अकोल्यातील होमगार्ड कर्मचार्‍याने अल्पवयीन मुलीवर 20 वेळा बलात्कार केला.! दोन दिवस डांबून ठेवले.! तिघांवर गुन्हा, एकास अटक.!

 सार्वभौम (अकोले) :-

                  एका शालेय व अल्पवयीन मुलीवर होमगार्डमध्ये कार्यरत असणार्‍या एका कर्मचार्‍याने तब्बल 20 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 7 मार्च 2021 रोजी उघड झाली आहे. या तरुणाने पीडित मुलीस आढळा धरण, गर्दनीचा डोंगर, देवठाण आणि विठा अशा विविध ठिकाणी अत्याचार केले. तर एकावेळी ती गर्भवती राहीली असता तिचा गर्भपात करुन त्याची विल्हावाट लावली व त्यानंतर देखील अत्याचार केले असे संबंधित मुलीने सांगितले आहे. त्यामुळे, तिने दिलेल्या फियादीनुसार सोमनाथ रामभाऊ पथवे (रा. विठे, ता. अकोले) याच्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य दोघांवर अकोले पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमनाथ हा गेल्या काही वर्षापासून अकोले येथील गृहरक्षक दल (होमगार्ड) येथे कार्यरत आहे. त्याचे देवठाण परिसरात राहणार्‍या एका शालेय मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि सोमनाथ हा तिच्याशी कामय बोलु लागला. त्यानंतर तो दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी तिच्या घरी गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तो व्यक्त झाला खरा. मात्र, त्याने पुढे जाऊन या अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवत पळून जाण्यास साद घातली आणि त्याच दिवशी त्याने तिला स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर त्याच रात्री या तरुणाने तिच्या इच्छेविरुद्ध शरिर संबंध ठेवले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तिला तिच्या घरी नेवून सोडले.

दरम्यान, हा प्रकार पुढे वारंवार होत राहिला. एकमेकांचे फोनहून बोलणे सुरू होते. त्यानंतर अगदी तीन ते चार दिवसानंतर सोमनाथने थेट देवठाण गाठले आणि पीडित तरुणीला थेट आढळा धरणावर नेेले. तेथे एका ठिकाणी त्याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केले आणि कालांतराने पुन्हा घरी आणून सोडले. हा प्रकार येथेच थांबला नाही तर जानेवारी महिन्यात आरोपीने पीडित तरुणीला तिच्या घरुन घेऊन गर्दनीच्या डोंगरावर नेले आणि तेथे देखील तिच्यावर अत्याचार केले. माझे तुझ्यावर प्रेम आहे. योग्य वेळ आली की आपण लग्न करु असे म्हणत त्याने तिला वारंवार हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार येथेच थांबला नाही तर, पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिच्यावर वेळोवेळी 20 वेळा अत्याचार केले आहेत. या दरम्यानच्या काळात ती गर्भवती राहिली असता सोमनाथ पथवे याने तिला गर्भपात करण्याच्या पाच गोळ्या आणून दिल्या. तिच्याशी गोडीने बोलुन तिचा गर्भपात केला खरा. मात्र, त्यानंतर देखील आरोपीने तिला गेल्या महिन्यात गर्दनीच्या डोंगरावर नेवून तिच्यावर अत्याचार केले. हा असा प्रकार केव्हर चालणार आहे? असा प्रश्न पीडित अल्पवयीन तरुणीने केला असता त्याने तिच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. तिला घरी सोडवून तो विठ्याला गेला असता पीडित तरुणीने त्याच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही.

हा प्रकार कोठेतरी थांबावा यासाठी पीडित तरुणीने दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी थेट सोमनाथचे विठा येथील घर गाठले. त्यावेळी, जो काही प्रकार घडलेला होता त्याची सखोल माहिती पीडित तरुणीने त्याच्या घरच्यांना दिली. त्यावेळी त्याच्या घरच्यांनी पीडित मुलीस धक्काबुक्की करुन तिला एका घरात कोंडून घेतले. त्यानंतर दोन दिवस उलटले असता पीडित मुलगी म्हणली की, मला अंघोळ करायची आहे. तेव्हा ती बाहेर निघाली आणि प्रसंगावधान राखत तिने तेथून पळ काढला. स्वत:च्या घरी गेल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईस कथन केला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. यात सोमनाथ पथवे याच्यासह अन्य तिघांना आरोपी करण्यात आले आहे. तर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सोमनाथ यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, बातमी ही बातमी असते. मात्र, त्यापलिकडे, अल्पवयीन मुले मुली यांच्यात पहिले प्रेम संबंध होतात आणि नंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. त्यामुळे, त्यासाठी सामाजिक संघटना आणि शाळा, महाविद्यालय स्थरावर बाल लैंगिक अत्याचार, बाल विवाह, त्यांचे हक्क, संरक्षण अशा अनेक बाबींवर जागरुकता होणे आवश्यक आहे. विशेषत: अकोले व राजूर सारख्या ठिकाणी अशा गुन्ह्यांचे प्रमाण फार आहे. त्यासाठी, पोलीस प्रशासन, चाईल्ड लाईन, सेवाभावी संस्था आणि सुज्ञ समाजसेवक यांना खरोखर अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेणे गरजेचे आहे.