धक्कादायक.! घरातील भांडणामुळे मुलाने केला बापाचा खून.! मुलास अटक, एक संशयित, गुन्हा दाखल.!

 सार्वभौम (संगमनेर) :-

                        घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही अंतरावर असणार्‍या खंदरमाळवाडीच्या हाद्दीत घडली. हा प्रकार आज बुधवार दि. 27 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. यात भिमा सोमा काळे (वय 50, रा. आंभोरे, ता. संगमनेर) हे मयत झाले असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन सिताराम भिमा काळे (वय 35, रा. आंभोरे, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली असून त्याच्या साथिदाराकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिमा सोमा काळे हे आंभोरे येथील रहिवासी असून ते मोलमजूरी करुन आपली गुजरान करीत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांचे घरात वाद झाले होते. त्यानंतर या बापलेकांनी अगदी टोकाची भूमिका घेत यांच्यात देखील चांगलीच धरपकड झाली होती. यावेळी रात्री उशिरा हे दोघे घराच्या बाहेर पडले होते. तेव्हा, आरोपी सिताराम काळे याने आपल्या बापाची हत्या करण्याचा कट रचला आणि ठरल्या प्रमाणे त्याने आपल्या जन्मदात्याचा काटा काढला. 

दरम्यान, भिमा सोमा काळे यांचा मृतदेह आंबीफाटा येथून काही अंतरावर असणार्‍या खंदरमाळवाडीच्या हाद्दीत  पहाटेच्या सुमारास काही वाटसरुंना दिसला. त्यानंतर त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही संशयित बाबी लक्षात घेऊन त्यांनी तपासाला गती दिली असता मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. त्यानंतर या सर्व प्रक्रियेत पाटील यांच्या लक्षात आले की, सिताराम याचे व्यसनाधिनता आणि त्याच्या अंगाला माखलेले रक्त यातून त्यांचा संशय बळवला आणि त्यांनी सिताराम याच्या मित्रासह दोघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, या दोघांनी प्रचंड मद्यपान केले होते. त्यामुळे, त्यांची बोलण्याची देखील मानसिकता नव्हती. त्यामुळे, मयत कोण? आरोपी कोण? कारण काय? याची शहनिशा लवकर झाली नाही. मात्र, पोलिसांनी संयमी भूमिका घेत दोघांची दारु उतरण्याची वाट पाहिली. त्यानंतर दोघांची नशा उतरली असता सिताराम याने आपण केलेला गुन्हा कबूल केला आहे. तर त्याच्या साथिदाराचा यात काय रोल आहे याची चौकशी दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.

 यात एक महत्वाची बाब म्हणजे जर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली नसती तर यात आरोपी यांनी काही पुरावे नष्ट केले असते तर नंतर हे आंदोलनाच्या पवित्र्यात उभे राहिले असते. कारण, अशा प्रकारचे अनेक प्रकार नगर जिल्ह्यात पहायला मिळाले आहेत. त्यामुळे, पाटील यांची तत्परता या गुन्ह्याला सहाय्यभूत ठरुन उकल करण्यास पुरक ठरली आहे.   ही कारवाई राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके यांनी केली.