भाजप म्हणून नव्हे.! भाऊ म्हणून ग्रामपंचायती येतील.! पण, आमदारकी अशक्य.! राष्ट्रवादीची तारंबळच.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   अकोले तालुक्यात सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे कट्टर समर्थक मधुकार पिचड व राष्ट्रवादीचे मा.आ. वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केला आणि तालुक्यात सर्वात मोठे व ऐतिहासिक राजकीय परिवर्तन घडले. त्याचा तोटा असा झाला की, 1977 वगळता 1980 ते 2019 पर्यंत पिचड कुटुंबाच्या विजयी परंपरेला छेद पडला आणि येथे राष्ट्रवादीचा आमदार निवडुन आला. त्याचे कारण असे होते की, हा तालुका पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे येथे भाजप सारखा पक्ष बळजबरीने कोणी जनतेच्या गळी उतरवित असेल तर येथील जनता ते कदापी सहन करुन घेणार नाही. हे निवडणुकीत प्रत्येकाने सिद्ध करुन दिले. याचा प्रचिती पिचड कुटुंबाला देखील आली आहे. त्यामुळे, आता त्यांनी येणार्‍या अडिच ते तीन वर्षात योग्यतो विचार करावा. एकतर स्वतंत्र पक्ष काढावा अन्यथा जसे त्यांच्या काही सहकार्‍यांनी पर्यायी मार्ग (पक्ष) निवडला तसा निर्णय होणे अनेकांना अपेक्षित आहे. हे असे असले तरी आज सुरू झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ते स्वत:ला आजमावून पाहणार आहेत. मात्र, हे यश त्यांना विधानसभेत फारसे साजेसे नसले. हे देखील त्यांनी लक्षात घेतले पाहिजे असे मत राजकीय विश्लेषकांनी रोखठोक सार्वभौमशी व्यक्त केले आहे.

विधानसभेनंतर आता अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी, भाजप, मार्क्सवादी, रिपाई व काँग्रेस हे आपापली ताकद आजमावणार आहेत. मात्र, यात खरी कसोटी भाजप व राष्ट्रवादी यांच्यात लागली आहे. कारण, हाच खरा विधानसभेच्या आखाड्याचा पाया आहेे. गावागावांचे बुथ हे तेथील प्रस्तापित कार्यकर्ते संभाळत असतात. त्यामुळे, हा पाया पक्का करण्यासाठी प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. यात सर्वात महत्वाची बाब अशी की, जर वैभव पिचड यांना जर पुढील विजयाची माला गळ्यात घालायची असेल तर त्यांनी ग्रामपंचायतींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण, सन 2019 मध्ये त्यांच्याकडे जवळजवळ 85 टक्के ग्रामपंचायती होत्या. मात्र, झाले काय? पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे, आत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षपरत्वे नव्हे तर व्यक्तीपरत्वे राजकारण केले पाहिजे अशी शक्कल लढविली पाहिजे. अन्यथा आजकाल लोक भाऊ-भाऊ करता आणि वेळेला धोका देतात (लाभार्थी वगळता) हेच चित्र दिसून आले आहे.

अर्थात, पिचड यांचा भाजप प्रवेश व्यक्तीश: त्यांना मान्य असेल. तो का? याची कारणे देखील त्यांनाच ज्ञात आहे. मात्र, भाजप हा तालुक्यातील जनतेच्या मनातील पक्ष मुळीच होऊ एकत नाही. त्यामुळे, त्यांना जातीनिहाय देखील किती साथ लाभली याचे देखील त्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे. कारण, याचे उत्तम उदा. द्यायचे झाले तर जसे भाजपला आरएसएसचा कार्यकर्ता अगदी झोपेत देखील डावलु शकत नाही. तसेच काही मुस्लिम बांधव भाजपच्या विचारधारेला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत स्विकारु शकत नाही. यात काही अपवाद असतीलही. मात्र, हे वास्तव कोणी नाकारु शकत काही. त्यामुळे, लोकांची मानसिकता लक्षात घेता त्यांना आता वेगळा विचार करावा लागणार आहे.

खरंतर ग्रामपंचायतींचे यश हे विधानसभेला पुर्णत: पुरक असतेच असे नाही. अन्यथा वैभव पिचड यांचा पराभव झालाच नसता. गावपातळीचे राजकारण हे राज्याच्या राजकीय वातावरणानुसार रुप घेत असते. याची प्रचिती 2019 मध्ये राज्यातील प्रत्येक गावागावात पहायला मिळाली आहे. त्यामुळे, उद्याच्या आमदारकीचा विचार करताना पिचड यांना स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासह आणखी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहे. येणार्‍या काळात ज्या काही निवडणुका आहे त्या पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून भाजपच्या गोटातून होणार आहे. तर राष्ट्रवादीत व्यक्ती म्हणून नव्हे तर पक्ष म्हणून निवडणुका होणार आहे. कारण, 40 वर्षात पिचड यांनी भरपुर गोतावळा आणि प्रस्तान उभे केले आहे. तर डॉ. लहामटे यांची तालुक्यात नव्याने उभारणी सुरू आहे. ते एक राष्ट्रवादीचे नवा चेहरा असल्याने येथे पक्ष फार महत्वाची भुमिका बजावतो. तर त्या तुलनेत भाजप फार महत्वाचा नसून भाऊ आणि साहेब हे नाव महत्वाची भुमिका बजावते. किमान अकोले तालुक्यात तरी हेच गणित लागू पडते.

आज 41 ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहे. त्यासाठी भाजपचे लोक बहुतांशी ग्रामपंचायतींवर आपली सत्ता कायम राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. तर, त्या तुलनेत राष्ट्रवादीची टिम तोडकी दिसून येत आहे. कार्यकर्ते सक्रिय आहेत. मात्र, ते ज्याचेत्याचे गाव संभाळू लागले आहेत. तर मोठे पदाधिकारी देखील स्वत:च्या गावात कंबर कसताना दिसून येत आहेत. त्यामुळे, अशा वेळी अशोक भांगरे यांच्यासारखा दिग्गज नेता जेव्हा प्रकर्षाने गावा-गावात जाईल तेव्हा मात्र, एक वेगळीच धार मतदानाला दिसून येईल. तर यात आणखी एक महत्वाची बाजु म्हणजे यावेळी खुद्द अमित भांगरे यांनी देखील निवडणुकीत उडी घेणे अनेकांना अपेक्षित आहे. अर्थात भांगरे यांनी स्वत:ची फार मोठी ताकद आहे. ग्रामीण आदिवासी भागात त्यांचा अनेक गावांत दबदबा असून मिनीमंत्रालये त्यांच्या ताब्यात आहेत. मात्र, ते व त्यांचे सुपुत्र तालुक्यात सक्रिय झाल्यास भाजपचं कमळ फुलताना देखील त्याला फार काही कळा सोसाव्य लागतील यात काही शंका नाही. 

ते दादा गेले कोण्या गावा?

विधानसभा संपली आणि वैभव पिचड जेव्हा वैराग्य धारण करुन बसल्याचे बोलले जात होते. तेव्हा, जय देशमुख यांचा तालुक्यात वादळी वार्‍यासारखा दौरा सुरू होता. तरुणांचे संगठण बांधून त्यांनी मोठी फौज तयार केली होती. त्यामुळे, उद्या ते एखाद्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की काय? असा प्रश्न प्रत्येकजण विचारत होते. मात्र, आज खर्‍या अर्थाने निवडणुकीचा धुरळा उडला आहे. असे असताना त्यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना बळ देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना कोणी दमबाजी करीत असेल तर त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणे अशा भुमिकेत जय देशमुख असायला हवे होते. कारण, दोन्ही साहेबांच्या प्रकृत्या बिघाडल्या असून कार्यकर्ते स्वबळावर विरोधकांशी दोन हात करताना दिसत आहेत. त्यामुळे, वेळेला केळं आणि वनवासाला शिताफळं अशी गंमत न होता त्यांनी मैदानात उतरणे गरजेचे आहे असे अनेकांना वाटते आहे.