अजब प्रेम की गजब कहाणी.! तो तिला भेटायला कोविड सेंटरमध्ये गेला आणि अर्ध्या तासानंतर दोघांना शौचालयात पकडले.!

                                   


सार्वभौम (अकोले) :- 

                         आपण प्रेमाच्या अनेक कथा ऐकल्या असतील, मात्र ही अजब प्रेम की गजब कहाणी तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला हसावं की रडावं, हेच कळणार नाही. कारण, आपली प्रेयसी कोविड पॉझिटीव्ह झाल्यानंतर हा बहाद्दर भलीमोठी भिंत चढून वर चढला आणि तिला घेऊन खाली देखील उतरला. काही काळ या दोघांनी कोविड सेंटरच्या महिला शौचालयात काढले आणि दोघांना पकडल्यानंतर एकच खळबळ उडली आणि त्याची चर्चा अगदी वार्‍यासारखी पसरली. मित्रांना हा प्रकार कोठे युपी, बिहारमध्ये नव्हे! तर खुद्द अकोले तालुक्यात उभारण्यात आलेल्या अगस्ति मंदीराच्या देवस्थान कोविड सेंटरमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला. नंतर यात मजणुला प्रसाद देऊन समज देण्यात आली तर संबंधित अवघ्या अल्प वयाच्या कोविड बाधित मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या हिरोईनला भेटण्यासाठी हिरो किती जिवाचा आकांत करतो हे आपण चित्रपटात पाहिले आहे. तर मुमताजसाठी देखील इतिहासात नोंद होईल असा शहाजानने ताजमहल बांधला आहे. रॉबर्ट आणि ज्युली यांची प्रेमकथा अजरामर आहे तर देवदास आणि पारो यांची प्रेमकहाणी आपल्याला नवी नाही. म्हणजेच प्रेमात किती ताकद असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, ते जग वेगळे होते, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, ती समाज व्यवस्था देखील वेगळी होती आणि आज परिस्थिती वेगळी आहे. दुर्दैवाने वयात आलेल्या तरुणांना याचे भान राहिले नाही. आपण काय करतो आहे, संकट किती भयानक आहे, आपली भूमिका काय हवी आहे याचे भान राहिले नाही. स्वामी विवेकानंद निधड्या छातीचे शंभर तरुण घेऊन देश घडवायला निघाले होते तर आजचे तरुण देश बिघडवायला निघाले आहेत. अशाच प्रकारचे कृत्य एका तरुणाने अगस्ति कोविड सेंटरवर केले आहे. 

त्याचे झाले असे की, अकोल्यातील एका प्रतिष्ठीत आणि सुशिक्षित घरात कोरोनाने कहर केला आणि दुर्दैवाने घरातील दोन्ही कर्ते व्यक्ती पॉझिटीव्ह आले. त्यानंतर त्यांच्या घरातील अल्पवयीन मुलीला देखील कोरोनाची लगण झाली. तिला उपचारासाठी अगस्ति येथील कोविड सेंटरवर दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने मोबाईलचा वाढता अतिरेख हा किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अवघ्या काही वयाच्या मुलीचे प्रेम एका तरुणावर जडले आणि त्यांची चर्चा सुरू झाली. बोलबोल करता त्यांच्यातील विरह हा देवदास आणि पोरो यांच्यासारखा झाला होता. त्यामुळे, त्यांनी काल रात्री 11 वाजणच्या सुमारास भेटण्याचे ठरविले.

दरम्यान हा तरुण पॉझिटीव्ह नसल्यामुळे, त्याला कोविड सेंटरवर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे, तो गेल्या दोन दिवसांपासून तेथे घिरट्या घालत होता. त्यांना विरह सहन होईना म्हणून त्यांनी भेटण्याचे ठरविले आणि ते भेटले देखील. हा प्रकार तेथील सुरक्षा रक्षकाने पाहिला. मात्र, त्यांना वाटले कोणीतरी नातेवाईक असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, बराच वेळ झाला तेव्हा यांनी एक भिंत पार करून एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. काही काळ जातो ना जातो तोच हे दोघे अचानक गायब झाले. तोवर अर्धा तास होत आला होता. मात्र, जेव्हा एक महिला टॉयलेटसाठी गेली तेव्हा तिच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडली.

या दोघांना नंतर पकडले असता त्यांनी सांगितले की, आम्ही लोकांच्या भितीपोटी शौचालयात दडून बसलो होतो. कालांतराने हा प्रकार रात्री 12 वाजता प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कानावर घातला असता दिवसभर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी रात्री कोविड सेंटरवर दाखल झाले. त्यांनी संबंधित प्रेमवेड्या तरुणाला चांगलाच प्रसाद दिला. त्यानंतर त्याची कोविड टेस्ट करण्याचा अग्रह झाला असता त्याने तेथून पळ काढला. यावेळी तेथे पोलिसांनी देखील हजेरी लावली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. तोवर संबंधित बालिका तेथून पसार झाली होती. त्यामुळे, प्रशासनाला घाम फुटला होता.

दरम्यान, ही मुलगी गेली कोठे? याची शोधाशोध सुरू झाली, सगळे कोविड सेंटर पिंजून काढले मात्र तिचा शोध लागला नाही. त्यानंतर अगस्ति कोविड सेंटरवर असणार्‍या शंभर कॉटवर असणार्‍या प्रत्येक पेशन्टची चौकशी करण्यात आली. त्यांचे चेहरे पाहण्यात आले तेव्हा समजले की, संबंधित मुलगी ही एका कॉटवर गुडूप होऊन झोपलेली आहे. त्यानंतर प्रशासनाने तिच्या पालकांना बोलावून घेतले आणि तिला त्यांच्या ताब्यात दिले. तिच्याकडून काही लिखापडी करुन घेत पालकांनी तिचा जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणावर पडदा पडला आणि सकाळी 4:30 वाजता अधिकारी तेथून घरी गेले. सकाळी 10 वाजता सर्व यंत्रणा पुन्हा कामावर होती. या घटनेची कोठी वाच्चता झाली नाही. मात्र, इतक्या मोठ्या घटना लपून थोड्या राहत असतात.!

खरंतर प्रशासनाने आता नेमकी काय-काय कामे करावी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तुमचा जीव वाचविण्यासाठी स्वत:ची जीव धोक्यात घालायचा की, तुमच्या लिलांवर 24 तास निगरानी ठेवायची. किमान कोविडच्या काळात तरी लोकांनी, प्रेमविरांनी आणि लैला-मजनू यांनी समजून घेतले पाहिजे. एक व्यक्ती पॉझिटीव्ह आला आहे आणि त्याला भेटण्यासाठी इतका मोठा उहापोह.! सरकार सोशल डिस्टिन्स पाळा सांगत आहे आणि दुसरीकडे असे प्रकार समोर येत आहेत. तुम्हीच सांगा. कसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. कोविड सेंटरवर हा पहिलाच प्रकार नाही, तर यापुर्वी देखील खानापूर सेंटवर असे प्रकार घडले आहेत. आता याला प्रशासन काय करु शकते? आपणच आपल्या पाल्हाळ प्रेमाला तुर्तास तरी लगाम घातला पाहिजे. एकीकडे लोक कोरोनाचे नाव घेताच सख्या नात्याला देखील जवळ येऊ देत नाहीत तर दुसरीकडे हे असले बालिश प्रेम पहायला मिळत आहे. अर्थात यांचा सिलसिला सुरू राहिल्यास हरकत नाही. मात्र, हे दिवस तर निघून जाऊद्या, तुम्ही कोरोनापासून तर वाचा, कारण, तुमच्यामुळे तुमचे कुटुंब बाधित होणार आहे. कुटुंबामुळे शेजारी आणि बोलबोल करता गाव व तालुका. असाच तर कोरोना चिनच्या वुहान मधून आपल्या घरात येऊन पोहचला आहे. त्यामुळे, प्रियकरांनो.! थोडा संयम बाळगा.