संगमनेरात भाजप म्हणजे नाका परिस जड एक नाही धड भाराभर चिंध्या- हे करतात तरी काय? गंभिर आरोप.! भाजपचे अपयश.! गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा.!

 
 - सुशांत पावसे

 संगमनेर (प्रतिनिधी) :- 

          संगमनेरमध्ये 94 ग्रामपंचायतच्या निवडणूका झाल्या. त्यात भाजपला येथे मोठ्या प्रमाणात अपयश आले. एवढेच काय भाजपला तालुक्यात गावो-गावी साधे उमेदवार देखील उभे करता आले नाही. फक्त शिर्डी मतदारसंघात जोडले जाणारे गावं वगळता फक्त 2 ग्रामपंचायतीच भाजपच्या ताब्यात आल्या. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपला संगमनेरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. डझनभर जिल्ह्याची पदे असलेल्या भाजप पक्षाला संगमनेरमध्ये यश का मिळत नाही? याची वरिष्ठांनी आता दखल घेतली पाहिजे. याचे आत्मचिंतन केले पाहिजे. राज्यात बूथ यंत्रणा प्रबळ झाल्याने एकदा सत्ता तर आता १०४ आमदार पदरात पडले. मग संगमनेरात कोठे गेले बुथ आणि कोठे गेले सतराशे साठ पदाधिकारी.? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण संगमनेर नगरपालिकेत भाजपचा फक्त एकच नगरसेवक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप काय भुमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आत्ताच संगमनेरमध्ये भाजपची जम्बो कार्यकारणी उभारली. पण, संगमनेरच्या स्थानिक प्रश्नावर भाजपचे पदाधिकारी मात्र मुखगिळूनच बसले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ चुकीच्या कामाला विरोध करत पाठपुरावा करून दंडात्मक कारवाई करत आहे तर शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी संगमनेरातील शेतकऱ्यांनचे प्रश्न हातात घेऊन आवाज उठवत आहे. त्यामुळे स्थानिक भाजप पेक्षा यांचाच विरोध कडवा दिसत आहे.

            संगमनेरमध्ये शंकर लालजी जाजू, रामनाथजी पडतानी, डॉ.ल.का.देशपांडे, सीताराम रोहम ही सर्व माणसांनी जनसंघ भाजपचा विचार येथे रुजवला. तर 1987-89 साली संगमनेरचे भाजपचे पाहिले नगराध्यक्ष राधावल्लभ कासट झाले होते. त्यानंतर 2000 साली काँग्रेसचे विश्वास मुर्तडक व भाजपकडून ज्ञानेश्वर कर्पे यांच्यामध्ये कडवी झुंज देखील पहायला मिळाली. त्यामुळे, येथे कॉंग्रेस अपराजित आहे असे काही नाही. पण, बुळगा विरोध कधीही कडवी झुंज देऊच शकत नाही. हेच कडवे सच आहे. कारण, राजकारणात अशक्य असे काहीच नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न व्यवस्थित हाताळला तर भाजपला नक्कीच यश मिळू शकते. पण, स्थानिक भाजपकडून तसे होताना दिसत नाही. 

        खरंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर श्याम जाजु नियुक्त झाले. त्यामुळे दिल्लीतल्या भाजपचे कार्यकर्ते कौतुक करत बसले. पण, गल्लीतल्या भाजपची वाताहत होत आहे. हे स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. केवळ एखाद्या पदासाठी मागे-पुढे मिरवत बसले. 2014 साली भाजपला देशात व राज्यात मोठे यश मिळाले. राज्यात सत्ता येऊन देखील संगमनेरमध्ये फक्त एक नगरसेवक व एक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेला तर खाते सुद्धा उघडता आले नाही. यापेक्षा भाजपचे दुर्दैव काय असावे. त्यामुळे संगमनेरकडे वरिष्ठ भाजप देखील पाठच फिरवत असल्याचे बोले जाते. मात्र, संगमनेर तालुक्यातील २६ गावे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात जोडली गेली आहेत त्यामुळे या गावांमध्ये पक्षाचे उपक्रम सुरू असतात अनेक आंदोलनात या गावातील कार्यकर्ते शेतकरीच सक्रीय दिसतात. हीच परिस्थिती पठार भागातील गावांमध्ये आहे. काही गावे पिचड यांच्या मतदारसंघात जोडली गेली असल्याने या भागात भविष्यात पिचड चांगली बांधणी करतील परंतू उर्वरीत संगमनेर तालुक्यात भाजपाच्या अस्तित्वाचे काय हा प्रश्न अनुतरीत राहातो.

            दरम्यान, श्रीराज डेरे यांना भाजप युवक मोर्चाचे शिर्डी मतदारसंघाचे प्रमुख पद मिळाले. त्यांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत 22 पदे ही संगमनेरलाच दिली. इतर तालुक्यापेक्षा जास्त पदे संगमनेरला देऊन सुद्धा मोर्चाची धार आतापर्यंत कुठे दिसली नाही उलट ती बोथट असल्याची टिका झाली.  पुढे निवडणुकींचे एवढे मोठे आव्हाण आहे. पण, निव्वळ जम्बो कार्यकारणीचा गव-गवा करतानाच दिसत आहे. शिर्डी मतदार संघाला जोडल्या जाणाऱ्या २६ गावांमध्ये लाईटच्या प्रश्नावर कोकणगावात विखे कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन केले. ते यशस्वी देखील करून दाखवले. शेतकऱ्यांच्या लाईट प्रश्नावर राज्यभर भाजप नेते आक्रमक दिसले. सभागृहात देखील विषय गाजवला. मात्र, महसुल मंत्र्यांच्या तालुक्यात लाईटीचा एवढा मोठा विषय असताना सामान्य माणसांनी विरोध दर्शवला पण भाजपने फक्त बघायची भुमिका घेतली. एवढेच काय तालुक्यातील दुधाचे पेमेंट वेळेवर होत नव्हते तर शेतकऱ्यांकडून सहकारी दुधसंघाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पण, भाजपने मात्र हाताची घडी व तोंडावर बोटच ठेवले. तालुक्यातील भाजपमध्ये जे भले-भले पुढारी आहेत. ते सामान्य व गोरगरीब जनतेला विश्वासात घेत नाहीत. हेच संगमनेर तालुक्यातील भाजपची पराभवाची कारणे असल्याची आता बोले जात आहे.

           दरम्यान, संगमनेर तालुक्यात युवक काँग्रेसने वारंवार भाजप सरकारवर रस्त्यावर उतरून टीका केली आहे. चौका-चौकात महागाईवर मोदींच्या विरुद्ध बॅनर लावले आहे. तर काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोदींच्या बॅनरला काळे देखील फासले होते. एवढेच काय फडवणीस सरकार हे फसवे सरकार आहे अशी वारंवार जहरी टीका ना. थोरतांनी केली आहे. पण तरी देखील भाजप कडून कडवा विरोध पाहायला मिळाला नाही. उलट भाजपच्या सत्तेच्या काळात देखील भाजपचे संगमनेरात  डिपॉजीट जप्तच झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये वरिष्ठ भाजपचे नेते मंडळी संगमनेरात काय भुमिका घेता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. संगमनेर मध्ये निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलून तालुका अध्यक्षपदाची धुरा डॉ. इथापे यांच्याकडे दिली आहे. पण, त्यांच्याकडून थोरतांना स्थानिक प्रश्नावरून विरोध होताना दिसत नाही. प्रदेश भाजपकडून राज्यभर आंदोलन पुकारले की ते रस्त्यावर दिसतात इतर वेळेस मात्र ते कुठे ही दिसत नाही.ते यापुर्वी ही राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना तेव्हा देखील त्यांना यश आले नाही. उलट निष्ठवंतांना डावलून डॉ. इथापे यांना पद देऊन भाजपने नाराजी ओढावून घेतल्याचे बोलले जात आहे.

        दरम्यान, संगमनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकांचे काम उल्लेखनीय आहे. युवक स्वयंसेवकांनी सामाजिक कामातून संपूर्ण तालुक्याची मन जिंकली आहे. तर हिंदुत्ववादी विचारांचा संगमनेर तालुक्यावर मोठा पगडा आहे. पण याचा फायदा अद्याप भाजपला घेता आला नाही. आता महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे त्रिशंकु सरकार आले आणि सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची महत्वाची भुमिका राहिली. त्यामुळे भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष झाला. पण, भाजपकडून संगमनेरमध्ये आता कुठली राजकीय व्यूहरचना आखली जाईल हे येणारा काळच ठरवील.

      दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार अनेक दिवस सत्तेत होते. पण, ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये राष्ट्रवादीला कधी सत्तेत सहभागी करून घेतले नाही. राष्ट्रवादीला संगमनेरात नेहमी विरोधात ठेवले. त्यामुळे आजपर्यंतचा थोरतांना विरोधात असलेला पक्ष शिवसेना राज्यात सत्तेत आला पण संगमनेरात सत्तेचे वाटेकरी होता की नाही. की, राष्ट्रवादी सारखाच विरोध पहावा लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.