अकोल्यात महाविकास आघाडीतून शिवसेना-काँग्रेसचा बंड.! तुमच्या नाकावर टिचून 18 जागा लढवू.! आघाडीत बिघाडी.!
सार्वभौम (अकोले) :-
राज्यात भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांनी एक अनोखी युती करुन सत्तेचे नविन समिकरण आखले आहे. जर येणार्या काळात देखील भाजपला सत्तेपासून रोखायचे असेल तर तालुका पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महाविकास आघाडी करण्याचे तोंडी आदेश ज्याच्या पक्षप्रमुखांनी दिली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी तालुक्यांमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे, वेगवेगळे पक्ष बंडाचा झेंडा हाती घेऊन एकला चलो रे! चा नारा देऊ लागले आहेत. हेच चित्र अकोले तालुक्यात शिवसेनेच्या बाबत दिसत आहे. येथे राष्ट्रवादीचा बोलबाला असून त्यांच्याकडून काँग्रेस व शिवसेनेला सन्मानाची वागणुक मिळत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे, तुर्तास तरी शिवसेनेने राष्ट्रवादीला एकप्रकारे धमकीच दिली आहे. जर, आम्हाला दुसावट्याची वागणूक द्याल तर तुमच्यावाचून आमचे काही एक आडले नाही. आम्ही नगरपंचायतीच्या 18 जागा स्वबळावर लढण्यास तयार आहोत. त्यामुळे, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी ज्या पद्धतीने शिवसेनेची बदनामी करीत आहेत, ती थांबवावी अन्यथा याचे प्रतिउत्तर येणार्या काळात शिवसेना नक्की देईल अशी प्रतिक्रिया नितीन नाईकवाडी यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जसजशी अकोले नगरपंचायत जवळ येत चालली आहे. तसतसे येथील राजकीय वातावरण तापत चालले आहे. 18 जागेंपैकी कोणी कोठे लढायचे? कोणा-कोणाला तिकीट द्यायचे, याबाबत फार संदिग्धता आहे. आता येणार्या काळात राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते भाजपत जाणार आहे. तर शिवसेनेचे देखील भाजप आणि राष्ट्रवादीत जाण्याच्या वाटेवर आहे. दुसरीकडे येथे मधुभाऊ नवले यांच्या रुपाने काँग्रेसला नवसंजिवणी मिळाली असून त्यांचे स्वत:चे अस्तित्व आणि पक्षाची ताकद ही चांगली आहे. आता काँग्रेसमध्ये भलेही 18 जागा निवडून आणण्याचे बळ नसले. पण, आपले उमेदवार उभे करुन विरोधकांच्या 18 जागा पाडण्याचे बळ त्यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीने काँग्रेसकडे दुर्लक्ष केले तर त्याचा फटका किती बसू शकतो याचे त्यांनीच आत्मपरिक्षण करणे आवश्यक ठरणार आहे. कारण, दहा सहा वर्षापुर्वी बहुजन वंचित आघाडीचा एकही आमदार आला नाही. मात्र, त्यांनी आघाडीचे 49 उमेदवार पाडले होते आणि त्याचाच फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे, वेळ आहे तोच ह्या गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे बर्या.! अन्यथा गाडी निघुन गेल्यानंतर हात करण्याची सवय राष्ट्रवादीत आजकाल रुढ झाली आहे. याचे उत्तम उदा. म्हणजे, जेव्हा मधुभाऊ नवले स्वत:हून राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक होते. तेव्हा पक्षातील काहींनी मान घेऊन उड्या हानल्या. मात्र, वेळ निघून गेल्यानंतर कोणी दादांना भेटतय तर कोणी थोरात साहेबांना.! त्यामुळे, दुर्घटनासे सावधानी भली.! हे कळले म्हणजे झालं.
आता शिवसेनेबाबत स्थानिक राष्ट्रवादीने नेहमीच दुसावट्याची भावना ठेवल्याचे बोलले जाते. त्याची कारणे देखील काही आहेतच. कारण, शिवसेनेचे काही नेते भाऊंना तर जिल्हा बँकेच्या संचालकांना फितूर असल्याची टिका होते. स्वत:चे भागले म्हणजे पुरे. मात्र, आता ही वेळ तशी नाही. आता तालुक्याचे राजकारण बदलले आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीला म्हणजे विशेषत: डॉ. किरण लहामटे यांना शिवसैनिकांना विश्वासात घेणे भाग पडणार आहे. कारण, त्यांच्या आमदारकीला शिवबंधनावर हात ठेऊन त्यांनी डॉक्टरांसाठी जंग पछाडले होते. म्हणून 58 हजारांचे लिड ते घेऊ शकले. अन्यथा शिवसेनेचे तालुक्यात 48 हजार ते 50 हजार एक गठ्ठा मतदान आहे. त्याची घट होऊन ते मतदान राष्ट्रवादीला नव्हे तर डॉक्टरांना झाले आहे. त्यामुळे, त्यांनी शिवसैनिकांकडे दुर्लक्ष केले तर येणार्या काळात त्यांच्यासाठी मतांची गोळाबेरीज करणे फार कठीण जाऊ शकते असे बोलले जात आहे.
दरम्यान, अकोल्यात भाजप सोडा, पण वैभव पिचड यांचे एकहाती वर्चस्व संपुष्टात आणायचे असेल तर जसे राज्यात झाले तसेच तालुक्यात करावे लागणार आहे. येथे शिवसेना, भाजप, काँग्रेस व मित्रपक्ष यांना सोबत घेतले तरच सत्ता काबीज करता येणार आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे पारंपारिक विरोधक म्हणून विरोधी बाकावर बसावे लागेल. अर्थातच एक स्पष्टच सांगायचे झाले तर, अनेकांनी मिळून एकत्र येत बलाढ्य पिचड कुटुंबाला पराभूत करण्याचा इतिहास रचला आहे. त्यामुळे, जर त्याच-त्याच चुका केल्या आणि महाविकास आघाडीचे विभाजन झाले तर नक्कीच नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलेल यात तिळमात्र शंका नाही. हे चित्र जर आजच बदलायचे असेल तर राष्ट्रवादीच्या वाच्चाळ विरांना मुसके घातले पाहिजे. कोणी आपल्या बोलल्याने दुखावले जाणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे, महाविकास आघाडीतील प्रत्येक व्यक्ती व कार्यकर्ता आपला आहे. हे समजून एकोपा निर्माण केला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने येथे राष्ट्रवादीत असणारे निष्ठावंत आणि जेष्ठ नेते तसेच पदाधिकारी हे बैठकांवर बैठका घेऊन बघ्याचीच भुमिका घेताना दिसत आहे. याचे तोटे येणारा काळच ठरवू शकतो.
आता यात महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा तालुक्यात विधानसभेच्या वेळी एकास एक करण्याची वेळ आली तेव्हा डॉ. अजित नवले यांनी माकप म्हणून दिवसरात्र एक केली होती. त्यांनी सातेवाडी टारगेट करुन आपला ढेरा तिकडे दाखल केला होता. मात्र, ती पोटनिवडणुक लागली नाही. अर्थात त्यांच्या कष्टाला अद्याप कोणत्याही प्रकारचे फलित डॉ. लहामटे यांनी दिल्याचे राजकीय वर्तुळात तरी दिसत नाही. त्यामुळे, सामान्य जनतेचा आवाज घेऊन रस्त्यावर लढाई केली आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचारी आणि सामान्य जनता यांचा कौल माकपकडे असणार आहे. त्यामुळे, ऐनवेळी घसा फाडून तन-मन-धनाने रस्त्यावर उतरणार्या माकपचा विचार येथे कोणी करणार आहे की नाही? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, यात डॉ. नवले हे स्वत: लक्ष घालुन जे हक्काचे असून मागून मिळत नाही. ते हिसकावून घेऊ शकतात इतकी ताकद त्या व्यक्तीमत्वात आहे. त्यामुळे, त्याचा देखील विचार महाविकास आघाडीला करावा लागणार आहे.
एकंदर रात्र झाली थोडी आणि सोंग झालेत फार, अशा प्रकारची परिस्थिती नगरपंचायतीच्या निवडणुकीत झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे, 18 जागांसाठी आठशे अर्ज दाखल होणार आहे. यात महाविकास आघाडी झाली तर कोणाला द्यायचे आणि कोणाला मनवायचे? असा पेच निर्माण होणार आहे. त्यातल्या त्यात प्रस्तापित नगरसेवकांच्या वार्डरचनेत बदल झाल्यामुळे अनेकांच्या डोक्याला मुंग्या लागल्या आहेत. तर दुसरीकडे येथे आरक्षण नेमके कोणते निघते यावर बरेच काही अवलंबून आहे. म्हणून तर एससी व एसटीचे सिट आपल्याच पारड्यात आले पाहिजे यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे. तर एससी व एसटीचे उमेदवार नेमकी आपण कोणाकडून लढायचे याची चाचपणी करीत आहेत. त्यामुळे, निवडणुकीच्या ऐन तोंडावर तालुक्यात राजकीय भुकंप होणार. यात तिळमात्र शंका नाही. आता काही झाले तरी राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेसला सन्मानाची वागणुक देऊन विश्वासात घेतले तर पुन्हा परिवर्तन शक्य आहे. अन्यथा....
भाग 1 क्रमाश: