पिचडांच्या त्या चुकीच्या ऐतिहासिक निर्णयाने अन्य पक्षांना आज सुगिचे दिवस.! मात्र, भविष्यात त्यांच्या त्या एक निर्णयाने सगळ्यांचे राजकारण संपवून जाईल.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                    पिचड कुटुंबाने भाजपत प्रवेश केला आणि तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे व काही अंशी राज्याचे राजकारण बदलुन गेले. त्या एका निर्णयाने येथे तालुक्यात आणि जिल्ह्यात फार अमोलाग्र बदल घडून गेला. इतकेच काय! तर येथील शिवसेना वगळता जवळजवळ सगळ्यात पक्षांना नव्याने पालवी फुटल्याचे पहायला मिळाले. येथील राष्ट्रवादी नव्याने रुजली गेली, काँग्रेसला नवे बळ मिळाले, ज्या भाजपने कधी तालुक्यात इतकी गुरगुर आणि उभारी घेतली नसती तितकी भरारी त्यांना त्या एका निर्णयामुळे प्राप्त झाली, कम्युनिष्टांना भलतेच महत्व प्राप्त झाले, मार्क्सवादी झोबून काम करताना दिसले तर कधी नव्हे त्या समाजवादी पक्षाने देखील तालुक्यात जंग-जंग पछाडले आणि आम्ही देखील तालुक्यात राजकीय परिघावर आहोत हे देखवून दिले. हे सर्व केवळ पिचड कुटुंब भाजपत दाखल झाले म्हणून इतका अमोलाग्र बदल येथे पहायला मिळाला आहे. खरंतर त्यांनी तालुक्याला राजकीय नवचैतन्य आणले खरे! मात्र, त्यांच्या या निर्णयाने त्यांनाच फार मोठा तोटा झाल्याचे तालुभार बोलले जात आहे. कारण, राजकीय पराभव तर झालाच. मात्र, सखे सोबती चालते झाले, जनतेच्या मनात भाऊ दैवत आहे. मात्र, भाऊ ज्या पक्षात आहे तो विचार कोणी स्विकारायला तयार नाही. त्यामुळे, त्यांनी येणार्‍या काळात काँग्रेस किंवा शिवसेना अन्यथा अपक्ष (स्वतंत्र पक्ष) अशा काही भुमिका घेतल्या तर मात्र त्यांच्या पुन्हा एका निर्णयाने येथे पुन्हा खूप काही बदल होऊ शकतो. त्यामुळे, भलेही ते सत्तेत नसुद्या परंतु राजकीय स्थित्यांतरे घडविण्याची ताकद अजून तरी तालुक्यात कोणामध्ये निर्माण झालेली नाही. अशा प्रकारची चर्चा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांमध्ये सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन 1952 सालापासून राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात काँग्रेसचे अधिपत्य सुरू होते. तेव्हा पहिले आमदार गोपाळराव भांगरे यांनी काँग्रेसची धुरू संभाळली होती. मात्र, त्यानंतर 1957 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आणि सामाजवादी पक्षाकडून तालुक्यातील नारायण नवाळी यांचा विजय झाला. तो काळ लोटला आणि येथे काँग्रेसच्या रुपाने पुन्हा यशवंतराव भांगरे यांनी 1962 साली काँग्रेसला पुनर्जीवी केले. मात्र, पाच वर्षानंतर येथे ना काँग्रेस ना समाजवादी येथे थेट कम्युनिष्टांची मोट बांधत 1967 साली बी. के. देशमुख आमदार झाले मात्र, त्यांनी त्यांचे यश टिकविता आले नाही. अखेर पुन्हा येथे काँग्रेस रुजविण्यात यशवंतराव भांगरे यांना यश आले ते थेट 1972 ते 1995 पर्यंत येथे काँग्रेसचा झेंडा अविरत फडकत राहीला. मात्र, या दरम्यानच्या काळात 1977 साली भांगरे व पिचड यांच्यातील रेड्डी काँग्रेस व आय काँग्रेस यात मुळ काँग्रेसचे पिचड यांचा भांगरे यांनी पराभव केला होता. त्यानंतर 1980 ते 1999 पर्यंत काँग्रेसच्या वतीने पिचड यांनी तालुक्यात दुसरा कोणाचा झेंडा फडकवू दिला नाही.

आता हा वरिल सर्व उहापोह मांडण्याचे कारण असे की, 1980 नंतर मधुकर पिचड यांनी तालुक्यात कोणाला हस्तक्षेप करु दिला नाही. जिल्ह्यात बी.जे.खताळ, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब विखे, बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे, आण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, कोल्हे-काळे, बबनराव पाचपुते, दादा कळमकर, अरुण जगताप यांच्यासह अन्य मातब्बर नेत्यांसोबत कामे केली. मात्र, जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी पिचडांच्या राजकीय दादागिरीपुढे कधी कोणाचे काही चालले नाही. ते बोले तसा जिल्हा चाले एवढेच नव्हे तर पक्षासह राज्यही चालविण्याची मुभा त्यांना पवारांनी दिली होती. मात्र, भाजप हाच एक निर्णय त्यांच्या भुतकाळातील अनेक निर्णयांवर पाणी सोडून जाताना दिसत आहे. म्हणजे, फक्त एक उदा. सांगायचे झाले तर जिल्हा बँकेत कोण बसवायचे याचा निर्णय स्वत: पिचड घेत होते. तेव्हा थोरात आणि पिचड यांच्यापुढे कोणाचा ब्र देखील निघत नव्हता. या व्यतिरिक्त अजित दादा नाराज झाले तरी ते पिचडांच्या शब्दाला छेद देतील इतका अधिकार पवार साहेबांमुळे त्यांच्याकडे नव्हता. मात्र, आता चित्र काय आहे? जेथे बाप म्हणून काम केले तेथेच कोणी त्यांच्या मुलाचे पालकत्व घ्यायला तयार नाही.! हे कशाचे द्योतक आहे? तर बेशक, त्या एका निर्णयाचे.!

  पुढे 1999 साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पिचड देखील काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले. तेव्हापासून तालुक्यात काँग्रेसच्या झेंड्याने अकोल्याचे प्रतिनिधित्व विधानसभेत केले नाही. मात्र, त्यानंतर जर कधी आता वैभव पिचड यांना काँग्रेसमध्ये घेण्यात मधुभाऊ नवले यांना यश आले आणि ना. बाळासाहेब थोरात यांनी ग्रीन सिग्नल दिला तर मात्र त्यांच्या या एका निर्णयाने तालुक्यात पुन्हा वेगळेच वातावरण पहायला मिळेल. इतकेच काय! तर 1952, 62, 72, 77, 80, 85, 90, 95 आणि त्यानंतर थेट 2024 मध्ये अकोले तालुक्यात काँग्रेसचा आमदार होऊ शकतो. अर्थात हे स्थित्यांतर घडविण्याची ताकद आता फक्त एकतर डॉ. किरण लहामटे करु शकतात तर दुसरा व्यक्ती म्हणजे वैभव पिचड. त्यामुळे, येणार्‍या काळात तालुक्याला फार काही वेगळे चित्र पहायला मिळाणार आहे. यात महत्वाचे म्हणजे तेव्हा पवार कुटुंब देखील तालुक्यात लक्ष घालणार नाही. कारण, त्यांना पिचडांना धडा शिकवायचा होता तो झाला. त्यानंतर त्यांचा फारसा काही हस्तक्षेप नसतो. हे आपण श्रीगोंदा आणि येणार्‍या काळात सातार्‍यात देखील पहायला मिळेल.

आता पिचड कुटुंबाच्या एका निर्णयामुळे तालुक्यात काय बदल झाले यावर जर ओझरती नजर फिरविली तर लक्षात येते की, 1999 ते 2019 पर्यंत येथील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला पिचडांच्या राजकीय कार्यकीर्दीत कोणी धक्का लावू शकले नाही. उलट त्यांनी येथील काँग्रेस, कम्युनिष्ट, भाजप, रिपाई, शिवसेना यांच्यातील नेत्यांनी फोडून हे पक्ष खिळखिळे करण्याचे काम केले. तर काहींनी त्यांच्याच पक्षात राहून स्वत:च्या स्वार्थासाठी पिचडांशी हात मिळविले. त्यामुळे, येथे त्यांनी राष्ट्रवादी इतका मजबुत केला की, खुद्द त्यांचा देखील पराभव होऊ शकेल इतका. इतके नि:स्वार्थी पक्षप्रेम कधी कोणाचे असू शकते का? आज जे कोणी निष्ठावंत म्हणून छात्या बडवत आहेत हे त्यांचे योगदान नव्हे तर पक्ष तळागाळापर्यंत नेत निष्ठावंत घडविण्याचे काम पिचडांनी केले आहे. आज काही लोक पदांनी गोचीड होऊन आयत्या पिठावर रेघोट्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष असा आहे. तो केवळ पवार साहेबांच्या नावावर चालतो, बाकी, बैलगाडीखाली चालणार्‍यांची संख्या येथे काही कमी नाही.

या सन 2019 च्या निवडणुकीनंतर पिचड कुटुंबाने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला खरा. मात्र, त्यांनी अनेक छोट्या मोठ्या पक्षांना जीवदान दिले आहे. कारण, 1957 मध्ये तालुक्यात समाजवादी पक्ष बाप होता. मात्र, कालांतराने त्याचे वलय कमी होत गेले. येथे त्याकाळी, देवठाणचे साथी अमृतभाई मेहता, भुमीगतच्या काळात अच्युत पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन,   भास्कर नाना दुर्वे यांच्यासारख्या नेत्यांनी येथे काम केले आहे. तर पटवर्धन इतके अभ्यासू होते की, त्यांना इंदिरा गांधी यांच्याशी विवाहबद्ध होण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, काळाच्या ओघात हा पक्ष कधी तालुक्याच्या पिक्चरमध्ये चमकला नाही. मात्र, यावेळी विनयजी सावंत यांनी एकास एक उमेदवारीस फार मोठे योगदान दिले आहे. तर त्यांच्या रुपाने येथे समाजवादी संलग्न म्हणून का होईल तालुक्याचा आमदार होऊ शकला. हे त्यांच्यासारख्या पुरोगामी विचारांचे संयमाने का होईना, परंतु फार मोठे यश आहे. त्यांच्याच सोबत मार्क्सवादी पक्षाचे देखील मोठे योगदान राष्ट्रवादीच्या यशात आहे. कारण, डॉ. अजित नवले यांचा तुर्रमखान हा शब्द आजही परिवर्तनाची मशाला पेटविण्यासाठी तालुक्यातील गावागावात गुंजत आहे.

एकेकाळी आठ वेळा येथे काँग्रेसचा आमदार होऊन गेला आहे. मात्र, त्यानंतर 1999 ला जी खिळ बसली ती आजवर कधी निघालीच नाही. 2004 च्या निवडणुकीत सतिष भांगरे यांचा चेहरा तेव्हा पुढे आला होता. मात्र, त्यांनी नंतर शिवसेनेत उडी मारली. तर कालांतराने येथील जे कम्युनिष्ट आणि समाजवादी होते. त्यांनी देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात दादापाटील वाकचौरे आणि मधुभाऊ नवले यांचा येथे प्रमुख्याने उल्लेख करावा लागेल. म्हणजे, एकीकडे मधुभाऊ नवले यांनी 2006 साली कम्युनिष्ट सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 2016 साली पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी, तालुक्यात काँग्रेसचे जे काही वातावरण होते. ते पुर्णत: अस्पष्ट झाले होते. त्यामुळे, येथे काँग्रेस होती. मात्र, फक्त नावाला तिचे अस्तित्व उरले होते. परंतु, पिचड यांनी भाजपत प्रवेश केला आणि त्या अस्वस्थतेपोटी नवले यांनी पुन्हा घरवापसी करीत ना. बाळासाहेब थोरात यांच्या अश्रयाला आपले अस्तित्व विलिन केले. त्यामुळे, काल एकदम स्तब्ध झालेली काँग्रेस तालुक्यात पुन्हा सक्रिय झाली. अर्थात हे देखील घडले ते केवळ पिचड यांच्या एका निर्णयामुळेच.!

  यात काही झाले तरी तालुक्यात जुने जे कोणी कम्युनिष्ट होते त्यातील काही व्यक्ती पक्षबदल करुन गेल्या आहे. मात्र, जुनी कम्युनिष्ट चळवळ म्हटले तरी राज्याला तेव्हा घाम फुटत होता. त्यात बुवासाहेब नवले, धर्मा भांगरे, ठाकुरभाई, सक्रु बुधा मेंगाळ, विठ्ठल नवाळी, रामदास एकमाने, मुंजुळा फापाळे यांनी तर भाऊसाहेब हांडे यांचा तेव्हा लोकल बोर्डावर पराभव केला होता. माजी आमदार बी. के देशमुख, बुवासाहेब नवले, मुरलीमास्तर नवले, संतु धुमाळ, डी. सावंत, अ‍ॅड. शांताराम वाळुंज, कारभारी उगले, मिनानाथ पांडे, वसंत मनकर, मधुभाऊ नवले, लक्ष्मण शिंगाडे, किसन एखंडे, लक्ष्मण नवले, विलास नवले, आर. डी. चौधरी, किसन हांडे, रघुनाथ मुंडे, पांडुरंग नवले, कॉलेजच्या उभारनीत मोठे योगदान असणारे डॉ. बी. जी बंगाळ, टी. बी नवले, रावसाहेब शेटे, मारुती नाईकवाडी, भाऊसाहेब नवले, ओमकार नवाळी अशा अनेकांनी येथे कम्युनिष्ट पक्ष उभा करताना कमी अधिक योगदान दिले आहे. मात्र, आज या पक्षाची काय आवस्था आहे. यात कॉ. कारभारी उगले आणि अ‍ॅड. शांताराम वाळुंज यांच्यासारखी निष्ठावंत सोडले तर अगदी पक्षात अल्पसंख्या दिसून येते. मात्र, तरी देखील याच कम्युनिष्टांनी पिचड यांच्या विरोधात जम कर प्रचार केला. त्यामुळे, काल प्रबळ असणारा पक्ष आज दुबळा झाला तरी त्याचे अस्तित्व त्यांनी परिवर्तनाच्या लाटेत दाखवून दिले आहे. या व्यतीरिक्त भाजप म्हणजे येथे अशोक भांगरे यांनी 2014 साली पर्याय म्हणून निवडलेला पक्ष आज पिचड कुटुंबाने पुन्हा उर्जीत अवस्थेत आणून ठेवला आहे. म्हणजे हे सर्व राजकीय बदल पिचड कुटुंबाच्या एका निर्णयामुळे झाले आहेत. येणार्‍या काळात ते पुन्हा एखादा खडा मारतील आणि एकाच दगडात अनेक पक्षी त्याच्या निशान्याखाली येतील अशा दिवसांची वाट अनेकजण पाहत आहेत. तो दिवस पाहण्यासाठी आता किती दिवस लागतील याच आशेने लोक चातकाप्रमाणे वाट पाहून आहे.