देशमुखांनी कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप.! शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल.! साखर कारखाण्याचे राजकारण पेटले.!
सार्वभौम (अकोले) :-
माजी प्रशासकीय अधिकारी बी.जे देशमुख यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. अकोले. जि. अ.नगर) यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, जसजशी अगस्ति कारखाण्याची निवडणुक जवळ येत चालली आहे. तसतसे तालुक्यातील राजकारणाला फौजदारी रंग चढू लागले आहेत. असे चित्र दिसत आहे. बी. जे देशमुख यांनी करोडोंचा भ्रष्टाचार केल्याचे खळबळजनक आरोप धुमाळ यांनी केले होते. तर मी खरोखर भ्रष्टाचार केले असतील तर त्यांनी न्यायालयात पुरावे सादर करावेत. मी दोषी असेल तर मला शिक्षा होईल आणि त्यांच्या आरोपात काही तत्थ्य नसेल तर त्यांना शिक्षा होईल अशी प्रांजळ भुमिका देशमुख यांनी मांडली आहे. मात्र, काही झाले तरी तालुक्यातील एखादा व्यक्ती बाहेर जाऊन इतक्या मोठ्या पदावर जात तालुक्याचे नाव रोशन करतो, त्यांचे कौतुक करण्यापेक्षा अशा पद्धतीने तोंडात येईल तसे वक्तव्य करुन एखाद्याची नैतीकता हनन करणे हे योग्य नाही. अशा प्रतिक्रीया जनतेतून उमटू लागल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 31 मार्च 2021 रोजी मच्छिंद्र धुमाळ यांनी एका युट्युब चॅनलवर मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी बी. जे देशमुख यांच्यावर काही आरोप केले होते. फिर्यातीत म्हटले आहे की, मच्छिंद्र धुमाळ म्हणले होते की, हे बी.जे कोण? हे कोठे होते? हे बी.जे पुण्याला बाजार समितीत होते. तेथे शंभर कोटींचा भ्रष्टाचार या बी.जे यांनी केले आहे. त्यामुळे, अजित पवार यांनी त्यांना लात मारुन हकलुन दिले आहे. यांनी 20 ते 25 वर्षे शासकीय सेवेत काम केले आहे. यांनी सरकारचा मलिदा खाल्ला, करोडोंचा भ्रष्टाचार केले आहे आणि आता हे तालुक्यात येऊन व्यवस्था परिवर्तनाची भाषा करीत आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे बी. जे देशमुख यांना त्यांच्या नातेवाईकांनी विचारणा केली की, तुम्ही खरोखर इतका मोठा घोटाळा केला आहे का? असा प्रकारच्या प्रश्नांना तोंड देताना बी. जे देशमुख यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. खरंतर देशमुख यांचे मोठे बंधू यांना देवाज्ञा झाल्यामुळे ते प्रचंड दु:खात होते. त्यामुळे, त्यांनी अद्यापपर्यंत कोणतेही पाऊल ऊचलले नव्हते. आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी अकोले पोलीस ठाण्यात त्यांनी स्वत: उपस्थित राहुन गुन्हा दाखल केला आहे.
सुपारी घेऊन टिका.!
मी पुण्यासह अनेक ठिकाणी सहकारात काम केले आहे. पुण्यात तर खुद्द शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा, गिरीष बापट, बाबा आढाव यांच्यासारखे महान लोक तेथे कार्यरत आहेत. त्यांच्या आदेशाने मी काम केले आहे. तर खर्या कामात आडकाठी घालणारे काही कमी नसतात. त्यामुळे, बीन बुडाचे आरोप माझ्यावर झाले. मात्र, त्याची डॉ. गोंदकर आणि तावरे यांच्यासारख्या मोठ्या अधिकार्यांनी चौकशी केली. त्यात मला कोठे दोषी धरले नाही. मी चुकीचा असतो तर मला या मोठ्या लोकांनी देखील पाठीशी घातले नसते. मात्र, मी जेथे काम केले त्या ठिकाणी 202 कोटींच्या ठेवी आजही बँकेत जमा आहे. एक उत्तम प्रशासक म्हणून मला सन्मानित केले आहे. मात्र, दुर्दैवाने तालुक्यातील अशा काही व्यक्ती असतात ज्यांना सहकारातला स देखील कळत नाहीत. ते कोणाचीतरी सुपारी घेऊन माझ्यावर आरोप करतात हे मनाला फार त्रासदायक वाटते.
- बी. जे. देशमुख (निवृत्त प्रशासक)
आता हे कसं रे बुवा.!
खरंतर बी.जे देशमुख हे एक सहकारातील अभ्यासू व्यक्तीमत्व असले तरी ते एकंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने कललेले दिसतात. आता सिताराम पाटील गायकर हे राष्ट्रवादीत आल्यामुळे, तालुक्याचे बरेच राजकीय गणिते बदलली आहेत. त्यात गायकर साहेबांना माननारा वर्ग फार मोठा आहे. त्यात मच्छिंद्र धुमाळ देखील आहेत. तर राज्यात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे, देशमुख आणि धुमाळ हे एकाच गटात सामिल असल्याचे तुर्तास तरी चित्र आहे. त्यामुळे, एकंदर धुमाळ हे व्यक्तीमत्व बोलुन गेले तरी ते कालांतराने नम्रपणे आपली चुक मान्य करतात. आता त्यांनी केलेले वक्तव्य कितपत खरे आहे हे त्यांनाच माहित आहे. त्यामुळे, ते न्यायालयात पुरावे सादर करतील की नम्रतेची भुमीका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात शक्यतो गायकर पाटील यांच्यासारखे व्यक्तीच येणार्या काळात सुवर्णमध्य काढतील यात काही शंका नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जाणकारांकडून उमटत आहे. मात्र, काही झाले तरी धुमाळांनी देखील त्यांच्या वाच्चाळ स्वभावावर आवर घातले पाहिजे असे देखील मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कारण, बाहेर जाऊन अस्तित्व तयार करणे आणि निव्वळ आरोप झाले तरी त्याचा बाऊ करणे हे कष्टातून वर गेलेल्या व्यक्तीला बोचणे सहाजिक आहे. तुर्तास देशमुख यांनी हा एक धोक्याचा संदेश आरोप करणार्यांना दिला आहे हे मात्र नक्की.!
हे असले वैर नको.!
सन 1991 मध्ये नगरच्या दक्षिण खासदारकीत दिवंगत बाळासाहेब विखे यांनी बंडखोरी करीत जनता दलाच्या पाठींब्यावर निवडणुक लढविली होती. त्याच्या विरोधात यशवंतराव गडाख होते, तर त्यांना शरदचंद्र पवार यांनी बळ दिले होते. या दोघांमध्ये निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी यशवंतराव गडाख यांनी विखेंचा पराभव करुन विजय मिळविला. मात्र, त्या आरोपांच्या विरोधात विखे पाटील न्यायालयात गेले आणि त्यानंतर गडाख यांना खासदारकीचा राजिनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर सहा वर्षे निवडणुक न लढविण्याचा आदेश दिला होता. त्यात पवार साहेब देखील अडचणीत आले होते. मात्र, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून स्वत:ला निर्दोष साबीत केले होते. यात हे सर्व सांगण्याचे तात्पर्य असे की, आरोप करणे म्हणजे काही होत नाही. अशा भ्रमात राहणे चुकीचे आहे. देशमुख यांनी जर खरोखर न्यायालयीन लढाई लढली तर ती धुमाळ यांच्यासाठी फार घातक ठरु शकते. अशा गुन्ह्यात 6 ते 3 वर्षे शिक्षेची तरतुद देखील आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यासारख्या पुरोगामी वारसा लाभलेल्या ठिकाणी असे वैर निर्माण होणार नाही. तसेच 2002 प्रमाणे जशा दंगली होऊन गोळीबार झाला होता असे काही होणार नाही. यासाठी संयमी राजकारण होईल अशी भूमिका घेणे गरजेचे आहे असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.