लघवी व शौच करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी, पत्रकाराचा कारणामा.! सात जणांवर गुन्हा दाखल.!

सार्वभौम (गणोरे) :- 

               अकोले तालुक्यातील गणोरे गावात राजेंद्र आंबरे या पत्रकाराने एका महिलेच्या शेतात सीसीटीव्ही कॉमेरे बसवून त्याची व्हिडिओ शुटिंग काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नविन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे 1 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर या व्यतिरिक्त आंबरे-आंबरे या दोन गटात जमिनीचे वाद असून याप्रकरणी शेतातून मका चोरी जाणे, तसेच छेडछाड अशा प्रकारचे देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याप्रकरणी राजेंद्र भागुजी आंबरे, रामदास भागुजी आंबरे, कांचन रामदास आंबरे, शुभम रामदास आंबरे, प्रतिक नवनाथ वामन, छाया राजेंद्र आंबरे, सार्थक राजेंद्र आंबरे (सर्व रा. गणोरे, ता. अकोले) यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात छेडछाड व चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मी व माझा भाया तसेच पुतण्या आम्ही सर्वजण आमचे शेतात ट्रॅक्टर घेऊन जात होतो. त्यावेळी गणोरे गावच्या शिवारात स्मशानभुमीजवळ जात असताना वरील सर्व आरोपी हे आमच्या ट्रॅक्टरला आडवे झाले. आरोपी रामदास आंबरे यांने ट्रॅक्टरची चावी काढून घेत म्हणला की, तुम्ही आमच्या शेतात मकाचे पीक केले आहे ते आमच्या मालकीचे आहे. असे म्हणाला असता त्याचा राग येऊन राजेंद्र आंबरे याने एका महिलेचा डावा हात धरून खाली ओढले. त्यानंतर तिच्या अंगावरील वस्त्र फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली.

दरम्यान, पीडित महिलेचा आरडाओरडा ऐकल्यानंतर तेथे विठ्ठल किसन आंबरे यांनी पीडित महिलेला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी विठ्ठल हे महिलेला सोडविण्यासाठी गेले असता त्यांना कांचन रामदास आंबरे, शुभम आंबरे, प्रतिक वामन, छाया आंबरे, सार्थक आंबरे, यांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करत म्हणाले की, तू जर आमच्या नादाला लागशील तर तुमच्या कुटुंबाचा खुन करुन टाकु अशी धमकी दिली. तसेच राजेंद्र आंबरे याने त्याचे हातातील लाकडी काठीने पीडित महिलेच्या पाठीत जबरी मारहाण केली. असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, आरोपी 1 ते 7 यांनी माझे शेत गट नं. 3 मधील 20 गुंठे मका पैकी काही मकेचे पीक स्वत:च्या फायद्याकरीता चोरुन नेले आहे. तसेच राजेंद्र आंबरे याने आमच्या शेतावर सीसीटीव्ही कॉमेरे बसविले असून आम्ही शेतात काम करीत असताना जेव्हा लघवी आणि शौचालयास जातो, तेव्हा त्याचे देखील तो चित्रिकरण करतो. जर तुम्ही माझ्या नादाला लागला तर तुमचे आश्लिल चित्रिकरण व्हायरल करीन अशी धमकी दिली आहे. त्यामुळे, एका महिला फिर्यादीच्या तक्रार अर्जाहून अकोले पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब गोर्‍हाणे करीत आहेत.