अर्रर्र.! 20 गुंठे मका चोरी गेली.! गणोर्‍यात आठ जणांवर गुन्हे दाखल.! अकोल्याला पीआय नाहीच.!

सार्वभौम (गणोरे) :-  

                  अकोले तालुक्यातील गणोरे येथून 20 गुंठे शेतातील 24 हजार रुपयांचे मक्याचे पिक चोरी गेल्याची घटना गुरूवार दि. 24 डिसेंबर ते मंगळवार दि. 29 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे. यात शिंदेवाडी येथील आठ जणांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल किसन आंबरे, नामदेव किसन आंबरे, विठ्ठल किसन आंबरे, योगेश नामदेव आंबरे, गणेश सुनिल आंबरे, संदिप नामदेव आंबरे यांच्यासह अन्य दोन महिला (सर्व रा. गणोरे शिंदेवाडी, ता. अकोले) यांना छाया भाऊसाहेब आंबरे (रा. गणोरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, आरोपी यांनी छाया आंबरे यांच्या गणोरे गावच्या शिवारात असणार्‍या गट नंबर 2 मध्ये 20 गुंठे शेतात लावलेले मकेचे पिक स्वत:च्या फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे. त्यानंतर यातील काही आरोपींनी ट्रॅक्टर आणूून गट नं 2 मधील शेताची सपाटीकरण करुन डाळींबाच्या झाडांचे खोड काढून झालेल्या डाळींबाचा पुरावा नष्ट केला आहे.

दरम्यान, आरोपी संदिप नामदेव आंबरे याने त्याच्या मोबाईल नंबरहुन छाया आंबरे यांचे पती यांना अश्लिल शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तर याच आरोपींनी छाया आंबरे यांचा मुलगा सार्थक यास देखील शिवीगाळ दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार घडल्यानंतर छाया यांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले व आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील वास्तव काय आहे? याचा तपास पोलीस नाईक तपास तळपे करीत आहेत.

दरम्यान, अकोले पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक नसल्यामुळे येथे वारंवार कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर पोलीस निरीक्षक नसल्यामुळे कोणत्या घटनेला कोणते कलम लावले जाते याची देखील मोठी कसरत होताना दिसत आहे. त्यामुळे, पोलीस अधिक्षकांनी अकोले तालुक्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ पोलीस अधिकार्‍याची नेमणुक करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. 

 - सुशांत आरोटे