शिवसेनेच्या गणेश कानवडे यांना आत्मविश्वास नडला, चप्पल काढून पळाले पण, पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केलीच.!

 


सार्वभौम (अकोले) :- 

                    एक कोटी रुपयांची खंडणी मागून चालु बिल्डींगच्या बांधकामात अडथळा आणत तिघांनी संगनमताने 30 लाख रुपयांची खडणी घेतली होती. उर्वरित 60 लाख रुपये रक्कम न मिळाल्याने वारंवार माहिती अधिकार आणि अन्य अर्जफाटे करुन प्रशासनास वेठीस धरणे, फिर्यादीसह पत्नीस धमकाविणे, ठार मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार करणाऱ्या मयुर सुभाष कानवडे, गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे (सर्व रा. अगस्ती बेकरी, अकोले) अशा तिघांवर अकोले पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत आंबादास नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरम्यान तिघांना न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपाचा (इंटरीम) जामीन दिला होता. मात्र, त्याची मुदत संपताच यावर दोन्ही पक्षाच्या वतीन प्रबळ युक्तीवाद करण्यात आला. आज मंगळवार दि. 9 मार्च 2021 राेजी दुपारी या मुळ जामिनावर अंतीम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने व सरकारी वकील वाकचौरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन शिवसेनेचे पदाधिकारी गणेश कानवडे यांचा जामीन नामंजूर केला आहे. जामीन नामंजूूर होताच कानवडे हे तेव्हा न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडले आणि धरा-धरा म्हणताच त्यांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. तर अन्य दोघे त्यावेळी न्यायालयातच बसून राहिल्याने त्यांना ताब्यात घेण्यापुर्वीच त्या दोघांनी वरिष्ट कोर्टात आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे, न्यायालयाने त्यांना १६ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. अशा या थरारक प्रसंगामुळे, या परिसरात एक वेगळेच वातावरण पहायला मिळाले. तर, कानवडे यांना त्यांचा अति उत्साहीपणा आणि अर्धवट ज्ञानामुळे आता पोलीस कोठडीत बसण्याची वेळ आल्याची चर्चा तालुक्यात सुरु होती. 

              नाईकवाडी आणि कानवडे यांच्यातील व्यावहारीक, वैयक्तीक आणि आर्थिक वादात गुन्हा दाखल झाल्यानंतर फार नाट्यमयी घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले आहे. कारण, गेल्या दोन वर्षापासून जे काही भिजत घोंगडे पडले होते.  त्यावर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी शिक्कामुर्तब केला आणि तडक गुन्हा नोंदविला. प्रथमत: तालुक्यात चर्चा सुरु होती की, हा सर्व वैयक्तीक व्यवहार असून खंडणी नाही. त्यामुळे, कानवडे यांच्याबाबत काहीशी सहानुभूती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर लगेच १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सत्र न्यायालयाने या तिघांनाही इंटरीम (तात्पुरत्या स्वरुपाचा) जामीन दिला होता. त्यामुळे, नाईकवाडी यांच्या फिर्यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

          दरम्यान, हे दोन्ही गट हे भक्कम असून त्यांच्या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यामुळे, इंटरीम जामिनानंतर देखील यांच्यात कलगितुरा पहायला मिळाला. या जामिनावर २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत न्यायालयाने कानवडे यांना दिली होती. मात्र, तारीख पे तारीख होऊन त्यावर ३ तारखेला दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने अगदी दोन्ही बाजुंचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी पुन्हा ९ मार्च ची तारीख दिली होती. त्यामुळे, आज कोणीचे पारडे जड भरणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. आज सकाळपासून पोलीस आणि तालुक्यातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती संगमनेरात ठाण मांडून होत्या. आज दुपारी न्यायालयाने आवाज देताच तिन्ही आरोपी हजर झाले आणि अवघ्या १ मिनिटात आदेश देत तिघांच्या जामिनावर फायनल निर्णय झाला.

          दरम्यान, जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा मयुर कनवडे आणि सुभाष कानवडे ही दोघे न्यायालयातच थांबून राहिले. तोवर गणेश कानवडे यांनी न्यायालय सोडले असता त्यांच्या मागावर पोलीस होतेच. कानवडे यांना थेट चपला सोडून पळ काढला असता धरा-धरा असे पोलिसांनी ओरडताच कानवडे घास बाजाराकडे धावते झाले. नेमकी काय घडले आहे हे काही क्षण कोणालाच काळेनासे झाले होते. कोणी म्हणे चोर-चोर तर पोलीस आपले क्लेरिफिकेशन देत तो आरोपी आहे असे म्हणून त्यांनी कानवडे यांना ताब्यात घेतले.

           एकीकडे हा सर्व प्रकार घडत असताना दुसरीकडे मयुर आणि सुभाष यांनी मात्र न्यायालयाचा आवार सोडला नाही. तर, कायदेशीर दृष्ट्या न्यायालयाच्या आवारात कधीही कोणाला अटक करता येत नाही. त्याचाच फायदा घेत आरोपी यांच्या वकीलांनी न्यायालयाला विनंती केली की, मेहरबान साहेब, आरोपी यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी १६ तारखेची मुदत द्यावी. त्यानंतर न्यायालयाने ती विनंती मंजूर देखील केली. मात्र, ती फक्त मयुर आणि सुभाष यांची. गणेश कानवडे यांना देखील म्हणणे मांडण्यासाठी मुदत द्यावी अशी विनंती करण्यात आली. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. पोलिसांनी आपली भूमिका मांडत स्पष्ट केले की, आम्ही कानवडे यांना न्यायालयाच्या आवारातून नव्हे तर कॅम्पसच्या बाहेरुन ताब्यात घेतले आहे. त्यानंतर न्यायालयाने गणेश कानवडे यांच्या विनंतीला नाकारत फक्त दोघांना मत मांडण्याची संधी दिली. त्यानंतर गणेश कानवडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक दाखविली आहे.

              एकंदर, गणेश कानवडे यांनी इतक्या दिवस न्यायालयीन लढाई लढली, अनेक अर्ज आणि माहिती अधिकार वापरत नाईकवाडी यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांचे बुद्धीचातुर्य तोडके पडले. न्यायालयीन लढा लढताना त्यांना इंटरीम जामिन मिळाला हेच त्यांचे यश होते. मात्र, ते त्यांना सिद्ध करता आले नाही असे म्हणता येईल किंवा ते खरोखर खंडणीखोर आहेत यावर आता शिक्कामुर्तब झाला असल्याचे बोलले जात आहे. एकंदर  शिवसेनेचे नेते गणेश कानवडे यांना आता अटक झाली आहे. त्यांच्याकडून आता काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे आहे. तर, दुसरीकडे जे दोन आरोपी आहेत त्यांच्याबाबत १६ तारखेला नेमकी काय निर्णय होतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

      नेमकी काय आहे प्रकरण.!

यात लक्ष्मीकांत नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी गेल्या 10 वर्षापासून बांधकाम प्रकल्पाची कामे करतो. त्यावेळी मी अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनीशी भागीदार होतो. मात्र, कालांतराने कायदेशीर रित्या मी त्यातून बाहेर पडलो आणि स्वत:चे अगस्ती डेव्हलपर्स फर्म स्थापन केले. या दरम्यानच्या काळात अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनीत अकोले येथील आरोपी मयुर सुभाष कानवडे व सुभाष भागुजी कानवडे या दोघांनी गुंतवणुक केली आणि त्यानंतर कालांतराने त्यांचे डायरेक्टरसोबत मतभेद झाले. मात्र, मी त्यापुर्वीच म्हणजे 2017 साली त्या कंपनीसह यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडलो होतो. या दरम्याच्या काळात अर्बन जिनेसीस इन्फ्राकन कंपनी तथा त्यातील शेअर होल्डर आणि व्यवस्थापन यांच्याशी माझी काही एक संबंध व देणे-घेणे नव्हते. उलट मलाच या कंपनीकडून घेणे होते.

         नाईकवाडी यांनी फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, यांच्यात वाद सुरू असताना मी माझे फर्मच्या माध्यमातून राजगुरूनगर व अकोले येथे काम सुरू केले होते. अर्थात हा फार मोठा प्रकल्प असल्यामुळे मी तो उभा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून तो उभा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मयुर कानवडे व सुभाष कानवडे यांनी व्यक्तीद्वेष म्हणून कामात वारंवार अडथळा आणला. त्यानंतर त्यांना समजून देखील सांगण्यात आले. मात्र, त्यांचा हेतू काय होता याची मला नंतर खात्री झाली. कालांतराने आरोपी यांनी मला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मला वेठीस धरण्यासाठी त्यांनी राजगुरूनगर येथील मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना खोटी माहिती देऊन तक्रार करीत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. एक खात्री म्हणून प्रशासनाने काम बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लक्षात आले की, सुभाष कानवडे, गणेश कानवडे, मयुर कानवडे यांनी बांधकामावर हारकती घेतल्या आहेत.

             दरम्यान, जोवर पैसा नाही तोवर बांधकाम नाही. अशी भूमिका तिघांनी घेतल्यामुळे, एकीकडे कर्जचे मिटर थांबत नव्हते तर दुसरीकडे बाधकाम अपुर्ण राहून काम प्रलंबित राहिले होते. त्यामुळे, नाईकवाडी यांनी थेट मध्यस्तीचा मार्ग अवलंबविला. त्यावेळी राजू गोडसे, सचिन शेटे, महेश नवले, शिवाजी धुमाळ यांनी भाऊपाटील नवले यांच्या जनलक्ष्मी पतसंस्थेत एक मध्यस्ती म्हणून भूमिका पार पाडण्याचे ठरविले. त्यावेळी 2019 मध्ये झालेल्या बैठकीत असे ठरले की, तिघांना मिळून 55 लाख रुपये द्यायचे. त्यानंतर ते अर्ज मागे घेणार होते. मात्र, ही रक्कम पाहता ती शक्य नव्हती तर दुसरीकडे बांधकाम रखडले होते. व्याज सुरू होते त्यामुळे त्यांनी 47 लाख रुपये देण्यास मी तयार झालो. त्यावेळी एक रकमी 4 लाख 25 हजार रु. दिले देखील होते असे नाईकवाडी सांगतात. तर कधी चेक, बँक टू बँक असे 30 लाख रुपये टप्प्या टप्प्याने दिले होते. ही रक्कम त्यांनी स्विकारली देखील आहे. त्यानंतर कानवडे यांची जे काही अर्ज सरकार दप्तरी जमा केले होते, ते काढून घेतले.

           दरम्यान, नाईकवाडी म्हणतात, मी राजगुरूनगर येथे बिल्डींग बांधण्यास सुरूवात केली असता आरोपी हे तेथे आले व त्यांनी उर्वरित रकमेची मागणी केली. इतकी मोठी रक्कम देणे मला शक्य नाही, माझ्याकडे पैसे आले की मी तुमची ठरलेली रक्कम देऊन टाकतो. मात्र, त्यांनी ते एकले नाही. त्यांनी पुन्हा माझ्या राजगुरूनगर येथील बांधकामा विरोधात रिट याचिका दाखल केली. त्यात बांधकाम पाडून टाकावे या मागणिला न्यायालयाने थारा दिला नाही. ती याचिका फेटाळत आदेश माझ्या (नाईकवाडी) बाजुने लागला. मात्र, तरी देखील आरोपींनी सरकार दरबारी कागदी घोडे नाचविण्यास सुरूवात केली. म्हणून मी मागिल मध्यस्ती यांच्या कानावर ही गोष्ट घातली. म्हणून समजले की, आरोपी यांना आता 1 कोटी रुपयांची खंडणी हवी आहे. जर ही रक्कम मिळाली तर अर्ज मागे घेऊ असा निरोप समजला. नंतरच्या काळात याच रकमेसाठी नगरसेवीका सोनालीताई नाईकवाडी यांना गणेश कानवडे यांनी रस्त्यात आडवून 1 कोटी  रुपयांसाठी दमदाटी करण्यात आली. त्यानंतर नाईकवाडी यांनी पोलीस ठाणे गावविले आणि गुन्ह्याची नोंद केली. आता पोलीस करणार तरी काय? त्यांनी अदखलपात्र गुन्हा नोेंदविला आणि त्यानंतर साधं चौकशीला देखील कोणाला बोलवि गेले नाही. तो गुन्हा तसाच पडून राहिला आणि कानवडे देखील पुढे अडकाठी करत राहिले. यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून नाईकवाडी हे त्यांचे गार्‍हाणे पोलीस दरबारी मांडत होते.

न्याय मिळाला.!

    माझा न्याय व्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. आम्ही गेल्या कित्तेक दिवसांपासून कानवडे यांचा त्रास सहन करत होतो. त्यांना इंटरीम जामिन मिळाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे विचित्र नजरेने पाहिले होते. तेव्हा फार वाईट वाटले होते. मात्र, म्हणतात ना.! कानून के हाथ लंबे होते हैं! आज अखेर आम्हाला न्याय मिळाला. जी न्यायालयीन व्यवस्था आहे. तिच्यावर मी फार अंत:करणापासून विश्वास ठेवते. मी समाजसेवा करताना कधी कायदा हातात घेणाऱ्याला साथ देत नाही. भगवान के पास देर है लेकीन अंधेर नही याची प्रचिती देखल मला आली आहे. हा आमचा व्यवहारीक वाद मुळीच नव्हता. फक्त, गुन्हे, वाद आणि न्यायालयीन बाबी याचा कधी अनुभव नाही आणि स्वत:ची प्रगती थांबविण्यापेक्षा यांना समाधान केलेले बरे असे म्हणून आम्ही आरोपींना बळी पडलो होतो. मात्र, अती तेथे माती होते तसेच आज पहायला मिळाले आहे. जे कोणी या प्रकाराला व्यक्तीवाद किंवा व्यावहार दाखवत होते त्यांना मेहरबान न्यायालयानेच उत्तर दिले आहे.

         -  साेनाली नाईकवाडी