तोतया पोलिसांनी हातचलाखीने दागिने लुटले, गांजाचा बहाणा करुन हटकले बोचकून पळ काढला.!
सार्वभौम (संगमनेर) :- पोलीस असल्याची बतावणी करुन आम्ही येथे गांजा पकडला असून त्याची चेकींग चालु आहे. तुमच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवा असे म्हणत एका सेवानिवृत्त अधिकार्याचे चोरट्यांनी 56 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना बुधवार दि. 6 जानेवारी 2021 रोजी भर दिवसा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारभारी पुजीराम पानसरे (रा. गोविंद नगर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारभारी पानसरे हे संगमनेर शहरातील शेतकी संघाच्या गेटवरुन बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चालले होते. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी इसमांनी अटकविले आणि म्हणाले की, आम्ही पोलीस आहोत, काल रात्री आम्ही गांजा पकडला असून त्यांची चेकींग चालु आहे. त्यामुळे, तुमच्या आंगावर असणारे सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तु काढून पिशवित टाका. त्यानंतर आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू काढून पिशवित टाकल्या.
दरम्यान, त्यांनी आमच्याकडील पिशवी हातात घेऊन तपासले व काही वेळानंतर ती पुन्हा आमच्या हातात दिली. तेव्हा काही काळ घडलेला प्रकार आमच्या लक्षात आला नाही. मात्र, काही वेळातच संबंधित व्यक्तींनी या पिशवितील दागिने काढून घेतल्याचे पानसरे यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता दोन्ही आरोपींनी धुम ठोकली. काही लोकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा पत्ता लागली नाही. त्यानंतर पानसरे यांनी पोलीस ठाणे गाठवून गुन्हा दाखल केला आहे. यात सोन्याची चैन, दोन सोन्याच्या आंगठ्या असा 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे.
दरम्यान, पोलीस असल्याचे सांगून आजकाल लुटीचे प्रमाण वाढत आहे. नगर शहर, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा, नेवासा अशा मोठ्या शहरांमध्येच असे प्रकार पहायला मिळत आहे. त्यामुळे, जर कोणी स्वत:ला पोलीस सांगून अशा पद्धतीने हटकवित असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. अशा प्रकारचा संशय वाटल्यास त्वरीत जवळ असणार्या व्यक्तींना जवळ बोलवा, संबंधित व्यक्ती पोलीस सांगत असेल तर त्याच्याकडे पाहुन संशय वाटल्यास त्याचे ओळखपत्र मागा, जर अंगावरील दागिने काढले असतील तर ते कोणाच्या ताब्यात देऊ नका. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी दाग दागिने घालुन जाणे टाळा, घातलेच तर ते सुस्थितीत अंगावरील पदराने किंवा स्कार्पने झाकून ठेवा. अशा प्रकारचे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे.