अकोल्यातील महिलेचा संगमनेरात खून, ज्याने माहिती दिली तोच निघाला खुनी.! दोन तासात ठोकल्या बेड्या.!
सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-
अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथून संगमनेर तालुक्यातील मल्हारवाडी कर्हे शिवारात उपजिविकेसाठी गेलेल्या महिलेचा अगदी किरकोळ कारणाहून निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि. 22 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारस घडला. महिलेची हत्या केल्यानंतर ज्याने हा प्रकार केला, त्यानेच पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिस श्वानासह काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, पोलिसांच्या श्वानाने थेट माहिती देणार्या व्यक्तीवरच हल्ला चढविला आणि त्या क्षणी आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. यात मंगला वामन पथवे (वय 45, रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले) ही महिला मयत झाली असून राजू शंकर कातोरे (रा. मल्हारवाडी कर्हे शिवार, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगला वामन पथवे ही महिला राजू शंकर कातोरे याच्यासोबत संगमनेर तालुक्यातील रामदास म्हतारबा सानप यांच्या शेतात वाटेकरी म्हणून शेती करीत होते. मात्र, कातोरे हा व्यसनाधीन असल्यामुळे, त्याचे आणि मंगला पथवे यांचे कधी जमले नाही. ती शेतात काम करीत होती तर कातोरे हा फारसे काही काम करीत नसे. सोमवारी हा बहाद्दर शेतात गेला असता त्याचे मंगला यांच्यासोबत किरकोळ वाद झाले होते. त्यावेळी रागाच्या तडाख्यात याने मंगला यांना ठार मारले आणि भाऊपाटील शंकर सानप यांच्या शेतात नेवून टाकले. हा प्रकार कोणी केला हे माहित न होण्यासाठी कातोरे यांने काही पुरावे देखील मिटविण्याचा प्रकार केला.
दरम्यान, हा खून आपण नव्हे तर अन्य कोणीतरी केला आहे असे भासवविण्यासाठी त्याने स्वत: नगरला नियंत्रण कक्षेत फोन करुन माहिती दिली की, मंगला पथवे या महिलेला कोणीतरी ठार मारुन टाकले आहे. तिचा मृतदेह भाऊपाटील शंकर सानप यांच्या शेतात पडलेला आहे. क्षणाचाही विलंब न करता पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत श्वानाची टिम देखील पाचरण करण्यात आली. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशयीत सर्व बाबी तपासण्यात आल्या, त्यावेळी श्वानाने राजू शंकर कातोरे याच्याकडे शंकेची नजर केली आणि पोलीस गुन्ह्याची उकल करण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान, श्वानाच्या संशयानंतर पोलिसांनी सर्व बाजू तपासून पाहिल्या. कातोरे यास गुन्हाबाबत विचारणा केली असता तो पहिल्यांदा नाटकबुल आला, मात्र पोलिसांचा खाक्या आणि काही संशयीत गोष्टींचे प्रश्न त्यास विचारले असता तो पोपटासारखा बोलता झाला. अगदी किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे, रागाच्या भरात मीच मंगला पथवे हिचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत. पवार यांच्या टिमने अवघ्या 2 तासात या गुन्ह्याची उकल केली आहे. त्यामुळे, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांनी पवार यांच्यासह वि.रू खंडीझोड, इस्माईल शेख, पारधी, ज्योती दहातोंडे, अनिल जाधव, बाबा खेडकर, राजेंद्र घोलप, ओंकार शेंगाळ, वंदना वाकचौरे व नगर येथील श्वान पथक यांचे अभिनंदन केले आहे.
खून करून अर्धवट जाळले.!
तर अकोले तालुक्यातील येसरठाव येथे एका 20 ते 30 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. खुन झाल्यानंतर मयत व्यक्तीची ओळख पटू नये यासाठी आरोपीने खून केलेल्या तरुणाला जाळुन टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सरपन कमी पडल्यामुळे तो मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहून गेला. हा प्रकार रविवार दि. 21 मार्च 2021 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. यात अकोले पोलिसांना अद्याप मयत झालेल्या व्यक्तीचे नाव देखील समजलेले नाही. तर आरोपीचा शोध अजून होणे बाकी आहे. मयत व्यक्तीच्या गळात सोन्याचे ओम पान असून त्याला कोणी ओळखत असेल किंवा आपल्या आवती भोवती कोणी बेपत्ता असल्यास त्याची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे. जो कोणी माहिती देईल त्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल अशा शाश्वती पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली आहे. त्यामुळे, आता तीन दिवस झाले तरी या गुन्ह्यात काही धागेदोरे हाती लागले नसल्याने हा गुन्हा पोलिसांसाठी फार मोठा चॅलेेंजींग ठरणार आहे.