बेटा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.! हेच शब्द पोलिसांना बाळ बोठेपर्यंत घेऊन गेले.! हैद्राबादमध्ये चित्रपटाचा थरार, चौघांना अटक.!
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या केल्याप्रकरणी पत्रकार बाळ बोठे यास शनिवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास हैद्राबाद येथील बिलालनगर येथून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. गेल्या 102दिवसांपासून बाळ बोठे याचा शोध सुरू होता. बोठे हा पसार असताना त्यास कोणीकोणी साथ दिली, त्यास कोणी पैसे पुरविले, कोणी मोबाईल आणि अन्य मदत केली अशा चौघांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. जरे यांच्याकडून माझी बदनामी होईल या भितीपोटी बोठे याने जरे यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. तुर्तास बोठे यास अटक झाली हीच सर्वात मोठी बातमी आणि पोलिसांचे कौतुकास्पद काम म्हणावे लागेल. तर त्यास मदत करणार्या महेश वसंतराव तनपुरे (रा. सावेडी, अ. नगर) यास देखील पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पत्रकारीतेत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात स्वत:चा वेगळा असा ठसा उमटविणारा पत्रकार म्हणजे बाळ बोठे होय. आयुष्यात गडगंज संपत्ती आणि प्रतिष्ठा कमविली मात्र एका चुकीच्या निर्णयाने गगणाला ठेंगणे म्हणणारा माणूस स्वत: ठेंगणा होऊन बसला. रेखा जरे यांची हत्या करण्याची सुपारी त्याने का दिली? याचे कारण अनेक जाणकारांना माहिती असावे. मात्र, त्यावर बोठे स्वत: मोहर लावून ते पोलीस प्रशासनासमोर कथन करणार आहे. जरे यांचा खून झाल्यानंतर तिच्यामुळे बोठे याची बदनामी होणार होती असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे, हेच मुळ कारण सध्या पुढे आले आहे.
आता बाळ बोठे याने जरे यांची हत्या केल्यानंतर तो कोठे व कसा पसार झाला याबाबत अनेक चर्चा रंगल्या गेल्या. त्यामुळे, पोलिसांनी एक ना दोन तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणे अगदी पिंजून काढली. त्यात भटींडा, लुधियाना, रायपूर, भोपाळ, छत्तीसगड, पुणे, मुंबई, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणी बोठाचा शोध झाला. मात्र, एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याने पोलिसांना 102 दिवस चकवा दिला. या माध्यमातून एक मात्र लक्षात आले की, जिल्हा पोलिसांवर नको-नको ते आरोप करण्यात आले. मात्र, त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्यांचा सखोल तपास संयमाने चालुच ठेवला. त्यामुळे, उताविळ माध्यमे आणि आरोप करणार्यांकडे दुर्लक्ष करीत थेट रिझल्ट जनतेसमोर ठेवला आहे. यात पाटील म्हणले की, तपास सुरू होता. मात्र, त्याला नगरमधून काही माहिती पुरविली जात होती. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, बोठेला अटक करायची असेल तर त्यासाठी गोपनिय पथक तयार करुन ते रवाना करणे आवश्यक आहे. खरंतर खात्यातील काही व्यक्ती आणि नगरचे काही लोक यांच्यामुळे पाटील यांना मुंबईच्या यंत्रणेची मदत घ्यावी लागली. हे देखील दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे.
आज देखील अनेकांना प्रश्न पडला असेल की, बाळ बोठे कसा व कोठे पसार झाला. त्याला कोणीकोणी मदत केली याची सविस्तर माहित पुढे आली आहे. बाठे याने जी काही डिगरी घेतली होती. त्यात त्याची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. तो व्यक्ती हैद्राबादचा होता. त्याने यापुर्वी याच बिलालनगर परिसरात देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपींना अश्रय दिला होता. इतकेच काय! तर बोठे याने जो काही मोबाईल वापरला होता तो यापुर्वी एका गंभीर गुन्ह्यात पसार असणार्या आरोपीने वापरला होता. त्यामुळे, तो तत्काळ ट्रेस झाला. बोठे याने जोवर जामीन होत नाही तोवर महाराष्ट्रतील वेगवेगळ्या ठिकाणी आपला डेरा दाखल केला होता. मात्र, त्याच्या हुशारीपुढे पोलिसांनी हात टेकले होतेे.
दरम्यान, आपला जामिन होत नाही असे लक्षात येताच त्याने थेट हैद्राबाद येतील जनार्दन याच्याकडे धाव घेतली आणि दाढी वाढवून आपली वेशभूषा काही प्रमाणात बदली करुन बोठे एका वेगळ्या नावाने अपरिचित वास्तव्य करु लागला होता. इकडे नगर जिल्ह्यात पोलीसांवर आरोप प्रत्यारोप होत होते, पोलीस बोठे याला पाठीशी घालत आहेत, राजकीय लोकांचा त्याच्या डोक्यावर वरदहस्त आहे, तो नगरमध्येच आहे अशा नाना अफवा पसरत होत्या. तर दुसरीकडे जरे यांच्या कुटुंबियांचा देखील रोष वाढत चालला होता. त्यामुळे, बोठेला आणायचे कोठून असा मुद्दा पोलीस अधिक्षक पाटील यांच्यापुढे पडला होता. यात पाटील यांच्या लक्षात आले की, नगर जिल्ह्यातून बोठे याला माहिती पोहच होत आहे. त्यानंतर पाटील यांनी अगदी एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीची शक्कल लढविली आणि आज बोठेला अटक झाली.
खरंतर एक गेल्या दोन वर्षापुर्वी एक पिक्चर आला होता. त्याचे नाव होते मर्दीनी टु त्यात एका सराईत गुन्हेगाराला पोलीस अधिक्षक राणी मुखर्जी कशा पद्धतीने पकडते याचे फार सुंदर चित्रिकरण केले आहे. एखादा मोबाईल कसा ट्रेस केला जातो, कशा पद्धतीने लोकेशन घेतले जाते, नेटवर्कचा कसा वापर केला जातो, एखाद्या गजबजलेल्या परिसरात एखाद्या घरात काय चालु आहे. याचा माग कसा घेतला जातो असे तपासाचे उत्तम नमुने त्यात देखविले आहेत. अगदी असाच काहीसा तपास मनोज पाटील यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई, सोलापूर, हैद्राबाद सीआयडी, तेथील आयुक्त यांच्याशी संपर्क करून बाळ बोठे याचे लोकेशन घेतले आणि आज अखेर त्यास बेड्या ठोकण्यास पाटील यांना यश आले आहे.
जेव्हा बोठे हा हैद्राबाद येथे वास्तव्यास गेला तेव्हा त्याने एका हॉटेलात आपले शॉटर्र् नाव वापरुन रजिस्टर केले होते. त्या खोलीचा नंबर 109 होता. त्याची देखील चौकशी पाटील यांच्या पथकाने केली आहे. बोठे अशा ठिकाणी राहत होता की, त्या खोलीला बाहेरुन कुलूप होते. मात्र, त्याची मागिल बाजू पळ काढण्यास मोकळी होती. म्हणजे पुढून कोणी आले तर ती खोल बंद आहे असे भासले पाहिजे. मात्र, जेव्हा तीन दिवस पोलीस त्या परिसरात वेशांंतर करुन पहारा देत होते, त्याची देखील भनक बोठे याला लागली होती. त्यामुळे, त्याने तीन दिवसात पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर अनेक जागा बदलल्या. म्हणून तो भेटेल की नाही? याची देखील शंका उपस्थित करुन पोलीस हतबल झाले होते. मात्र, तरी देखील त्यांनी धिर सोडला नाही. 24 तासातील फक्त 2 तास झोप घेऊन पोलिसांनी अगदी डोळ्यात तेल घालुन शंका येईल तेथे घरझडत्या घेऊन बोठेचा तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या क्षणी इतक्या गजबजलेल्या ठिकाणी बोठे मिळून आला आणि पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. असे बोलले जाते की, बोठे याच्या मुलाचा गेल्या काही दिवसांपुर्वी वाढदिवस होता. तेव्हा ज्या फोनहून त्याने मुलास शुभेच्छा दिल्या. तोच मोबाईल नंबर पोलिसांना बोठेपर्यंत घेऊन गेला. आता तपासात पुढे अनेक बाबी निष्पन्न होणार आहेत.
काय आहे प्रकरण.!
नगर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी महिला रेखा जरे यांची पुण्याहून येताना पारनेर तालुक्यातील जातेवगाव घाटात हत्या करण्यात आली होती. केवळ वाहनाला कट मारला म्हणून अज्ञात व्यक्तींना त्यांची गाडी आडवून त्यांच्यावर धारधार हत्याराने वार केले असा कांगावा करण्यात आला होता. हा प्रकार सोमवार दि. 30 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला होता. मात्र, ही सुपारी देऊन हत्या घडवून आणली असे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पेलिसांनी यात ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. कोल्हार) व फिरोज राजू शेख (वय 26, रा. संकरापूर अंबी, ता. राहुरी) यांना अटक केलेली आहे. तर ही हत्या बाळ बोठे याच्या संगण्याहून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर 102 दिवस बाळ बोठे पसार होता.