाक झाले. परंतु, गोदामाच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. त्या परिसरातील लोक जीव मुठीत धरून बसले होते. मात्र, सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीत हानी झालेली नाही.

  ;दरम्यान, ही आग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी संगमनेर नगरपालिकेतील दोन अग्निशमन, संगमनेर सहकारी कारखान्याचे दोन अग्निशामन, मालपाणी उद्योगसमुहाचे टँकर, अकोले सहकारी कारखान्यावरील एक अग्निशामन, प्रवरा सहकारी कारखण्यावरील अग्निशमन तसेच शिर्डी, राहता, सिन्नर, श्रीरामपुर येथील अग्निशमन वाहने बोलावुन ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. ही आग पहाटेच्या सुमारास आटोक्यात आली असली तरी कापसाच्या गाठी अजुनही पेटत्या आहेत. त्यांची धग कायम आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. त्यामुळे, आगीचे नेमके कारण समजलेले नाही. हा नेमकी खोडसाळपणा आहे की, तांत्रीक वा यंत्रीक कारण आहे, याबाबत चौकशी होणार आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. ही आग विझविण्यासाठी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे तहसलदार अमोल निकम यांच्यासह अनेकांनी यंत्रणा कामाला लावली. ही आग शेजारील वसाहतीत जाणार नाही यासाठी आग्नीशामक दलाने काळजी घेतली. तर, भिंत पार करुन मोठी रहदारी असल्यामुळे अनेकांचा जीव टांगतीला लागला होता. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हेच प्रशासनाचे यश म्हणावे लागेल.

 - सुशांत पावसे